scorecardresearch

भाषासूत्र : इंग्रजीतून आलेले तत्सम, तद्भव

तत्सम आणि तद्भव या संज्ञा अनुक्रमे ‘संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द’ आणि ‘संस्कृत शब्दांत काही बदल होऊन मराठीत रूढ झालेले शब्द’ यासाठी योजल्या जातात.

भाषासूत्र : इंग्रजीतून आलेले तत्सम, तद्भव

वैशाली पेंडसे-कार्लेकर

तत्सम आणि तद्भव या संज्ञा अनुक्रमे ‘संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द’ आणि ‘संस्कृत शब्दांत काही बदल होऊन मराठीत रूढ झालेले शब्द’ यासाठी योजल्या जातात. पण आता या संज्ञा इंग्रजीसारख्या इतर कोणत्याही भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांसाठी विस्तारायला हव्यात असं वाटतं.

इंग्रजांशी संपर्क आल्यानंतर अनेक इंग्रजी शब्द मराठीत आले. इंग्रजीमधील अ‍ॅ, ऑ मराठीत नसल्याने पूर्वी ब्यांक, ब्याट, डाक्टर असे उच्चार आणि लेखन होत असे. तेव्हापासून आजपर्यंत मराठीत स्थिरावलेल्या इंग्रजी शब्दांचे तत्सम आणि तद्भव असे वर्गीकरण करून पाहू. तद्भव शब्दांमध्ये दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे तिजोरी (ट्रेझरी), पलटण (प्लाटून), फलाट (प्लॅटफॉर्म), बाटली (बॉटल) असे रूपात बदल होऊन आलेले शब्द आणि दुसरा म्हणजे कप, टेबल, पेन, शर्ट यांसारखे रूपात बदल न होता पण मराठी पद्धतीने लिंग, वचन आणि सामान्यरूप होणारे शब्द. हे इंग्रजी तद्भव शब्द अनौपचारिक बोलण्याबरोबरच लेखननियम पाळून औपचारिक लेखनातही स्थिरावलेले दिसतात.

मराठीतल्या इंग्रजी तत्सम शब्दांचं उदाहरण म्हणजे बस, कुकर, फोन, कार, ई-मेल, कॉम्प्युटर, ऑफिस, बिल्डिंग, हॉस्पिटल असे अनेक शब्द. यातले बहुतेक शब्द नंतरच्या काळात मराठीत आले. यांना तत्सम म्हणण्याचं कारण म्हणजे या शब्दांचं लिंग ठरवता आलं तरी पूर्वीच्या इंग्रजी शब्दांप्रमाणे आपण बहुतेक जण त्यांचं सामान्यरूप आणि अनेकवचन करत नाही. उदा. कार – कारी (अनेकवचन), कारी-ला (सामान्यरूप). थोडक्यात अशा इंग्रजी शब्दांमध्ये आता आपण मराठीचे नियम लावून बदल करत नाही. त्यामुळेच हे इंग्रजी तत्सम शब्द बोलण्यात मोठय़ा प्रमाणावर स्थिरावले असले तरी औपचारिक लेखनात त्यांना कोणते लेखननियम लावावेत याबाबत संदिग्धता आहे. या नवतत्सम शब्दांना मराठी करून घ्यायला त्यांना मराठीचे नियम लावायला हवे का? की त्यांच्यासाठी वेगळे नियम किंवा अपवाद करावे लागतील? की त्यांची इंग्रजीतली कार्स, ई-मेल्स, कॉम्प्युटर्स अशी रूपं मराठीतही स्वीकारावीत? तुम्हाला काय वाटतं?

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या