फ्रान्स, जर्मनी आणि हॉलंड यांच्यात वसलेल्या बेल्जियम या छोटय़ा देशाची राजधानी ब्रसेल्स. युरोपीयन युनियनची राजधानी असलेल्या ब्रसेल्समध्ये युरोपीयन युनियनव्यतिरिक्त नाटो आणि इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये आणि कार्यालये आहेत. त्यामुळेच काही वेळा ‘युरोपची राजधानी’ असा उल्लेखही या शहराबाबत केला जातो. प्लेमिश वंशाच्या मूळ रहिवाशांची वस्ती असलेल्या या प्रदेशात सेन नदीकाठी ६९० साली सेंट गेरी याने छोटे चर्च बांधले आणि या ठिकाणाचा उल्लेख प्रथम ‘ब्रोकसेल’ असा केला. जुन्या डच भाषेत या शब्दाचा अर्थ होतो ‘दलदलीतले घर’. ब्रोकसेलचे पुढे ब्रोसेला आणि त्यानंतर ब्रसेल्स झाले. दहाव्या शतकाच्या अखेरीस लोथिरजीआचा सरदार चार्ल्स याने येथे आपले राज्य वसवल्यावर ब्रसेल्सचा विकास भराभर होत गेला. १२, १३ आणि १४ व्या शतकात ब्रेबांट घराण्याची इथे सत्ता होती. ब्रेब्रांट राजांनी ब्रसेल्स ही आपली राजधानी करून इथला व्यापार वाढवून आíथक व्यवस्था भक्कम केली. सोळाव्या शतकात युरोपात जॉन कॅलव्हीन या समाज आणि धर्मसुधारकाने जी चळवळ सुरू केली तिच्या अनुयायांना कॅल्व्हिनिस्ट म्हटले जाते. या शतकाच्या उत्तरार्धातील चाळीस वष्रे या कॅल्व्हिनिस्ट लोकांचे सरकार ब्रसेल्समध्ये होते. १६९५ साली फ्रान्सचा राजा लुई सोळाव्याने ब्रसेल्सवर हल्ला करून शहरातल्या प्रमुख इमारती, प्रसिद्ध चौक ग्रॅण्ड पॅलेस उद्ध्वस्त केले. परंतु त्याला शहर घेता आले नाही. पुढे १८३० साली तत्कालीन ब्रसेल्सचा राज्यकर्ता राजा विल्यम याच्या विरुद्ध मोठे बंड होऊन लिओपर्ड प्रथम याला बेल्जियमच्या राज्याचा सम्राट म्हणून नियुक्त केले गेले. या काळात ब्रसेल्सची लोकसंख्यावाढ होऊन १८४६ मध्ये ती सव्वा लाख झाली. विसाव्या शतकातील दोन्ही महायुद्धांच्या काळात जर्मनीने ब्रसेल्सचा ताबा घेतला होता. महायुद्धानंतर विसाव्या शतकात बेल्जियममध्ये सांविधानिक राजेशाही सरकार स्थापन झाले. सध्या ब्रसेल्सची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक असून तिथे फ्रेंच आणि डच भाषा बोलल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

राखेचे स्थिरीकरण

औष्णिक वीज प्रकल्पामध्ये कोळसा प्रचंड प्रमाणावर जाळला जातो आणि त्या प्रमाणात राखेची निर्मिती होते. ही राख साठवून ठेवून नंतर सिमेंट, विटा, रस्ते, कण मातीतली शेती इत्यादींसाठी वापरता येते; परंतु निर्मितीपासून वापरात आणण्याच्या दरम्यानचा साठवणीचा काळ मोठा असू शकतो. साठवून ठेवलेली राख वाऱ्यावर उडून आसपासच्या वस्तीवर, शेतावर, फळबागांवर पडली तर लोकांना श्वसनाचे रोग होतात, पिकांचे नुकसान होते. जवळपासच्या जलप्रवाहांत पोहोचल्यास पाणी दूषित होते, माशांच्या पदाशीवर दुष्परिणाम होतो. यासाठी साठवलेल्या राखेचे स्थिरीकरण करणे महत्त्वाचे असते.

साठवलेल्या राखेची समस्या किती मोठी असते ते समजण्यासाठी पुढील आकडेवारी उपयुक्त ठरावी. पाचशे मेगावाट वीजनिर्मितीसाठी सुमारे आठ हजार टन कोळसा जाळला जातो. भारतात कोळशाचा साठा भरपूर आहे, पण त्यात तीस ते तेहतीस टक्के राख असते. म्हणजेच दररोज दोन ते अडीच हजार टन राख निर्माण होते. ती साठवण्यासाठी जे खड्डे खणतात ते दहा ते तीस हेक्टर क्षेत्रफळाचे, दोन ते तीन मीटर खोल असे असावे लागतात. त्यात ओतलेली राख कोरडी पडल्यावर वाऱ्यामुळे उडून परिसरातल्या शेतांवर, मळ्यावर, वस्तीवर, वनांवर पडून प्रदूषण होते. वस्तीत श्वसनाचे रोग सुरू होतात.

प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोत्तम आणि कमी खर्चाचा उपाय म्हणजे झाडे लावून राख बांधून ठेवणे, राखेचे स्थिरीकरण करणे; पण झाडे वाढवण्यात मोठी अडचण म्हणजे ज्वलनाच्या हजार-बाराशे अंश उष्णतेनंतर राखेत नायट्रोजनचे प्रमाण शून्य असते. शिवाय त्या राखेवर वृक्षसंवर्धन करणे सोयीचे नसते, कारण वेळोवेळी राख खड्डय़ातून काढून सिमेंटच्या/ विटांच्या कारखान्यात न्यायची असते. त्यामुळे वृक्षांना धोका संभवतो. कमी खर्चाचा, सोपा उपाय हा गवताचे आच्छादन तयार करणे. त्यामुळे राख उडणार नाही,

नायट्रोजनविरहित राखेवर हिरवळ वाढवण्यासाठी शेणखताचा सडा टाकून परिसरात वाढणारे गवत आणि इतर झुडपे राखेवर पसरावी. एक-दोन पावसाळे गेल्यावर राखेचे मोठे क्षेत्र हिरवळीने झाकलेले दिसते, इतकेच नव्हे तर अनेक प्रकारच्या वनस्पती, लव्हाळीही वाढताना दिसतात. त्यावर जगणारे कीटक, कृमी यांची परिसंस्था निर्माण झालेली आढळते. जवळच्या वस्तीतील नागरिक दमा-अस्थम्यापासून वाचतात.

प्रा. शरद चाफेकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brasel
First published on: 06-09-2016 at 03:40 IST