कुतूहल : पर्यावरणपूरक पर्यटन

भारतात किंवा विदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षांनुवर्षे वाढतेच आहे.

संग्रहित छायाचित्र

 

पर्यावरणपूरक वा निसर्गस्नेही पर्यटन- म्हणजेच ‘इको टुरिझम’ हा अलीकडच्या काळात उदयास आलेला पर्यटन व्यवसाय झाला आहे. भारतात किंवा विदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षांनुवर्षे वाढतेच आहे. त्यातही निसर्गस्नेही पर्यटनाकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

सुरुवातीच्या काळात निसर्गस्नेही पर्यटनासाठी जाणारे पर्यटक हे कोणत्याही प्रकारच्या शहरी सुखसोयींची अपेक्षा न ठेवता, केवळ पर्यावरणाचा, निसर्गसौंदर्याचा, सजीव सृष्टीचा पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने आस्वाद घ्यावा, निसर्गाशी काही काळ तरी एकरूप व्हावे किंवा निसर्गाचा अभ्यास करावा याच हेतूने जात असत. परंतु हळूहळू या मानसिकतेत बदल होत गेले. पर्यटकांना आधुनिक, शहरी सुखसोयींची गरज भासू लागली. सुरुवातीला जंगलांमध्ये भटकंती करणे, अन्न व अगदी मूलभूत सोयी उपलब्ध करून देणे यासाठी स्थानिक वनवासी समाजाला मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. यातून नैसर्गिक वैभव अबाधित राहील आणि त्याचबरोबर या वनवासींच्या उदरनिर्वाहाचीदेखील सोय होईल, असा यामागे हेतू होता. शिवाय त्यांना जंगलांचा कानाकोपरा माहिती असतो, तेथील वन्य पशुपक्ष्यांच्या दिनक्रमाशी ते पूर्णपणे समरस झालेले असतात. त्यामुळे पर्यटकांना योग्य वेळी योग्य स्थळी ते घेऊन जाऊ शकतील आणि प्राण्यांना अजिबात त्रास न देता पर्यटकदेखील त्या प्राण्यांचे निरीक्षण करू शकतील, अशी ही सोय होती.

पण काळाच्या ओघात ‘इको टुरिझम’ची ही मूळ संकल्पना मागे पडून पर्यटकांना अत्याधुनिक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. पर्यटकांना राहण्यासाठी वातानुकूलित तारांकित हॉटेल्स उभारली गेली, वन्य प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी थेट त्यांच्या अधिवासांपर्यंत चारचाकी गाडीने जाता यावे म्हणून डांबरी रस्ते बांधण्यात आले. मात्र यामुळे तेथील परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो आहेच; शिवाय स्थानिक आदिवासी किंवा परिसरातील गावकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत नैसर्गिक संसाधनांपासून वंचित राहावे लागत आहे. काही अपवाद वगळता, या क्षेत्रात व्यवसाय करणारे उद्योजक ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी मोठाल्या, रंगीबेरंगी जाहिराती करतात आणि शहरातील जवळपास सर्वच सोयीसुविधा जंगलांमध्ये देऊ करतात. बहुसंख्य पर्यटक हे अशा जाहिरातींमुळे आकृष्ट होतात. यात भर म्हणजे, हळूहळू स्थानिक आदिवासींना दूर करून अननुभवी मार्गदर्शकांचा एक वर्गच तयार झाला आहे. अगदी २० फुटांवरून वाघ दाखवू, हत्ती जवळून दाखवू, अशी आमिषे दाखवून केवळ पैसे उकळण्यासाठी पर्यटकांना आकर्षित केले जाते.

हे सारे पाहता, ‘इको टुरिझम’ची संकल्पना योग्य पद्धतीने राबवायची असेल, तर पर्यटकांना आणि त्याचप्रमाणे व्यावसायिकांनादेखील योग्य प्रशिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे.

– प्रा. विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on eco tourism abn