साध्या यंत्रमागावर विणकराला बरीच कामे स्वत: करायला लागतात. ही कामे म्हणजे कांडी संपल्यावर बदलणे, यंत्रमाग चालू असताना तुटलेला ताणा किंवा बाणा शोधून जोडणे, ताणा सोडण्याच्या यंत्रणेची वजने गरजेनुरूप सरकवणे इत्यादी. या सर्वामध्ये विणकराची तत्परता आणि कार्यक्षमता पणाला लागते. प्रत्येक कामासाठी यंत्रमाग बंद करून चालू करावा लागतो, त्यामुळे उत्पादन घटते. शिवाय कापडामध्ये काही दोष येऊ शकतात. यासाठी जास्तीत जास्त चार यंत्रमाग एक विणकर चालवू शकतो. त्यामध्ये वाढ केल्यास उत्पादनात घट येते, असा अनुभव आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे. म्हणून स्वयंचलित यंत्रमागांची निर्मिती झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्वयंचलित यंत्रमागामध्ये कांडीवरील धागा संपल्यावर तो बदलण्याची यंत्रणा बसवलेली असते. त्याकरिता यंत्रमाग न थांबवता कांडीबदल होतो आणि उत्पादन सलग चालू राहाते. यासाठी या मागाच्या एका बाजूला सुताने भरलेल्या अनेक कांडय़ा लावलेली अडणी असते. चालू कांडीवरील सूत संपत आले की यांत्रिक व्यवस्थेद्वारे या अडचणीचे कार्य सुरू होते. आणि धोटय़ातील कांडीवर दाब देऊन ती खाली ट्रेमध्ये पडते. त्या कांडीच्या जागी भरलेली कांडी बसवली जाते. (या अडणीऐवजी मोठी पेटी बसवण्याची पद्धतही वापरली जाते.)
ताणा सोडण्यासाठी पण स्वयंचलित यंत्रणा या मागावर बसवलेली असते. पूर्वीच्या मानवी नियंत्रणातील चुका किंवा त्रुटी टाळून कापड एकसारखे विणायला या स्वयंचलित यंत्रणेमुळे सुलभ होते, तसेच विणकराचे आणखी एक काम कमी होते. याचप्रमाणे ताण्याचा एखादा धागा तुटला तर कार्यान्वित होणारी ताणा विराम यंत्रणा या मागावर बसवलेली असते. विणकराने ताण्याचा धागा जोडायचा असला तरी ते काम कमी वेळात होते. या यंत्रणेमुळे कापडात येणारी उभी चीर टाळता येते. एखादा ताण्याचा धागा तुटला तर या यंत्रणेमुळे माग बंद पडतो आणि तुटलेला धागा जोडल्यावर चालू होतो.
याशिवाय कांडी संपण्यापूर्वी ती बदलण्याचे कार्य वेळेत करण्यासाठी वेफ्ट फिलर (यांत्रिक) किंवा इलेक्ट्रॉनिक यंत्रणा (सेन्सर) बसवलेली असते. याखेरीज किनारीबाहेरील जास्तीचा धागा कापण्यासाठी कटरही बसवलेला असतो. स्वयंचलित यंत्रमागामध्ये आणखी काही प्रकार आहेत, पण हाच सर्वात जास्त वापरला जाणारा यंत्रमाग आहे.

महेश रोकडे (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Automatic machine
First published on: 27-07-2015 at 12:50 IST