‘कासदाह’ आजार प्रामुख्याने दुभत्या जनावरांमध्ये आढळतो. यास ‘काससुजी’ किंवा ‘दगडी’ असेही म्हणतात. जीवाणू/ विषाणू जंतुसंसर्गामुळे कासदाह होतो. वासरांच्या दातामुळे सडाला इजा होणे, दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे, दुधाची भांडी व गोठा अस्वच्छ असणे, वेळेवर दूध न काढणे, त्यामुळे कासेत दूध साठून राहाणे या कारणांमुळे कासेत जंतुसंसर्ग होतो.
यामध्ये कासेला वा एखाद्या सडाला सूज येते किंवा सड टणक होतो, त्यांना स्पर्श केल्यास जनावराला वेदना होतात, सडातून पातळ दूध किंवा पाणी येते, आजार वाढल्यास पू किंवा रक्त येते, जनावरास ताप येतो, भूक मंदावते.
आजारी जनावरास वेळेवर उपचार मिळाला नाही, तर संपूर्ण कास दगडासारखी होते. त्यास ‘दगडी कास’ म्हणतात. स्तनदाह झालेल्या जनावरास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. प्रसंगी पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्रथम सडात खास नळी घालून सडातील संपूर्ण दूध काढून टाकावे. त्यानंतर सडात सोडण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रतिजैविकांच्या टय़ूब्ज प्रत्येक दिवशी प्रत्येक बाधित सडात एक याप्रमाणे चार-पाच दिवस सोडाव्यात. तसेच प्रतिजैविकांची इंजेक्शन्स तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून सलग तीन ते पाच दिवस टोचून घ्यावीत. कास घट्ट झाल्यास, कासेला दररोज एखाद्या औषधी मलमाने मालिश करावे. सडावर जखम असल्यास दूध काढण्यापूर्वी ती पोटॅशियम परमँगनेटच्या सौम्य द्रावणाने धुवून त्याची योग्य देखभाल करावी. उपचारादरम्यान बाधित सडातील दूध वापरू नये. शेवटची टय़ूब सडात सोडल्यानंतर त्या सडाचे दूध साधारणत: तीन-चार दिवसांनंतर वापरण्यास हरकत नाही.
सडातून रोगजंतूंचा शिरकाव होऊ नये, म्हणून रोगप्रतिबंधक उपाय करावेत. यामध्ये दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ असावी. गोठय़ात जनावरांची गर्दी नसावी. गोठा स्वच्छ व सपाट असावा. वासरांची शिंगे आठव्या ते दहाव्या दिवशी काढावीत. दूध काढण्यापूर्वी कास धुवावी. दूध काढण्याच्या यंत्रामध्ये दोष नसावा. स्तनदाह झालेली जनावरे वेगळी बांधावीत. दूध काढल्यानंतर गायीला २५-३० मिनिटे जमिनीवर बसू देऊ नये. १५ दिवसांतून किंवा महिन्यातून एकदातरी दूध परीक्षण करावे. नवीन गायी विकत घेताना कासेची पाहाणी करावी.

