कुतूहल
जैवइंधनाचे फायदे आणि तोटे
प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती शर्करामय कबरेदकांची निर्मिती करतात. जैव वस्तुमानाचा उपयोग जैवइंधन म्हणून करण्याची कल्पना खूपच छान आहे. पेट्रोल व डिझेल या खनिज इंधनाच्या अतोनात वापरामुळे जीववातावरणाची अपरिमित हानी होत आहे ती यामुळे टाळता येईल, कारण वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करतील. त्यामुळे निसर्गात उष्मा निर्माण होणेपण कमी होईल. शिवाय इंधनाचा हा स्रोत संपणारदेखील नाही. अगदी द्रौपदीच्या थाळीप्रमाणे अव्याहत ऊर्जेचा पुरवठा होईल, कारण मागणी वाढली तर आणखी खूप साऱ्या वनस्पती लावता येतील.
पण हे तितकेसे साधेसरळ नाही, कारण ही झाडे जगवायची म्हणजे बरेच खर्चाचे काम असते. त्यांच्यासाठी जमीन, खतपाणी इत्यादीची व्यवस्था करावी व इतर धान्याच्या शेतीप्रमाणे त्याची काळजी घ्यावी लागते. परंपरागत पद्धतीप्रमाणे जैववस्तुमानाचा लाकूड म्हणून जाळण्यासाठीपण उपयोग होतोच. त्यासाठी भरभर वाढणारी झाडे लावली जातात. त्यात पोप्लार, विल्लो, निलगिरी इत्यादींचा हवामानाप्रमाणे समावेश होतो, पण ही झाडे वातावरणात आयसोप्रीन सोडतात व या आयसोप्रीनचा वातावरणातील इतर प्रदूषकांबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशात संबंध येतो तेव्हा ओझोन तयार होतो व तो आणखीनच हानिकारक असतो. जैवइंधन म्हणून वापरण्यात येणारे इथेनॉल अमेरिकेत मक्यापासून, तर ब्राझीलमध्ये उसापासून बनवितात. बायोडिझेल  बनविण्यासाठी जी मेदाम्ले वापरतात ती सहसा तेलबियांपासून मिळवतात. या खाद्योपयोगी धान्याचा उपयोग जर जैवइंधन बनविण्यासाठी वाढला तर माणसास अन्नधान्य कमी पडेल. वनस्पतींची एवढी काळजी घेऊन वाढ कशासाठी करायची? अन्नधान्यासाठी की इंधन म्हणून? बायोडिझेल तयार करण्यासाठी जर खाद्योपयोगी नसणाऱ्या तेलबियांचे उत्पादन वाढविले तर माणसाच्या खाद्यतेलात त्या तेलाची भेसळ होण्याचीसुद्धा शक्यता आहे.
हे सर्व जैवइंधनाचे पर्याय खनिज तेलाइतके स्वस्त आणि मस्त नाहीत. त्यावर बरेच संशोधन होणे आवश्यक आहे, पण गरज ही शोधांची जननी आहे. आता आपल्याला ठरवायचे आहे की आपण या जगातील खनिज तेलाचा साठा संपवून मजा करायची आणि आपल्या पुढच्या पिढीला अंधारात ढकलून द्यायचे, की जैवइंधनावर भरपूर संशोधन करून त्यांचे भविष्य उजळवायचे.
डॉ. जयश्री सनिस (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
pradeepapte1687 @gmail.com

प्रबोधन पर्व
धर्म समाजस्थैर्यासाठीच आहे
‘‘परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही. गणपतीचा महिनोगणती उत्सव केल्याने धर्मास जोम येणार नाही. जो धर्माचा विस्तार म्हणून मानण्यात येतो त्या बहुजन समाजास धर्माच्या खऱ्या मार्गावर लावल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे..धर्म हा समाजस्थैर्यासाठीच निर्माण झाला आहे. अर्थातच समाजाचा उत्कर्ष म्हणजे धर्म असा त्याचा अर्थ ठरतो आणि जोपर्यंत धर्माचा हा अर्थ मानला जतो, तोपर्यंत समाजाचा उत्कर्षच असतो. आज जे जे समाज अध:पतन पावले आहेत, त्या त्या समाजाच्या धर्माची प्रकृति बिघडली आहे यात शंका नाही!’’
 ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या ‘दीनमित्र अग्रलेख’ या संकलित पुस्तकात धर्माविषयी पुढे असेही प्रतिपादन आहे –
‘‘देवधर्म आहे पण तो स्वर्गपाताळ, देवळे, मशिदी यात नसून माणसाच्या अंत:करणात आहे. प्रत्येक मनुष्य जन्मत:च ईश्वराजवळून हा बरोबर घेऊन येतो. या अंत:करण धर्मामुळेच आज भिन्न भिन्न धर्माच्या अनुयायांत प्रेम, सहानुभूती, निष्ठा इत्यादी गुण वसत आहेत. हा अंत:करणधर्म ज्याच्यात पुरेसा चांगला नाही, ते लोक धर्मवेडे होऊन अनेक अत्याचार करतात. आज धार्मिक दंगे याच हीन अंत:करणाच्या लोकांच्या हातून होत नाहीत.. लोकसंख्येची वाढ होणे यावर धर्माचा थोरपणा नाही. लोकांना अधिक शांतता आणि प्रेम लाभणे यावर धर्माची थोरवी अवलंबून आहे.’’

