दक्षिण आणि मध्य अमेरिकेत, प्राचीन काळात विकसित झालेल्या सुप्रसिद्ध माया संस्कृतीचा विस्तार झाला तो प्रदेश प्रामुख्याने सध्याच्या बेलीझ या मध्य अमेरिकेतील छोट्या देशात समाविष्ट होता. स्पॅनिश आक्रमकांनी माया संस्कृतीचा विध्वंस केला. बेलीझ देशाच्या उत्तरेला मेक्सिको, दक्षिण आणि पश्चिमेला ग्वाटेमाला हा देश आणि पूर्वेला कॅरिबियन समुद्र आहे. मध्य अमेरिका खंडाच्या पूर्व समुद्र किनारपट्टीवरच्या बेलीझचा उल्लेख १९७३ पर्यंत ‘ब्रिटिश होंडुरास’ या नावाने होत असे. त्या काळात हा प्रदेश ब्रिटिशांची वसाहत होता. २१ सप्टेंबर १९८१ रोजी स्वातंत्र्य मिळवून बेलीझ या नावाने हा सार्वभौम नवदेश उदय पावला. परंतु त्यानंतर राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व राखून या देशाने ब्रिटिशांशी सौहार्दाचे संबंध कायम राखले आहेत.

बेलीझ सिटी हे या देशाचे मूळचे राजधानीचे शहर. १९६१ सालच्या वादळात या शहराची पूर्ण वाताहत झाल्यावर ब्रिटिशांनी राजधानीसाठी बेल्मोपॅन हे नवीन शहर वसवले. इ.स.पूर्व १५०० ते इ.स. १००० या काळात या प्रदेशात माया संस्कृती वाढली आणि त्यातील इ.स. ६०० ते १००० या काळात येथील माया राजांची बेलीझमध्ये विशेष भरभराट झाली. बेलीझ नदीवरून या देशाचे नाव बेलीझ झाले असावे. माया लोकांच्या भाषेत ‘बेलीक्स’ हा शब्द आहे, त्याचा अर्थ- चिखल भरलेले पाणी.

सोळाव्या शतकात या बेटावर प्रथम स्पॅनिश संशोधक आले. स्पॅनिश प्रथेप्रमाणे या संशोधकांनी या भूमीवर पाऊल ठेवताच ते बेट आपल्या राजाला अर्पण करून ते स्पॅनिश साम्राज्याचा भागच असल्याचे जाहीर केले. परंतु स्पॅनिश लोकांना या भूमीवर वसाहत करणे जमले नाही. साधनांची कमतरता आणि बेलीझ प्रदेशातील युकातान या अत्यंत कडव्या अशा आदिवासींनी केलेले घातक हल्ले यांमुळे स्पॅनिशांना सलग अशी वसाहत बेलीझवर स्थापता आली नाही. या काळात इंग्रज समुद्री चाचे स्पॅनिश मालवाहू जहाजे लुटून आजूबाजूच्या लहान बेटांवर पसार होत. काही ब्रिटिशांनी सतराव्या शतकाच्या मध्यावर या प्रदेशात तुरळक वस्ती केली आणि युकातान आदिवासींशी सुरुवातीपासूनच चांगले संबंध ठेवल्याने त्यांना त्यांचा विरोधही सहन करावा लागला नाही. – सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com