आपल्या शरीरात रोगजंतू शिरल्यास ते आपल्या पेशी नाहीत, परक्या आहेत हे शरीरातील विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ओळखतात. परक्या पेशींना आपल्या शरीरात मुक्तसंचार अशक्य केला जातो. शिवाय पांढऱ्या पेशी रोगजंतूविरोधी प्रतिद्रव्ये निर्माण करतात. पारंपरिक पद्धतीने रोगजंतूना मारून किंवा त्यांना जिवंत ठेवून, त्यांची रोगनिर्मिती क्षमता नष्ट करून लस बनविता येते. म्हणजे त्या जंतूला निरुपद्रवी केले जाते किंवा रोगजंतूचा एखादा विशिष्ट तुकडा- प्रतिजन- जनुकीय अभियांत्रिकीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने प्रयोगशाळेत तयार करून तो लस म्हणून वापरला जातो.
पारंपरिक लस निर्मितीला बऱ्याच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे कोविड-१९ सारखा विश्वव्यापी आजार उद्भवल्यावर त्याच्या प्रतिबंधासाठी अतिशय थोड्या वेळात आणि मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली तरच साथीवर नियंत्रण मिळवता येते.
इन्फ्लुएंझाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एम-आरएनएचा वापर करून लस निर्माण करण्याचे प्रयत्न १९९०च्या दशकातच सुरू झाले होते. हे प्रयत्न करणारी जोडी होती कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेत्झमन. पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात काम करत असताना ते २००० साली या विषयाकडे वळले. २०२० मध्ये चिनी शस्त्रज्ञांनी कोविडच्या विषाणूची जनुकीय क्रमवारी (जेनेटिक कोड) जाहीर केली. त्या वेळी हेही कळले होते की, या विषाणूच्या आवरणावर असलेल्या काट्यासारख्या अवयवांच्या (स्पाइक) विरोधात प्रतिपिंडे आपले संरक्षण करू शकतात. लगेचच बायोएन्टेकने फायझर या कंपनीच्या सहकार्याने आणि मॉडर्ना या कंपनीने आपला रोख कोविडच्या स्पाइक प्रथिनाच्या जनुकाकडे वळवला आणि त्यांचा एम-आरएनए वेगळा केला. कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेत्झमन यांनी हे तंत्र आधीच विकसित केलेले असल्यामुळे ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली आणि काही महिन्यांतच कोविडविरोधी एम-आरएनए लस तयार झाली.
भारतीय आरोग्य विभाग, अॅस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी त्वरेने कोव्हिशिल्ड लस निर्मिली. त्यापाठोपाठ ‘भारत बायोटेक’ची कोव्हॅक्सिन लस आली. भारतात १६ जानेवारी २०२१ पासून जगातील सर्वांत मोठे कोव्हिड विनामूल्य लसटोचणी अभियान सुरू झाले. आरोग्यरक्षक, सफाई कर्मचारी आणि सर्वसाधारण नागरिक अशा सुमारे १२० कोटी लोकांनी पहिला डोस घेतला. मूळचा सार्स-कोविड-२ करोना विषाणू सतत उत्परिवर्तित होत सध्या ‘ओमायक्रॉन’ म्हणून ओळखला जातो. विषाणू सतत उत्परिवर्तित होत असल्याने त्यानुसार नवनव्या लशी बनवल्या जातात. जगभर ४० कोटी कोविड रोग्यांना लसीकरणानंतर कमीजास्त प्रमाणात अशक्तपणा, विसराळूपणा, झोपेचा- श्वासाचा आणि मनोविकारांचा सामना करावा लागला.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org