कृषी तंत्र वस्त्रांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. एका विशिष्ट प्रकारच्या कृषी तंत्र वस्त्राची निवड ही ज्या पिकाला सरंक्षण द्यावयाचे आहे त्याच्यावर आणि त्या पिकाच्या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीवर आणि हवामानावर अवलंबून असते. कारण काही ठिकाणी प्रखर सूर्यप्रकाशापासून पिकांचे संरक्षण करावे लागते तर काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीपासून सरंक्षण द्यावे लागते. कृषी क्षेत्रामध्ये तांत्रिक वस्त्रांचा वापर अनेक कारणांसाठी करण्यात येतो.
पीक सरंक्षणासाठी उपयोग – सौर पडदे (सन स्क्रीन्स) :
सौर पडद्यांचा उपयोग शेतांचे आणि ग्रीनहाऊसचे प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण करण्यासाठी केला जातो. यासाठी बाणा-गुंफाई पद्धतीने तयार केलेल्या कापडाचा वापर केला जातो. सौर पडदे हे जाळीदार कापडापासून बनविले जातात ज्यामुळे पिकावर पडणारे सूर्यकिरण नियंत्रित करून हवी तितकी सावली केली जाते. हे सौर पडदे जाळीदार असल्यामुळे आतमध्ये हवा खेळण्यास मदत होते आणि आतील भागात उष्ण हवा साठून तापमान वाढत नाही. ज्या प्रमाणात सावली हवी त्याप्रमाणे जाळीदार कापडाची घनता ठेवली जाते. सध्या वापरल्या जाणाऱ्या सौर पडद्यांची रचना ४५ टक्के , ६५ टक्के आणि ८५ टक्के सावली मिळेल अशा पद्धतीने केलेली असते.
पक्ष्यांपासून सरंक्षणासाठी जाळे :
पीक, फळे आणि बिया यांचे पक्ष्यांपासून आणि विविध प्रकारच्या कीटकांपासून रक्षण करण्यासाठी या प्रकारची जाळी वापरण्यात येतात.
पक्ष्यांपासून सरंक्षणासाठी खुल्या जाळीच्या कापडाचा उपयोग करण्यात येतो. हे कापड एकपदरी तंतूपासून बाणा-गुंफाई पद्धतीने तयार करण्यात येते. याच्या खुल्या जाळीमुळे पक्षी फळापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्याचबरोबर त्याच्या खुल्या रचनेमुळे अगदी कमीत कमी सावली पडते आणि अतिशय चांगल्या प्रकारे हवा खेळण्यास मदत होते. यामुळे फळझाडांची वाढ उत्तम होते आणि फळांवर बुरशी, डाग वैगरेही पडत नाहीत. ह्य़ा जाळ्या ताकदवान असतात पण त्याचबरोबर त्या वजनाने अत्यंत हलक्या असतात. त्यामुळे झाडाच्या वाढीवर कोणताही परिणाम न होऊ देता फळांचे उत्तम प्रकारे संरक्षण होते. यासाठी लागणारे कापड सर्व साधारणपणे पॉलिथिलिन फीत किंवा एकपदरी तंतूपासून बनविले जाते.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – म्हैसूर दिवाणांचे योगदान
म्हैसूर संस्थानाचे अखेरचे अधिकृत महाराजा जयचामराजेंद्र वोडीयार यांची कारकीर्द इ.स. १९४० ते १९५० अशी झाली. एक प्रसिद्ध तत्त्वचिंतक, संगीतज्ञ, राजकीय मुत्सद्दी आणि समाजकल्याणकारी अशी ओळख असलेले जयचामराजेंद्र हे विश्व िहदू परिषदेचे पहिले संस्थापक अध्यक्ष होत. एक निष्णात घोडेस्वार आणि टेनिस खेळाडू असलेल्या जयचामराजेंद्र यांनी सुप्रसिद्ध टेनिसपटू रामनाथन कृष्णन याला उत्तेजन देऊन विम्बल्डन स्पर्धामध्ये खेळण्यास पाठविले. त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यास उत्तेजन देऊन भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. इ.स. १७९९ ते १९४७ या काळात म्हैसूर संस्थान भारतातील एक महत्त्वाचे कला आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. वोडीयार घराण्याचे सर्व शासक संगीत आणि साहित्याचे स्वत: जाणकार आणि कलाकारांचे आश्रयदाते होते. महाराजा जयचामराजेंद्र यांनी म्हैसूर संस्थानाच्या स्वतंत्र भारतात विलीनीकरणाच्या दस्तऐवजांवर ९ ऑगस्ट १९४७ रोजी सहय़ा केल्या. राज्याचा उत्कर्ष करण्यात राजकर्त्यांबरोबरच राज्याच्या कर्तृत्ववान दिवाणांचा महत्त्वाचा भाग आहे. पूर्णय्या, रंगाचारलू, शेषाद्री अय्यर, एम. विश्वेश्वरय्या, मिर्झा इस्माईल अशा विख्यात दिवाणांच्या प्रशासनाखाली म्हैसूरने चौफेर प्रगती केली. शेषाद्री अय्यर यांनी त्यांच्या कारकीर्दीत कोलार येथील सोन्याची खाण सुरू केली. शेषाद्री यांनी म्हैसूर संस्थानाला औद्योगिक प्रगतीच्या उंबरठय़ावर आणून सोडले. विश्वविख्यात अभियंते एम. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत कृष्णराज सागर धरणाचे बांधकाम करून घेतले. म्हैसूर सोप फॅक्टरी, भद्रावती येथील म्हैसूर आयर्न अँड स्टील वर्क्‍स, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग इत्यादी संस्था स्थापन केल्या. दिवाण मिर्झा इस्माईल यांच्यामुळे बंगलोर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स कार्यान्वित झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com