प्राचीन काळी गारगोटी आणि लोखंडाचा तुकडा एकमेकांवर आपटून ठिणगी पाडून आग निर्माण करायची पद्धत होती. अग्नीला आपल्या काबूत आणून स्वसंरक्षण, उष्णता/ उब मिळवणे आणि अन्न शिजवणे याकरिता त्याचा उपयोग करायला सुरुवात प्राचीन काळीच झाली. परंतु हवी तेव्हा, चटकन आणि सुरक्षितरीत्या आग पेटवण्याची कुठलीच सोय सतराव्या शतकापर्यंत उपलब्ध नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॉस्फरसच्या शोधानंतर लगेचच म्हणजे १७७०च्या सुमारास, गरज पडेल तेव्हा आग निर्माण करण्याच्या उद्देशाने आगकाडय़ांचा शोध लागला. सुरुवातीला कागदाच्या पट्टय़ांना फॉस्फरस लावून एका काचेच्या डबीत बंद केल्या जात असत. आग निर्माण करायची असेल तर ही काचेची डबी फोडायची, हवा आत गेली की फॉस्फरसची अभिक्रिया होऊन कागद  पेट घेत असे. त्यानंतर सल्फरचा गुल लावलेल्या लाकडाच्या काडय़ांबरोबर एका काचेच्या बंद डबीत पांढरा फॉस्फरस वेगळा दिला जात असे. काडी फॉस्फरसमध्ये बुडवून हवेत धरली की हवेतील ऑक्सिजनमुळे फॉस्फरस पेट घेई आणि त्या उष्णतेने सल्फर आणि लाकूडही जळायला लागून ज्योत निर्माण होई.

आधुनिक आगकाडय़ांसारख्या घर्षणाने पेट घेणाऱ्या आगकाडय़ा १८३०च्या दशकात तयार झाल्या. काडीच्या गुलात फॉस्फरस, सल्फर आणि पोटॅशिअम क्लोरेटचे मिश्रण वापरले जाई. या काडय़ा कुठल्याही खडबडीत पृष्ठावर घासल्या तरी पेट घेत. चार्ली चॅप्लिनच्या सिनेमांमध्ये यावर आधारित असलेल्या गमतींची काही दृश्ये होती. चॅप्लिनचा गमतीचा भाग सोडला, तरी या आगकाडय़ांमुळे बरेच अपघात होत असत. यावर उपाय म्हणून १८७० मध्ये पांढऱ्या फॉस्फरसऐवजी तांबडय़ा फॉस्फरसचा उपयोग करून सध्या वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित आगकाडय़ा तयार केल्या. तांबडय़ा फॉस्फरसच्या या काडय़ा विशिष्ट पृष्ठभागावर घासल्याशिवाय पेट घेत नाहीत. आणि त्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते. याशिवाय तांबडय़ा फॉस्फरसचा ज्वलनांक (२६० अंश सेल्सिअस) पांढऱ्या  फॉस्फरसपेक्षा (३० अंश सेल्सिअस) अधिक असतो. अपघातांबरोबरच आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांसाठी पांढऱ्या फॉस्फरसच्या वापरावर बंदी घालण्यात आली. पांढऱ्या फॉस्फरसच्या वाफा श्वसनाद्वारे शरीरात जाऊन कारखान्यातील कामगारांना ‘फॉसी जॉ’ नावाचा जबडय़ाची हाडे ठिसूळ करणारा दुर्धर रोग जडत असे. आत्ता उपलब्ध असलेल्या आगकाडय़ा अधिक सुरक्षित आहेत. यात तांबडा फॉस्फरस आणि सल्फरच्या मिश्रणाऐवजी पोटॅशियम क्लोरेट आणि फॉस्फरस सेस्क्वि सल्फाइड वापरले जाते.

-योगेश सोमण

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on phosphorus chemical element
First published on: 22-03-2018 at 03:11 IST