19 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : चुकतंय कुठे?

‘व्यसन’बद्दल बोलायचं, तर मुलग्यांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे; पण त्याचबरोबर मुलींमधल्या व्यसनाचं प्रमाणही वाढलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

बालमानसशास्त्र या शाखेची फारशी माहिती नव्हती, तेव्हा घरोघरी ‘मोठय़ांनी सांगितलं तसं’ हीच एकमेव पद्धत होती. ती आता बरीचशी बदलली आहे. मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. यामुळे घरातला संवाद वाढतो आहे, असं चित्र आहे. पालक आणि मुलांचं नातं मैत्रीचंसुद्धा असू शकतं, हे किती तरी घरातल्या सुसंवादावरून दिसून येतं; पण एकूण समाजातल्या घातक प्रकारांमुळे आणि तंत्रज्ञानाच्या अनियंत्रित वापरामुळे नवी पिढी नक्की कुठे जात आहे, हा प्रश्न विचार करायला लावतो.

‘व्यसन’बद्दल बोलायचं, तर मुलग्यांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे; पण त्याचबरोबर मुलींमधल्या व्यसनाचं प्रमाणही वाढलं आहे. टीनएजमधल्या मुलांच्या हातून घडणाऱ्या अनैतिक कृत्यांचं प्रमाण वाढलं आहे. बरीचशी प्रेमप्रकरणं, मैत्रिणीचं अश्लील व्हिडीओ शूटिंग, हातात सदैव असणाऱ्या मोबाइलमधून वाहणाऱ्या अश्लील क्लिप्स, हुक्का पार्लर, विड हे प्रकार सोळा-सतराच्या वयातील मुलांमध्ये घडू लागले आहेत. या विघातक गोष्टी सर्व आर्थिक स्तरांत, सर्व वर्गात पसरल्या आहेत.

मूल युवावस्थेकडे जायला लागतं, तेव्हा ते शहाणं होण्याआधी एक मोठा खड्डा असतो. या खड्डय़ात पडायचं का आणि पडलं तर काय होईल, याचा किमान विचार करणं मुलांना त्या आधीच्या वयातच शिकवावं लागणार आहे. धाडस आणि धोका यांतला फरक त्यांना कळत नसतो. धाडस करायला मेंदूच त्यांना सांगत असतो. काही वेळा तर स्वत:ची सुरक्षितताही पणाला लागते; पण धाडस केल्याशिवाय मेंदूला स्वस्थ बसवत नाही. मुलांनी मोठं होण्याची ही एक आदिम प्रेरणा आहे. ती त्यांच्यासाठी आवश्यक अशा नैसर्गिक जडणघडणीचाच एक भाग आहे.

मुलंमुली असे विचित्र, धाडसी, धोकेबाज, कधीकधी अनैतिक निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामागे पालकांची चूक नसते. वाढत्या वयातल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यासंदर्भात पालकांना दोष देण्याचं कारण नसतं. कारण या वयात पालक जे सांगतात, त्याच्या विरुद्ध वागण्याकडे कल असतो.

एका मर्यादेपलीकडे पालकांनी मुलांचं स्वातंत्र्य मान्य करून त्यांना धाडस करू द्यावं, अशी मांडणी होत असताना दुसरीकडे- मुलांना धाडस व गुन्हा यांतला फरक सांगत त्यांना भावनिकदृष्टय़ा कणखर बनवणं अत्यावश्यक आहे. मेंदूतली रसायनं विधायकतेकडे वळवण्याचा हा एक योग्य मार्ग आहे.

contact@shrutipanse.com

First Published on September 18, 2019 12:10 am

Web Title: wheres the mistake brain abn 97