इंटरनेटने वृत्तपत्र, रेडिओ, दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांना एका अर्थाने गिळंकृत केले असे म्हटले जाते. तसेच काहीसे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ग्रंथालयाचे होईल का, असा प्रश्न साहजिकच पुढे येत आहे. सध्याचे युग महाकाय माहितीसाठ्याचे (बिग डेटा) आहे, तर आगामी युग ‘विश्वसनीय माहितीसाठ्याचे’ असेल. या संदर्भात मजकूर वाचत, बघत किंवा ऐकत असताना, त्याचा जमेल तितका वास्तविक अनुभव वाचकाला देणे आवश्यक ठरू शकेल. कारण तशी मागणी भविष्यात होणार आहे. उदाहरणार्थ, गिर्यारोहणाचे वर्णन वाचताना ते प्रत्यक्षात जाणवणे आवश्यक आहे. असे आभासी वास्तव (व्हर्चुअल रिएलिटी) निर्माण करणारे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रगत होत आहे. ग्रंथालये त्याचा कल्पकतेने वापर करून आपले महत्त्व टिकवून ठेवू शकतात.

हेही वाचा >>> कुतूहल : ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता – माहितीसाठ्याचे विश्लेषण

मानवी भाषेचा संदर्भानुसार अर्थ लावण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या उपकरणांना किंवा प्रणालींना दिली जात असल्याने साहित्याचे तालिकीकरण, निर्देशक सूची निर्मिती आणि विषय विश्लेषण अशी ग्रंथालयातील अंतर्गत तांत्रिक कामे त्यांना जमू शकत आहेत. त्यामुळे वाचकाला त्याच्या गरजेनुसार संदर्भ सुचवणे आणि त्याचा सारांश देणे ही सेवा अशा प्रणाली पुरवू शकतात. ग्रंथालयात उपलब्ध साहित्याची नेमकी शिफारस करणाऱ्या अशा प्रणाल्या वाचकांत लोकप्रिय होत आहेत. कारण त्यांना पाहिजे त्या विशिष्ट विषयावर किमान मूलभूत माहिती वेचून मिळाल्यामुळे ग्रंथालयाचा महाकाय माहितीसाठा शोधण्याचा त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात. त्याशिवाय प्रत्येक पुस्तक पूर्वी किती वाचकांनी वापरले आहे याचा लेखाजोखादेखील ठेवल्यामुळे साहित्याचे मूल्यमापन करण्यास मदत होते. तसेच भविष्यात कशा प्रकारची ग्रंथसंपदा समाविष्ट केली जावी याबद्दल ग्रंथपालांना मार्गदर्शन मिळते. ग्रंथालयातील बहुतांश साहित्य वापरले जाण्याची शक्यताही त्यामुळे वाढते.

हेही वाचा >>> कुतूहल: ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता : वर्गीकरण, यांत्रिक हात!

ग्रंथालय सुरक्षा यातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. यंत्रमानवसदृश व्यवस्था प्रत्येक वाचकाची ओळख चेहरा, डोळे यांची ठेवण किंवा इतर विशिष्ट पदचिन्हांनी ठेवते आणि अनोळखी व्यक्तीस सहजासहजी ग्रंथालयात किंवा अनुमती नसलेल्या साहित्य विभागात प्रवेश देत नाही, तसेच साहित्याची देव-घेव प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडते.

एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साथीने ग्रंथालये, खासकरून मोठी ग्रंथालये, त्यांची ग्रंथ व माहिती संस्करणाची आव्हानात्मक कामे सुरळीतपणे पार पाडणे, वाचकांना नव्या सेवा देणे आणि त्यांना ग्रंथालयातील माहितीचा अनुभव देऊन नियमितपणे ग्रंथालयाचा वापर करण्यास उद्याुक्त करणे अशा गोष्टी साध्य करू शकतात. मात्र त्याचबरोबर वाचकांची वैयक्तिक माहिती गोपनीय राहील आणि जबाबदारीने वापरली जाईल हे बघणे आवश्यक आहे.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org