संगणकाकडून आज्ञापालन करून घेण्यासाठी, त्याला देण्याच्या आज्ञा या त्याला समजणाऱ्या भाषेतून द्याव्या लागतात. संगणकाचे आज्ञापालन हे त्याच्याकडील हजारो-लाखो विद्युत मंडलांच्या उघडझापेद्वारे होते. विद्युत मंडलांना उघडझाप करण्याचे आदेश ज्या भाषेद्वारे दिले जातात, ती भाषा ‘शून्य’ (म्हणजे बंद) आणि ‘एक’ (म्हणजे चालू) या दोनच आकडय़ांवर आधारलेली द्विमान (बायनरी) भाषा असते. त्यामुळे संगणकाला पुरवायची आज्ञावली हीसुद्धा संपूर्णपणे द्विमान (बायनरी) भाषेत लिहावी लागते. सन १९४६ साली कार्यान्वित झालेल्या पहिल्या ‘एनिअ‍ॅक’ या संगणकाला सुरुवातीच्या काळात ही द्विमान आज्ञावली थेट वायिरगमध्ये बदल करून पुरवावी लागत असे. त्यामुळे दोन आज्ञावलींच्या वापरादरम्यान काही आठवडय़ांचा काळ जाई. एनिअ‍ॅकचा वापर सुरू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मात्र, ‘आयबीएम’ कंपनी निर्मित कार्ड रीडरमध्ये घातलेल्या कार्डाद्वारे संगणकाला ही आज्ञावली पुरवली जाऊ  लागली. शून्य आणि एक यांपासून बनवलेली ही आज्ञावली कार्डावर, टंकलेखनाच्या यंत्राद्वारे विवक्षित ठिकाणी पाडलेल्या छिद्रांच्या स्वरूपात लिहिली जात असे. छिद्राचा अभाव म्हणजे ‘शून्य’, तर छिद्राचे अस्तित्व म्हणजे ‘एक’. संगणक या छिद्र पाडलेल्या कार्डाचे आपल्याकडील संवेदकांद्वारे वाचन करू लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शून्य आणि एक या आकडय़ांचा वापर करणारी ही भाषा ‘मशीन लँग्वेज’ म्हणून ओळखली जाते. ही भाषा जरी संगणक समजू शकत असला, तरी संगणकासाठी या भाषेत संपूर्ण आज्ञावली लिहिणे हे जिकिरीचे काम आहे. हे काम सुलभ होण्यासाठी अल्पावधीतच वैज्ञानिकांनी ‘असेम्ब्ली लँग्वेज’चा शोध लावला. सर्वसाधारण संगणकतज्ज्ञांना सहज समजू शकणारी ही असेम्ब्ली भाषा ‘असेम्ब्लर’च्या माध्यमातून संगणकालाही कळू शकते. मात्र असेम्ब्ली भाषेची एक मर्यादा ही आहे की, संगणकाच्या प्रत्येक प्रकारानुसार या असेम्ब्ली भाषेत फरक असतो. त्यामुळे आता अशा भाषेची गरज निर्माण झाली होती, की जी संगणकावर अवलंबून नसेल. १९५७ साली ‘फोटर्रन’ या, सर्वाना सहजपणे समजेल तसेच संगणकावर जी अवलंबून नसेल अशा, पहिल्या भाषेची निर्मिती झाली. कम्पायलर सॉफ्टवेअरद्वारे या भाषेचे रूपांतर संगणकाला समजू शकेल अशा भाषेत केले जाऊन संगणक ही आज्ञावली यशस्वीरीत्या अमलात आणू लागला. फोटर्रननंतर ‘कोबोल’, ‘बेसिक’, ‘सी प्लस’ अशा अनेक भाषांची गरजेनुसार निर्मिती होऊन संगणक क्षेत्र भाषासमृद्ध झाले.

 मकरंद भोंसले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer languages computer programming languages zws
First published on: 19-12-2019 at 02:30 IST