सध्याचा सौदी अरेबिया या नावाने ओळखला जाणारा भूभाग प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या विविध संस्कृतींचे उगमस्थान आहे. नोव्हेंबर २०१७ आणि मे २०२१ मध्ये सौदी अरेबियन प्रदेशात झालेल्या उत्खनन आणि संशोधनांतून आता असे सिद्ध झाले आहे की इ.स.पूर्व ८००० वर्षांपूर्वी नवपाषाण युगामध्येही या प्रदेशातल्या मानवाला पशुपालन आणि शेतीचे तंत्र माहिती होते. अश्वपालनाच्या तंत्रात तो विशेष जाणकार तर होताच परंतु त्याशिवाय प्राचीन अरबी मानव मेंढी, बकरी आणि कुत्रा हे प्राणीसुद्धा पाळत असे. विशेषत: कनान डॉग हा पश्चिम आशियात आणि इस्रायल, इजिप्तमध्ये आढळणाऱ्या प्रजातीचा कुत्रा या प्रदेशात पाळला जात होता. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधण्याची पद्धत होती. श्वानपालनाची प्रथा जगात प्रथम सुरू झाली ती अरब द्वीपकल्पातच असे समजले जाते.

सौदी अरेबियात अरेबिक भाषा ही अधिकृत राजभाषा आणि प्रचलित बोलली जाणारी भाषा आहे. अरेबिक भाषा लेखनासाठी या प्रदेशातच उगम पावलेली अरेबिक लिपी वापरली जाते. जगात सध्या प्रचलित असलेल्या लिपींमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या लॅटीन लिपीनंतर अरेबिकचा क्रमांक आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांमधील भाषांच्या लेखनासाठी अरेबिक लिपी वापरली जाते. अरेबिकसारखीच लिपी ज्या इतर भाषांमध्ये वापरली जाते त्यामध्ये पर्शियन, कुर्दिश, विगुर, सिंधी, बाल्टी, बलुची, उर्दू, काश्मिरी, रोहिंग्या, सोमाली, पुश्तो इत्यादी भाषांचा समावेश होतो. सोळाव्या शतकापर्यंत स्पॅनिश भाषा अरेबिक मुळाक्षरांमध्ये लिहिली जात होती! १९२८ साली तुर्कस्थानात भाषेत, लिपीत परिवर्तन होईपर्यंत तुर्की भाषासुद्धा अरेबिक मध्येच लिहिली जात असे. इ.स.पूर्व सहाव्या आणि पाचव्या शतकात अरेबियन प्रदेशातल्या काही टोळ्या जॉर्डन, सिरिया या प्रदेशात स्थायिक होऊन तेथील आर्मेइक भाषा आणि लिपी वापरू लागले. या आर्मेइक भाषा आणि लिपीचा वापर पुढे अरब द्वीपकल्पातही सुरू झाला. या भाषेत पुढे काही बदल आणि अपभ्रंश होऊन अरेबिक भाषा आणि लिपी प्रचलित झाली. सातव्या शतकात इस्लामच्या उदयानंतर इस्लामचा पवित्र ग्रंथ कुरान हा या अरेबिकमध्ये लिहिला गेला, पुढच्या शतकांमध्ये इस्लामच्या प्रसारासोबत अरेबिक भाषा अनेक देशांमध्ये पोहोचली. अनेक ठिकाणी या भाषेत काही स्थानिक बदल होऊन अरेबिक भाषा निराळ्या नावाने प्रचलित झाली. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.