जे देखे रवी.. – चेंडूफळी (क्रिकेट)
चेंडूफळी या खेळाचे वर्णन तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अनुभवामृत (अमृतानुभव) या तत्त्वकाव्यात केले आहे. या खेळाचे आधुनिक रूप म्हणजे क्रिकेट. आम्ही क्रिकेटचा शोध लावला असले काही तरी भंकज सिद्ध करण्यासाठी मी हे लिहीत नाही. क्रिकेट हा एक मोठा लोकप्रिय खेळ झाला आहे आणि त्यातली अनिश्चितता आणि थरार आपण सगळेच अनुभवतो. आपला संघ जिंकला तर आपल्या मनात आनंद आणि उन्माद आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मनात हाहाकार माजतो, पण हा शेवटी खेळच असतो आणि हल्लीहल्ली पैसे खाऊन खेळाडू सामने जाणीवपूर्वक हरतात, असे सिद्ध झाल्यामुळे या खेळाचा खेळखंडोबा झाला आहे हे लक्षात येते आणि ‘आपण किती मूर्ख’ असे वाटत राहते. सगळे आविष्कार शेवटी मनाचे असतात आणि ते बाह्य़ जगताशी संबंधित असतात. त्या मनामागचे चैतन्य अबाधित राहते आणि मनाला अनेक खेळ दाखविते, अशी कल्पना आहे. त्यात देवादिकांचाही समावेश आहे, पण त्याबद्दल नंतर. चेंडूफळीबद्दलच्या अमृतानुभवातल्या ओव्या विंदा करंदीकरांच्या भाषेत म्हणतात:
स्वत:च चेंडू सुटे। मग स्वत:वर आपटे। त्याने उसळून दाटे। स्वत:च।।
अशी जर चेंडूफळी। पाहाल कोणे वेळी। तर म्हणा ती खेळी। प्रबोधाची
प्रबोधाची म्हणजे जाणिवेची. हे जग सुटते, आदळते, दाटून परत येते या सगळ्यांची पाश्र्वभूमी आणि त्यातले इंगित चैतन्य असते आणि त्यातून हा खेळ घडतो. त्याचे आणखीही समर्पक वर्णन पुढील ओवी करते. पाणी लाटांच्या निमित्ताने। जसे स्वत:च हेलावते। तसे ब्रह्मची ब्रह्मावर खेळते। आनंदाने।। हा आनंद ब्रह्माचा आहे. आपण पेढा खाल्ल्यावर होतो तसला हा आनंद नाही. कारण जिभेला स्वत:ची चव कळत नाही, नाक स्वत: सुगंध होत नाही किंवा कान म्हणजे शब्द नसतात. ही तिन्ही ज्ञानेंद्रिये चैतन्याचे आविष्कार असतात आणि या जगातली सुख-दु:खे अनुभवण्यासाठी उत्क्रांतीत आपल्याला अपघाताने मिळतात. हे जे सुख-दु:खाचे देणेघेणे असते त्याबद्दलची ओवी म्हणते, ‘उभ्याउभ्याच झोपत असे। जागेपणी न वेगळा भासे। त्या घोडय़ासारखेच असे। हे देणेघेणे।। ’ हा घोडा म्हणजे मूळ चैतन्य असावा तो जागेपणाची झोपल्याची दोन रूपे दाखवतो. इथे मागच्या लेखात म्हटले तसे कोणालाच प्रवेश नाही. बाहेर दाराशीच थांबायचे, आत शिरायचे म्हटले तर कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा, चपला जोडे बाहेर काढून ठेवायचे. मग अनुभवायचे तरी काय कसे? आणि हा नियम विष्णू आणि शंकर दोघांना लागू आहे..
मुळात एकच खरोखर। परंतु नामरूपाचे प्रकार।
होते तेही हरिहर। आटले इथे।।
ज्ञानेश्वरांनी देवबाप्पांनाही आटवून टाकले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

वॉर अँड पीस – क्षय : भाग – ६
पथ्यापथ्य: १) आवळा, डाळिंब, अंजीर, वेलची केळी, द्राक्षे, मनुका, मूग, उडीद, जुन्या तांदळाचा भात, आले, लसूण, पुदिना, तुळस, ओली हळद, जिरे, गाईचे किंवा शेळीचे दूध यांचा आहारात समावेश असावा. ठरवून आहार वाढवावा. २) मोकळी हवा, भरपूर उजेड, सूर्यप्रकाश यांच्या सान्निध्यात राहावे. मेंढय़ांच्या कळपात क्षय विकाराचे पूर्ण निर्मूलन तीन महिन्यांत होते. ३) सत् प्रवृत्त राहावे.
