‘चार वर्षांच्या मुलाला एक ते २० अंक ओळीने म्हणता येत नाहीत.. पाच वर्षांच्या मुलांना अजूनही अक्षरं काढता येत नाहीत, अंक मोजता येत नाहीत.. मुलं पाच – साडेपाच वर्षांची झाली तरीसुद्धा वर्गभर फिरत राहतात, वर्गात किंवा घरामध्ये एका जागेवर बसू शकत नाहीत. त्यांना दामटून बसवावं लागतं.. तीन वर्षांचं मूल अजूनही रंग ओळखत नाही..’ या नव्या पालकांच्या व नव्या शिक्षकांच्या काही तक्रारी.
वास्तविक आपला मेंदू कितीही हुशार आणि चलाख असला आणि मेंदूमध्ये शिकण्याच्या सर्व यंत्रणा तयार असल्या तरीसुद्धा ठरावीक प्रकारच्या शिक्षणाला ठरावीक वय यावंच लागतं. ही गोष्ट बालवाडीच्या शिक्षकांनी आणि त्या शाळांच्या व्यवस्थापनानं समजून घ्यायला हवी.
वय वर्ष चार हे वास्तविक खेळण्याचं वय आहे, हे लक्षात घेऊन फ्रोबेल यांनी चेंडूचा वापर करून सहज शिक्षण घडवून आणलं होतं. हे खेळणं म्हणजे आपसूकच क्षमतांचा विकास होणं आणि स्वत:च्या क्षमता तपासून बघणं असतं. मग तो एखाद्या खेळण्यांशी खेळ असो, भाषेशी खेळ असो. हे वय स्वत:चा अंदाज घेत, स्वत:च्या कुवतीनुसार पुढे जाण्याचं वय आहे.
हे वय कोणत्याही प्रकारे लेखन आणि वाचन करण्याचं वय नाही. मुलांच्या कलानं लेखनपूर्व आणि वाचनपूर्व असे उपक्रम दिवसातून काहीच काळ घेतले जाऊ शकतात. दिवसातले दोन ते तीन तास लेखन-वाचन किंवा रूढ अर्थानं ज्याला ‘अभ्यास’ म्हणतात, तसं होऊ नये. सहाव्या वर्षांपर्यंत मुलांचा मेंदू विकसित होत असतो, त्यानंतर नाही, अशा चुकीच्या गैरसमजुतीतून अनेक शाळा लेखन-वाचनाचा अट्टहास करतात. हे मेंदूपूरक नाही, तर उलट मेंदूबाधक आहे. बालवाडी शिक्षकांनी लेखन शिकवणं अपेक्षित नाही.
मेंदू संशोधन व शरीरशास्त्रानुसार सहा वर्षांच्या आधी मुलांना लेखन शिकवणं आणि त्यांच्याकडून लेखनाचा सराव करून घेणं, ही गोष्ट मेंदूवर ताण आणणारी आहे. वय वर्ष सहा पूर्ण झाल्यानंतर मुलांच्या मनगटाचे स्नायू विकसित झाल्यावर, हस्त-नेत्र समन्वय आणि डोळ्यांची बुबुळे यांचा विकास पूर्ण झाल्यानंतर सर्व मुलं लिहू शकतात. मात्र, त्याआधी त्यांच्यावर जबरदस्ती म्हणजे त्यांना निष्कारण ताण देणं आहे. – डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com