बिपीन देशमाने
आपल्याला एखादा जंतूजन्य आजार होतो. डॉक्टर आपल्याला अँटिबायोटिक (प्रतिजैविक) घ्यायला सांगतात. हे प्रतिजैविक शरीरात शिरलेल्या रोगजंतूंना मारून टाकते. आपण आजारातून बरे होतो. हल्ली आपण डॉक्टरांकडून आणि अनेक रुग्णांकडून असेही ऐकतो की अलीकडे रोगजंतू प्रतिजैविकाला दाद देईनासे झाले आहेत! मग डॉक्टर दुसरे प्रतिजैविक सुचवतात. काही रोगजंतू तर वीस-बावीस प्रतिजैविकांनादेखील दाद देत नाहीत! अशा नाठाळ रोगजंतूंना आवरायचे कसे? एखाद्या रुग्णाला अशा रोगजंतूने गाठले असेल तर त्याच्याकडे मृत्यूला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. जगात दरवर्षी बारा लाखापेक्षा जास्त रुग्ण अशा रोगजंतूंमुळे मृत्युमुखी पडतात. २०५० पर्यंत हा आकडा एक कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कित्येक वर्षांत नवीन प्रतिजैविकाच्या शोधाचा पाळणा हललेला नाही. त्यामुळे आत्ता हालचाल केली नाही तर पुढे भीषण परिस्थिती ओढवेल. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेतील (‘एआय’मधील) यंत्र शिक्षण प्रणाली मदत करीत आहे!

सूक्ष्मजीव जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आढळतात. हे सूक्ष्मजीव रोगजंतूविरोधी काही प्रथिने तयार करीत असतील का याचा शोध यंत्र शिक्षण प्रणाली वापरून शास्त्रज्ञांनी घेतला. जवळजवळ नव्वद लाख रोगजंतू-विरोधी प्रथिने ही सूक्ष्मजीव मंडळी तयार करत असतील असा अंदाज वर्तवण्यात आला. या सूक्ष्मजीवांचा ज्या ठिकाणी अधिवास आहे अशा ७२ विविध अधिवासांतील सूक्ष्मजीवांच्या जिनोमचा अभ्यास केला. त्यातील जवळजवळ ८७,९२० जिनोममध्ये अशा रोगजंतू-विरोधी जनुकांचा सुगावा लागला.

हेही वाचा : कुतूहल: नवीन औषध निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्ता

या जनुकांची माहिती वापरून शास्त्रज्ञांनी १०० प्रथिने प्रयोगशाळेत तयार केली. त्यापैकी ७९ प्रथिने रोगजंतूंविरुद्ध कार्य करण्यास सक्षम आहेत असे आढळले. ही प्रथिने प्रतिजैविक-प्रतिरोधक रोगजंतूंनासुद्धा यमसदनी पाठवण्याचे काम चोख बजावतात. ही प्रथिने या रोगजंतूंच्या बाहेरच्या पेशीआवरणावर हल्ला चढवतात. त्याचे तुकडे करतात. त्यामुळे रोगजंतू मरतात. यापैकी काही प्रथिनांचा अभ्यास रोगजंतूग्रस्त झालेल्या मूषकांवरही केला आहे. ही नवीन प्रतिजैविके जेव्हा अशा उंदरांना देण्यात आली, त्यावेळी त्यांच्यातील रोगजंतूंचे प्रमाण हजारपटीने घटले! नवे प्रतिजैविक शोधायचे काम अतिशय जटिल, जिकिरीचे, कष्टाचे, वेळकाढू असते. काही वेळा दहा वर्षांहून अधिक काळ लागतो. एवढे करूनही यश मिळेलच असे नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हेच काम काही दिवसात होऊ शकते! यश मिळण्याची शक्यताही प्रचंड वाढते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिपीन देशमाने
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org