डॉ. बाळ फोंडके
शेतकरी चांगल्या बियाण्याची पेरणी करतो. त्याला पाणी देतो. त्यातून रोपे तयार झाली की त्यांना खतपाणी देतो, निगराणी राखतो. पण पीक भरात येऊ लागले की कित्येक वेळा त्यावर कीटकांची, कृमींची धाड पडते. उभे पीक मातीमोल होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी त्याच्यावर रासायनिक कीटकनाशकाचा फवारा मारणे अगत्याचे होऊन बसते. त्या रसायनाचा अवजड भारा पाठीवर घेऊन शेतकरी पिकावर तो फवारा मारण्यासाठी सिद्ध होतो. हे काम कष्टाचे तसेच खर्चीकही असते. त्यावर तोडगा काढण्याचा विडा बंगळूरुच्या जयसिंह राव यांनी उचलला. सुरुवातीला त्यांनी एका ड्रोनला शक्तिशाली कॅमेऱ्याची जोड देऊन शेतातल्या उभ्या पिकाची पाहणी केली. ड्रोन प्रत्येक रोपावर भरारी मारून त्याच्या स्थितीची माहिती देत होता. त्यातून एक बाब प्रामुख्याने पुढे आली. कीटकांचा हल्ला सर्वच रोपांवर सारखा होत नव्हता. काही रोपे त्याच्यापासून बचावली होती. पण शेतकऱ्याला त्याची माहिती नसल्याने तो सर्वच रोपांवर कीटकनाशकाचा सारखाच फवारा मारतो. त्यामुळे निरोगी रोपांनाही विनाकारण कीटकनाशकाचा मारा सहन करावा लागत होता. त्या घातक रसायनाचे अंश त्या रोपात राहून अंतिमत: ग्राहकाच्या गळी उतरत होते.
हेही वाचा: कुतूहल : नव्या प्रतिजैविकांच्या शोधात ‘एआय’
ते टाळायचे तर ज्या रोपांवर कीटकांची अवकृपा झाली आहे अशांनाच कीटकनाशकाची मात्रा देणे आवश्यक होते. ते साध्य करण्यासाठी राव यांनी त्या ड्रोनला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिली. त्यातून एकेका पिकाची सखोल पाहणी करणे शक्य झाले. ज्या रोपांना कीटकांची लागण झाली होती त्याची नोंद घेतली जाऊन ती माहिती त्याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आज्ञावलीद्वारे त्याच्याशी निगडित पंपाला दिली जात होती. तो कार्यान्वित होऊन त्या पिकावर कीटकनाशकाचा झोत टाकला जात होता. कीटकाच्या उपसर्गाचे प्रमाण मोजण्याचीही व्यवस्था केली गेली असल्यामुळे कीटकनाशकाच्या फवाऱ्याचे प्रमाणही निश्चित करणे त्या आज्ञावलीद्वारे साध्य होत होते. पाहा, निवडा, फवारा असेच या प्रणालीचे बारसे केले गेले आहे.
विदर्भातील अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडे याची चाचणी घेतल्यानंतर आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील पाचशे शेतकऱ्यांनी या प्रणालीचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे.
डॉ. बाळ फोंडके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org