पावसाळा अजून लांब आहे, परंतु आता हळूहळू पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला लागले आहे. या दुर्भिक्षावर उपाय म्हणून ‘वर्षां- जलसंधारणा’चा विचार सुरू होईल, त्यावर चर्चा सुरू होतील. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून (ग्रामपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका, आदी) पुरवण्यात येणारे पाणी पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीच्या योजनेतूनच मिळत असत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पावसाचे पाणी जमिनीवर विविध पद्धतींनी अडवून, साठवून ते वापरण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे ‘वर्षां-जलसंधारण’ होय. यालाच ‘रेन-वॉटर हार्वेस्टिंग’ असे म्हणतात. एका अर्थी ही पावसाच्या पाण्याची शेतीच आहे! कारण यात पावसाचे पाणी जमिनीमध्ये ‘पेरले’ किंवा ‘मुरवले’ जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील हिवरे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार, राळेगणसिद्धीचे पद्मभूषण अण्णा हजारे किंवा रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले राजस्थानचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी आपापल्या भागात पावसाच्या पेरणीचे असे प्रयोग यशस्वीपणे करून सिद्ध केले. पावसाच्या पेरणीमुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करता येते, हेदेखील त्यांनी दाखवून दिले आहे. वस्त्या, पाडे, गावे, शहरे अथवा महानगरांची निर्मिती होत गेली, तशी- विशेषत: शहरांमध्ये नैसर्गिक, सच्छिद्र जमीन ही डांबर, सिमेंट अशा आच्छादनांखाली झाकून टाकण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. त्याचप्रमाणे वनक्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होऊन वृक्षांचे आच्छादन लुप्त होत गेले. याचबरोबर जमिनीच्या पृष्ठभागाची मोठय़ा प्रमाणात धूप होऊ लागली आणि पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वेगाने वाहून जाऊ लागले. म्हणजेच वाया जाऊ लागले. ‘भारताचे जलपुरुष’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. राजेंद्रसिंह नेहमी सांगतात- ‘‘दौडते हुये पानी को चलना सिखाओ, चलते हुये पानी को रेंगना सिखाओ, रेंगते हुये पानी को रुकना सिखाओ!’’ धावते पाणी रांगायला आणि रांगते पाणी थांबायला लागले, की ते जमिनीत आपोआप मुरायला लागते आणि आपल्या वजनामुळे, गुरुत्वाकर्षण बलामुळे आणि वाहकतेच्या अंगभूत गुणधर्मामुळे आपली वाट शोधत पृथ्वीच्या अंतरंगात विसावते अन् शेवटी खडकांच्या भेगांमध्ये खेळू लागते! संपूर्ण जीवसृष्टीला आणि मानवाला लागणाऱ्या पाण्याचा हाच तर अंतिम स्रोत आहे!

विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on rain water conservation 1 abn
First published on: 06-04-2020 at 00:04 IST