मनमोराचा पिसारा
नादमय ग्रॅन व्हिया
गुलजारजी म्हणतात ते खरंय, इसे मोडसे काही सुस्त कदम रस्ते, तर कुठे तेज कदम राहे असतात. पत्थरच्या हवेलीपासून, काचमहालामार्गे काडय़ांच्या इवल्याशा घरटय़ापर्यंत घेऊन जातात.
यातल्या पांढऱ्या, तांबूस आणि वाळूच्या रंगाच्या मदमस्त हवेल्यांनी आपल्या पायाशी लोळण घेणाऱ्या रस्त्यावरून चालायचं असेल तर चला माद्रिदच्या ‘ग्रॅनव्हिया’ या हमरस्त्यावर.
माद्रिदकरांचा हा लाडका, लोकप्रिय आण मुख्य रस्ता सदैव वाहाता असतो. माद्रिद हे शहर आपला सुखवस्तू आणि सुखवास्तूपणा भव्य इमारतीमध्ये जपून ठेवते.
माद्रिद शहराचे उत्तर-दक्षिण भाग जोडणारा हा रस्ता स्पेनचं सारं सांस्कृतिक आणि लोकमानसाचं वैभव मिरवतो. पैकी त्या रस्त्याचा शेवट ‘प्लाया एस्पानिओले’ या विस्तीर्ण मैदान कम चौकापाशी होतो.
दुतर्फा आर्टडेको आणि उतरत्या ‘बरोक’ शैलीच्या देखण्या इमारती आहेत. खांब, कमानी, त्यावरील नक्षीकाम बघत बसावंसं वाटतं. (आणि बघत बसताही येतं, कारण अनेक छोटय़ा रेस्तराँमध्ये काचेच्या उंच खिडक्या आहेत.) अनेक चित्रपटगृह आणि ब्रँडेड शॉपची दुकानं, मँगो ब्रँडची तर इतके की या रस्त्याला ‘आम रस्ता’ असं नाव देऊन टाकावं. निरुद्देश भटकण्याचे धडे ग्रॅनव्हिया रोज गिरवतो.
रात्रीच्या वेळी तर अनेक इमारतीवरील लहानमोठे पुतळे, शिल्पांवर प्रकाशझोत असतो. ती मजा आगळीच.
बाकी रस्त्यावर सदैव रहदारी आणि पदपथांवर पदपथ विस्तीर्ण आणि आरामशीर इतस्तत: फिरणारी स्पॅनिश मंडळी घाईगर्दीत फारशी नसतात. टुरिस्टदेखील अगदी तुरळक. बाकी देहसौंदर्याच्या नुमाईश करणाऱ्या ललना आपापल्या तोऱ्यात सोबत छोटी छोटी कुत्री (पेकिनिज चुऊहुवाइ.) घेऊन फिरत असतात.
 संध्याकाळी माद्रिदकरांचे दोन रंग खुलतात. प्रेमीजन मिळेल त्या ठिकाणी प्रणयाचे गुलाबी रंग बिनधास्तपणे उधळतात आणि चषकातल्या सोनेरी मद्याचे. सारं काही मस्तीत आणि रंगेल.
ग्रॅनव्हिया रस्त्यावरून राजेरजवाडय़ांच्या मिरवणुकाही जातात.
पण कोणत्याही चित्रात न दिसणारी गोष्ट म्हणजे माद्रिदकरांचं संगीत प्रेम. (खरं पाहता, युरोपातल्या अनेक रस्त्यावर संगीत गुंजत असतंच.) कोपऱ्यावर हमखास जाझ संगीताचा सुरावटी खुलतात. ही वादक-गायक मंडळी संगीत पेश करतात ते  किंचित अर्थाजर्नासाठी पण त्याचा बाजार मांडलेला नसतो.
तुम्ही त्यांच्यापाशी उभे राहून ती श्रवण करा किंवा जाता येता ऐका. ते वाजवतात ते अगदी निरिच्छ भावनेने केलेली संगीत साधना.
क्षणभर थांबून विचार केला आणि लक्षात आलं की संगीताचे सूर म्हणजे आत्म्याचं श्राव्यरूप. हे पटतं.
शहर असल्यानं अधूनमधून अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दलाचे बंब आवाज करीत फिरतात, पण ‘ग्रॅनव्हिया’वरचे संगीत त्या शहरी आक्रोशाच्या वर उसळून थेट हृदयाला स्पर्श करतं.
ग्रॅनव्हिया लक्षात राहतो तो अशा रंगीत नादमय रूपात..
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com