वळणावळणांच्या घाटातून प्रवास करताना गाडी लागणे किंवा समुद्रात बोट लागणे याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल. यासाठी आपण खूप त्रास झाला, प्रचंड त्रास झाला अशी ढोबळ विधानं करतो. पण कधी कधी हा त्रास नेमका किती, याचं मापन करण्याची वेळ येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासा ही अवकाश संशोधन करणारी संस्था. अवकाशात प्रवास करताना माणसाला किती त्रास होऊ शकतो, याचा अभ्यास करताना त्यांनी गार्न हे एकक वापरायला सुरुवात केली आहे. जेक गार्न हा अमेरिकन सिनेटर १९८५ मध्ये डिस्कवरी स्पेस शटलवर गेला होता. त्यासाठी नासाने गार्नला पूर्ण ट्रेनिंग दिलं होतं. या ट्रेनिंगदरम्यान त्याला एवढा त्रास होत असे की, नासाने या प्रवासाच्या त्रासाचं एकक चक्क गार्नच्या नावानेच निश्चित केलं. एक गार्न इतका त्रास होणारा माणूस इतका गलितगात्र होईल की, प्रवासच करू शकणार नाही!

असं एखाद्या व्यक्तीवरून आलेलं आणखी एक गमतीशीर एकक आहे डिरॅक. पॉल डिरॅक हा पुंज भौतिकीमधला शास्त्रज्ञ अतिशय मितभाषी होता. त्याला बोलण्याची पूर्ण नावड होती. अगदीच गरज पडली तरच तो बोलायचा. तेही जरुरीपुरतं, कधी कधी तर फक्त एक शब्द. केम्ब्रिजमधल्या त्याच्या सहकाऱ्यांनी म्हणून हे नवं एकक ठरवून टाकलं. एक डिरॅक म्हणजे तासाला केवळ एक शब्द!

अ‍ॅण्डी वॉरहॉल हा एक विक्षिप्त अमेरिकन कलाकार. ‘‘प्रत्येकाला १५ मिनिटांची प्रसिद्धी असेल,’’ हे त्याचं विख्यात वाक्य घेऊन प्रसिद्धीचं एकक काही जणांनी बनवलं आहे. एक वॉरहॉल म्हणजे अर्थात १५ मिनिटांची प्रसिद्धी. त्याच्यावरून किलोवॉरहॉल, मेगावॉरहॉल अशी पुढची एककंदेखील आहेत.

नवीन तंत्रज्ञान आपल्याबरोबर एकेकदा नवीन एकक घेऊन येतात. स्टारट्रेक मालिकेमध्ये काम करणारा विल व्हीटन हा एक दुय्यम अभिनेता. सारखं ट्वीट करत राहिल्याने या अभिनेत्याला ट्विटरवर पहिल्यांदा पाच लाख चाहते मिळाले. तेव्हापासून एक व्हीटन म्हणजे ट्विटरचे पाच लाख चाहते असं नवं एकक रूढ झालं. आज स्वत: विल व्हीटनला सव्वासहा व्हीटन इतके चाहते आहेत!

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

महाश्वेतादेवी (१९९६)

१९९६चा ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली लेखिका, सामाजिक कार्यकर्त्यां महाश्वेतादेवी यांना १९७६ ते ९५ या कालावधीत बांगला भाषेत सृजनात्मक लेखनातून भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या, ‘‘ज्या दिवशी या देशात एखाद्या आदिवासी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळेल तेव्हा मला खरा आनंद वाटेल.’’

भटक्या-विमुक्त जमाती संघटनेच्या मेळाव्यानिमित्त महाश्वेतादेवींनी ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रात पुणे, नंदूरबार, लातूर, इंदापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा जिल्ह्यंत गाडीने हजारो कि.मी. प्रवास केला. भाषणे दिली.  त्याचे फलित म्हणजे मानवी आयोगाच्या अध्यक्षांनी या जमातींच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली. महाश्वेतादेवींच्या मते सृजनात्मक लेखन करणाऱ्या व्यक्तीला, समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव असायलाच हवी.

१४ जानेवारी १९२६ रोजी ढाका येथे या संवेदनशील, लेखिकेचा महाश्वेतादेवींचा जन्म झाला. वडील मनीषचंद्र घटक हे एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. आई धरित्रीदेवी यादेखील लेखन, अनुवाद आणि समाजसेवा या गोष्टींशी संबंधित होत्या. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक ऋत्त्विक घटक हे महाश्वेतादेवींचे काका. त्यांचे एक मामा शंख चौधरी हे शिल्पकार, तर दुसरे मामा सचिन चौधरी हे ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली ऑफ इंडिया’चे संस्थापक, संपादक. त्यांचे आजोबा त्या काळी स्वातंत्र्य चळवळीतील लोकांच्या बाजूने वकील म्हणून उभे राहात, अशा या सुशिक्षित, सुसंपन्न कुटुंबातील महाश्वेतादेवींचे शिक्षण शांतिनिकेतन येथे झाले. १९४६ मध्ये इंग्रजी साहित्यात त्यांनी बी.ए. आणि पुढे १९६३ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून एम.ए.झाल्या. काही वर्षे त्यांनी इंग्रजी विषयाची प्राध्यापिका म्हणून काम केले. दुसरीकडे समाजसेवा, विशेषत: आदिवासी कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन, पत्रकारिता, ‘दैनिक युगंतर’मध्ये स्तंभलेखनही सुरूच होते. वार्ताहर म्हणूनही त्या काम करीत. ‘वर्तिका’ या बंगाली त्रमासिकाच्या संपादनाचे कामही त्यांनी केले. काही काळ पोस्ट अँड टेलिग्राफच्या डेप्युटी जनरलच्या ऑफिसात नोकरी केली. बंगाली, इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, उडिया, संथाली, मुंडारी या भाषाही त्यांना अवगत होत्या.

‘इप्टा’चे संस्थापक सदस्य, नाटय़लेखक बिजोन भट्टाचार्य यांच्याशी १९४७ मध्ये महाश्वेतादेवींनी विवाह केला. तेव्हा डाव्या विचारसरणीशी त्यांचा संबंध आला.  त्यांचा मुलगा नवारुण भट्टाचार्य हाही बंगालीतील एक आघाडीचा कवी, कथाकार आणि पत्रकार आहे.

गेल्याच वर्षी, २८ जुलै २०१६ रोजी  महाश्वेतादेवी निवर्तल्या. राजकीय इतमामाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andy warhol american artist jake garn
First published on: 22-08-2017 at 02:21 IST