डॉ. मोनाली संदीपकुमार साळुंखे
कार्बन फूटप्रिंट म्हणजे मानवी कृतीमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होणारे एकूण हरितगृह वायूचे उत्सर्जन होय. हरितगृह वायू वातावरणातील उष्णता शोषून घेतात आणि ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर परत पाठवतात, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. उद्याोग, वाहतूक, शेती, यासारख्या क्षेत्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, हायड्रोफ्लोरोकार्बन, परफ्लोरोकार्बन, नायट्रोजन ट्रायफ्लोराइड, सल्फर हेक्झाफ्लोराइड हे हरितगृह वायू वातावरणात मिसळत असतात. याचा थेट परिणाम हवामानबदल आणि परिसंस्थांच्या असंतुलनात दिसून येतो.
जागतिक तापमानवाढ इ. स. १८०० च्या तुलनेने १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ न देण्यासाठी २०३० पर्यंत उत्सर्जन ४५ टक्क्यांनी कमी करणे आणि २०५० पर्यंत निव्वळ शून्यावर पोहोचणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, निव्वळ शून्य म्हणजे उत्पादित होणाऱ्या हरितगृह वायूचे प्रमाण आणि वातावरणातून काढून टाकल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण यांतील संतुलन राखणे.
हरितगृह वायू वाढीची समस्या सोडविण्यासाठी उपाय शोधताना मूलभूत असलेल्या एका महत्त्वाच्या घटकाकडे आपण दुर्लक्ष करतो, तो म्हणजे ‘सूक्ष्मजीव’. सूक्ष्मजीव हे पृथ्वीच्या परिसंस्थेत कार्बनचक्राचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मातीतील जिवाणू, बुरशी आणि आदिजीव हे सेंद्रिय पदार्थांचे अपघटन करून त्यातील कार्बन परत हवेमध्ये किंवा जमिनीत सोडतात. याला ‘कार्बन सिंक’ असे म्हणतात. याच वेळी, काही सूक्ष्मजीव कार्बन स्थिरीकरण प्रक्रियेमध्ये भाग घेऊन वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी करण्यात मदत करतात.
विशेषत: प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून कार्बनचे शोषण करणारे समुद्रातील सूक्ष्म प्लवक पृथ्वीवरील कार्बनच्या एकूण शोषणात फार मोठा वाटा उचलतात. मातीतील वाढलेला कार्बनसंचय मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीस आणि प्रक्रियांना प्रोत्साहन देतो.
कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करता येण्याच्या शक्यता खूप मोठ्या आहेत. अॅझोटोबॅक्टर किंवा मायकोरायझा यांसारखे काही विशिष्ट जिवाणू मातीची संरचना सुधारतात आणि वनस्पतींना जास्त प्रमाणात कार्बन शोषणास सक्षम करतात; त्यामुळे शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवता येते. या प्रक्रियेमुळे कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायूचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते.
जागतिक पातळीवर ‘कार्बन कॅप्चर’ किंवा ‘मिथेन कॅप्चर’ या संकल्पनांचा अभ्यास करताना सूक्ष्मजीव अत्यंत गरजेचे मानले जातात. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर जैविक इंधनात करण्यासाठी ‘मायक्रोअल्गी’ (सूक्ष्म आकाराचे शैवाल)चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी तर केवळ सूक्ष्मजीवांवर आधारित नैसर्गिक उपाययोजना करायला हव्यात.
– डॉ. मोनाली संदीपकुमार साळुंखे, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org