काही वर्षांपूर्वी एक स्त्री रुग्ण एका गंभीर आगंतु विकाराने ग्रस्त माझ्याकडे आल्या. बरे न होण्याच्या अवस्थेतील रोग बरा झाला. काही काळ गेला, त्या बाईंना क्षयासारखी भावना झाली. माझा विचार त्यांनी अ‍ॅलोपॅथीची औषधे घ्यावी. पण घरच्यांनी आयुर्वेदीय उपचारांचाच आग्रह धरला. त्यामुळे अभ्रकमिश्रणाचा पाठ तयार झाला. असे औषध आज हजारो वर्षे वैद्य लोक वापरत आले आहेत. त्यात नवे काही नाही. फक्त त्याचा पुन्हापुन्हा आग्रह धरणे आवश्यक आहे. अशा औषधांचे बरेवाईट गुणधर्म नवीन पिढीपुढे यावयास हवे.
अभ्रकमिश्रण – या औषधी योगात अस्सल वंशोलचन, पिंपळचूर्ण प्र. ४० ग्रॅम, ज्येष्ठमध, डाळिंबसाल अभ्रकभस्म प्र. १० ग्रॅ. लवंग मिरे टाकणखारलाही बेहडाचूर्ण प्र. ५ ग्रॅ. अशी घटकद्रव्ये आहेत. आभ्रकभस्म शतपुटी, निश्चंद्र व वनस्पतिमारित चांगल्या दर्जाचेच हवे. वंशलोचन अस्सलच हवे. बाजारात चालू वंशलोचन मिळते, ते नको. पिंपळी ही नवसारी, हिरवीगार, तिखट न किडलेली हवी. लवंग, मिरी, बेहडा उत्तम दर्जाचाच हवा. ताज्या डाळिंबाची साल घरी सावलीत वाळवून चूर्ण करावे. काळसर, खराब नको टाकणखारलाही हलकीफुलकीच हवी. सर्व औषध एकत्र सूक्ष्म होईपर्यंत घोटावे. याचे हरभरा डाळीएवढय़ा प्रमाणापासून अध्र्या चमच्यापर्यंत किंवा दोन ग्रॅम असे मिश्रण कालवून चाटण म्हणून लहान अर्भकापासून मोठय़ापर्यंत वापरावे. फुफ्फुसाचा क्षय, रात्रौ न थांबणारा, झोपू न देणारा खोकला, प्लुरसी, उर:क्षत सर्दी, पडसे, दमा, वजन घटणे, जीर्णज्वर अशा विकारात उपयोगी पडते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २३ जुलै
१८५६ > राजकारणी, वृत्तपत्रकार, वैदिक संशोधक, प्राच्यविद्यापंडित आणि भगवद्गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म. ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वर्तमानपत्रे सुरू करणाऱ्या टिळकांचे अग्रलेख गाजले आणि ब्रिटिश सरकारची झोप उडवणारे ठरले. मंडालेच्या तुरुंगात असताना ‘गीतारहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र’ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केला. वेदकालनिर्णयावर ‘ओरायन’ आणि आर्याच्या इतिहासशोधाचा ‘आक्र्टिक होम ऑफ द वेदाज’ हे ग्रंथही त्यांनी लिहिले. परखड, सडेतोड  राजकीय अग्रलेखांची मराठीतील परंपरा लोकमान्यांशीच नाते सांगते.
१९२३ > इतिहास संशोधक व राज्य पुराभिलेख विभागाचे माजी पुरातत्त्व संचालक डॉ. विठ्ठल गोपाळ खोबरेकर यांचा जन्म. ‘गुजरातमधील मराठी राजवट’, ‘मराठा अमात्यांचे स्वरूप’, ‘कोकणचा राजकीय इतिहास’ आदी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
१९५६ > ‘दुभंग’, ‘चिनी मातीतील दिवस’, ‘वडारवेदना’ आणि जगभरातील अनेक भाषांत भाषांतरित झालेले मूळ मराठी ‘उचल्या’ या पुस्तकांचे लेखक लक्ष्मण मारुती गायकवाड यांचा जन्म. गायकवाड यांनी साहित्य चळवळीसंबंधी स्फुट लेखनही केले आहे. ‘उचल्याकार’ हीच त्यांची ओळख आजही मराठीत आहे.
– संजय वझरेकर