ब्रिटनच्या राणीचं राज्य असताना तेथे आधुनिक वस्त्रनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ झाली. हा उद्योग रोजगाराभिमुख असल्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता यात आहे हे नि:संशय. कमी उत्पादन खर्च आणि रोजगार निर्मिती हे समीकरण जुळून आलं आणि या उद्योगास गती मिळत गेली. या उद्योगात पारंगत होण्यासाठी शिक्षण घेणेही सुरू झाले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत मँचेस्टर रिटर्न पदव्यांना खूप मान मिळत असे. एकदा का गिरणीत कामाला लागलं की अगदी निवृत्तीपर्यंत चिकटून राहायचं, असंच काहीसं करिअरचं गणित असायचं. गेल्या दोन-तीन दशकांत जरा बदल जाणवायला लागला. इतर क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढल्या आणि या क्षेत्रातील प्रवेशास पूर्वी असलेला प्राधान्याचा क्रम बदलला.

या उद्योगात काम करणाऱ्या मंडळींचा एक वेगळाच खाक्या असतो. कोणत्याही पदावर असो, ते स्वत:ला कर्तव्यात अगदी झोकून देतात. कार्य संस्कृती हे प्रत्येक कंपनीत जरी भिन्न भासले तरी स्वत:ला कामात झोकून देण्याची वृत्ती आणि तयारी असणाऱ्यांनीच या उद्योगात करिअर म्हणून पदार्पण करावे. वस्त्र निर्मिती उद्योगाबरोबरच रेडीमेड गारमेंट उद्योगाने खूप प्रगती केली आहे. फॅशन डिझायनर्स यांनी या उद्योगात रंगत आणली आहे. विकसित होऊ घातलेलं आधुनिक ऑर्गनाइज्ड रिटेिलग या उद्योगाची रंगत आणखी वाढवू शकते. ऑनलाइन रिटेिलगचेही ग्राहकांकडून स्वागत होताना दिसतंय.
सुरुवातीस उत्पादनाभिमुख असणारा हा उद्योग कालमानाच्या आवश्यकतेनुसार मार्केटिंग ओरिएंटेड कधी झाला ते कळलंच नाही. तरी आजही बी टू बी मार्केटिंग प्रणालीच बहुतांशी अंगीकारलेली दिसते. काही कंपन्यांनी स्वत:च्या ब्रँड्स प्रमोट केल्या आणि नवीन येत आहेत. काही ब्रँड्स राष्ट्रीय स्तरावर तर काही स्थानिक आहेत. ग्लोबल ब्रँड्सचे देखील त्या मार्केट विभागाच्या उपभोक्त्यांकडून स्वागत झाले आहे. पार्टी व उत्सव विभागामध्ये खास पारंपरिक पद्धतीला ग्राहकांची पसंती असल्याचे दिसते. इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या व्यावसायिकांनी पार्टी आणि सेलिब्रेशन वेअर विभागाला उभारी आणली आहे.
आपल्या देशातील आíथक व्यवस्थेतील परिवर्तनाने या उद्योगाच्या सध्याच्या स्वरूपात अनुरूप बदल होत राहणार. विक्री व्यवस्थेतही बदल होत जाणार. व्यावसायिकता वाढत जाणार. सतत विश्लेषणाची पूर्वी कधी नव्हती एवढी गरज भासत राहणार हे कटू सत्य स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.

 सुनील गणपुले (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

जव्हार संस्थान

मुंबईहून १४५ कि.मी. अंतरावर, सध्या पालघर जिल्हय़ात असलेले जव्हार हे स्वातंत्र्यपूर्व काळातील जव्हार संस्थानाचे प्रमुख ठिकाण होते. १३०६ साली या भागात राहणारा एक तरुण जयाबा मुकणे याने येथील एक पडका किल्ला ताब्यात घेऊन आपले छोटे राज्य स्थापन केले. मुकणे घराण्याच्या पुढील वंशजांपकी दिलबरराव हा जव्हारचा पराक्रमी शासक झाला. त्याने सन्य उभे करून सध्याच्या नाशिक आणि ठाणे जिल्हय़ातील बराच मोठा प्रदेश घेऊन २२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले. सुलतान मुहम्मद बीन कासीमने त्याला राजेपदाची मान्यता देऊन निमशाहा हा खिताब दिला. दिलबरराव ऊर्फ निमशाह प्रथमचा नातू देवबाराव याच्या बहामनी सुलतान अहमदशाह याच्याशी बिदर येथे झालेल्या लढाईत देवबारावचा पराभव झाला. देवबारावच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाऐवजी पुतण्याला राजेपद देण्यात आले. राजा विक्रमशाह प्रथम याचे शिवाजी महाराजांशी चांगले संबंध होते. महाराजांच्या सुरतच्या मोहिमांमध्ये विक्रमशाहा आणि त्याच्या सन्याचा सहभाग होता; परंतु पुढे मराठय़ांशी मतभेद होऊन आलेल्या वैमनस्यातून मराठय़ांनी बऱ्याच मोठय़ा प्रदेशाचा ताबा घेतला. १७८२ मध्ये मराठय़ांनी जव्हार शासकाला अत्यंत थोडय़ा, बंदिस्त प्रदेशाचे राजेपद दिले. राज्याचा विकास आणि प्रशासन कोलमडून पडले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस जव्हार कंपनी सरकारच्या आधिपत्याखाली आले. ८०० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाला ९ तोफ सलामींचा मान होता. १९३८ साली राजेपद मिळालेल्या यशवंतराव मुकणे ऊर्फ पतंगशाह पंचम यांनी मात्र चोख प्रशासन देऊन राज्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा, फिरते रुग्णालय, वाचनालय सुरू करून रसायन उद्योग, कापड व्यवसायाला उत्तेजन दिले. दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्समध्ये पायलट म्हणून काम केलेल्या यशवंतरावांनी १९४७ साली जव्हार संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com