परभाषेतले शब्द, संकल्पना स्वीकारताना ते भाषेचा स्वभाव, उच्चार, व्याकरणिक आचार-विचार यानुसार वळवून घेतले की त्या भाषेत मिसळून जातात. याची आपल्या माहितीतील उदाहरणे म्हणजे हापूस, बटाटा यांसारखे मूळचे पोर्तुगीज शब्द किंवा अजमावणे, छापणे, नावाजणे अशी फारसीतून आलेली काही क्रियापदे. इंग्रजी ‘प्लॅटफॉर्म’साठी फलाट, ‘कॉन्ट्रॅक्ट’साठी कंत्राट, तर टेबल, बँक असे जसेच्या तसे घेतलेले अनेक शब्द मराठीत आहेत. एकूणच भारतीय किंवा परकीय भाषांतून घेतलेले अनेक शब्द मराठीत आहेत, हे आपल्याला माहीत आहेच. काहींसाठी नवीन प्रतिशब्द तयार केले तर काही परकीय शब्दांना मराठीने जसेच्या तसे आपलेसे केले. कोणत्याही भाषेतला बदल आधी बोलण्याच्या भाषेत दिसतो. हा बदल लेखनाच्या भाषेत उशिरा येतो किंवा कधीकधी येतही नाही. बोलताना, विशेषत: अनौपचारिक बोलताना लोक भाषेचा मोकळेपणाने वापर करतात. शब्द, क्रियापदे आणि एकूणच वाक्यरचना व्याकरणानुसार असतेच असे नाही. त्याशिवाय, बोलण्याच्या भाषेवर घरात किंवा परिसरात बोलल्या जाणाऱ्या इतर भाषा, मित्रमंडळींची भाषा, व्यवसाय-शिक्षणाची भाषा यांतल्या विविध भाषांचा किंवा आपल्याच भाषेच्या विविध बोलरूपांचा, त्यांच्या प्रादेशिक लकबींचा परिणाम होत असतो. अर्थात ही नैसर्गिक बाब आहे. पण यातून बोलण्याची भाषा विशेषत: नवीन पिढीची भाषा वेगाने बदलत राहते. त्या तुलनेत औपचारिक अभिव्यक्ती किंवा लेखनात असा बदल होत नाही. कारण ते बहुतांश वेळी प्रमाणभाषेचे नियम पाळून केले जाते. त्यामुळे जोपर्यंत प्रमाणभाषेच्या नियमांमध्ये बदल होत नाहीत, तोपर्यंत औपचारिक भाषा फारशी बदलत नाही. अनौपचारिक भाषा वेगाने बदलली तर त्यांच्यामधील अंतर मात्र वाढत राहाते. सर्व भाषांमध्ये, बोलण्याची किंवा अनौपचारिक भाषा आणि लेखनाची किंवा औपचारिक भाषा यांत काही अंतर राहाणे गृहीत धरले असतेच. पण जेव्हा हे अंतर मोठय़ा प्रमाणावर वाढते, तेव्हा भाषेमध्ये ताण जाणवू लागतो आणि भाषा टिकवण्यासाठी, ते अंतर कमी करण्यासाठी भाषा अभ्यासकांना भाषेत काही बदलांसाठी विविध प्रकारे प्रयत्न करावे लागतात. परभाषांच्या प्रभावाच्या संदर्भात मराठी भाषेसाठी प्रयत्न करण्याची ती वेळ नक्कीच आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– वैशाली पेंडसे-कार्लेकर

vaishali.karlekar1@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra influence paraphrases foreign languages words concept language temperament ysh
First published on: 12-05-2022 at 00:02 IST