scorecardresearch

बीअरमधील घटक

चहा, कॉफी यांच्या खालोखाल सेवन केला जाणारा द्रवपदार्थ म्हणजे बीअर होय. यात इथिल अल्कोहोल असल्यामुळे बीअरचा समावेश मद्यात केला जातो.

बीअरमधील घटक

चहा, कॉफी यांच्या खालोखाल सेवन केला जाणारा द्रवपदार्थ म्हणजे बीअर होय. यात इथिल अल्कोहोल असल्यामुळे बीअरचा समावेश मद्यात केला जातो.        
पिष्टमय पदार्थापासून किण्वन प्रक्रियेनं तयार केलेल्या मद्याला ‘बीअर’ म्हणतात. बीअर हा सरळ मद्याचा प्रकार आहे. बीअर बनविण्यासाठी मुख्यत: बार्ली हे धान्य वापरतात. किण्वन करावयाच्या द्रावणात बुडणारे यीस्ट वापरून बनविलेल्या बीअरला ‘जड यीस्टची बीअर’ तर किण्वन द्रावणात तरंगणारे यीस्ट वापरून बनविलेल्या बीअरला ‘हलक्या यीस्टची बीअर’ म्हणतात. यीस्ट कोणत्याही प्रकारचे असले, तरी त्यातील माल्टेज व झायमेज या विकरांमुळे (एंझाइम) किण्वन होऊन त्यातील शर्करेचे प्रथम ग्लुकोज व नंतर इथिल अल्कोहोल व कार्बन डाय ऑक्साइडमध्ये रूपांतरण होते.
या क्रियेत तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइड वायू हा एक उपपदार्थ असून तो वेगळा काढून इतरत्र वापरण्यासाठी साठविता येतो. किण्वनानं एकंदर ग्लुकोजच्या सुमारे ९५ टक्के भागाचं अल्कोहोल बनतं व उरलेल्या ५ टक्के भागापासून आणि मिश्रणातील इतर पदार्थापासून पेप्टाइड, अमिनो आम्ले, आल्डिहाइड, एस्टर इत्यादी उपपदार्थ तयार होतात. या उपपदार्थामुळे बीअरला रुची व स्वाद निर्माण होतो. तयार झालेल्या बीअरमध्ये या घटकांबरोबर उरलेली शर्करा, यीस्टपासून तयार झालेली थायामीन, रिबोफ्लाविन, निकोटिइनिक आम्ल, जीवनसत्त्व व काही प्रमाणात काबरेहायड्रेट व प्रथिनं आणि कॅल्शिअम व फॉस्फरस, ३ ते १५ टक्के इथिल अल्कोहोल हे घटक असतात.
बीअर बनविताना जे पाणी वापरलं जातं, त्यातील क्षार व इतर घटक यांच्या प्रमाणानुसार बीअरची गुणवत्ता ठरते. म्हणून उपलब्ध असलेले पाणी, त्यातील क्षार व इतर घटक यांचं योग्य प्रमाण करूनच वापरलं जातं.
जड यीस्टची बीअरमध्ये विविध प्रकार आहेत. उदा. लागर बीअर, पिल्सनर बीअर, डार्टमुंट बीअर आणि म्यूनिक बीअर. हलक्या यीस्ट बीअरच्या प्रकारात आणखी उपप्रकार आहेत. उदा. एल, पोर्टर, स्टाउट, लँबिग, साकी (तांदळापासून).

मनमोराचा पिसारा: अध्यात्माच्या वाटेने जाताना..
काही लोक अध्यात्ममार्गाला का लागतात? या मार्गाच्या अखेरीस कोणतं स्थानक लागतं? या मार्गावर रिटर्न टिकेट मिळतं? म्हणजे अमुक अनुभव हा कायमच्या वास्तव्यासाठी मुकरर केलेला असतो? की तो केवळ परत येण्याच्या वाटेवरील केवळ वळसा? की वेटिंग रूम? या वाटेनं चालायचं ठरवलं तर त्यासाठी काही विमा उतरवावा लागतो का? म्हणजे हा प्रवास ही कंडक्टेड टूर असते की आपला आपण करायचा प्रवास? त्याला गुरू म्हणावं की आचार्य? या वाटेवर आपण एकटय़ानं प्रवास करायचा की सहप्रवासी मंडळींना घेऊन? या प्रवासातले निरनिराळे थांबे कोणते? कोणत्या थांब्यावर किती थांबायचं? ते आपण ठरवायचं की सहलीला नेणारी कंपनी ठरवणार? या थांब्यांच्या दिनक्रमाची यादी आगाऊ देतात? की तो शोध असतो?
पुरे झाले ना प्रश्न? प्रवास म्हणजे ‘यातायात’ नसून सुखकर आनंददायी सहल असायला हवी असेल तर इतके प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे.
अगदी याच प्रश्नांना घेऊन डॉ. फिलिप गोल्डबर्ग यांनी ‘रोड साइन्स ऑन द स्पिरिच्युअल पाथ’ नावाचं अत्यंत उद्बोधक पुस्तक लिहिलं आहे. अध्यात्माच्या प्रवासात हौशे-गवशे आणि क्वचितच नवशे भेटतात. या तिघांना उत्तम मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.
संपूर्ण पुस्तक डॉ. गोल्डबर्ग यांनी नर्म विनोदी पद्धतीनं लिहिलं आहे. ‘प्रवास’ या संकेतात्मक प्रतीकाचा (मेटॅफर) उपयोग केला आहे. एखाद्या कमळाचा मोठा कळा हळूहळू विकसित व्हावा आणि त्याचं विशाल प्रसन्न तकतकीत रंगाच्या कमळात रूपांतर व्हावं, असं या मेटॅफरबद्दल वाटतं. ‘सहलीला नकाशे कामाचे नाहीत, स्वत: भूमापन करा, वाटेत चौरस्ते लागतील तर गोंधळून जाऊ नका, वळणं कमी-जास्त, पोहोचणार तिकडेच! प्रवाशातल्या गाइडकडे लायसन्स नसते, सावध राहा, अशा शीर्षकाचा पहिला अध्याय आहे.
तर दुसऱ्या अध्यायात, वाट हरवत नसते, आपण हरतो, हरवून गेलात तरी पुन्हा वाट सापडते. प्रवासातील तुमचं सामान सुरक्षित ठेवा; प्रवासातल्या वाहनाला ‘मेन्टेनन्स’ लागतो!
प्रवासात एकमेकांना ‘ओवरटेक’ करू नका, लेनची शिस्त पाळा, अशी प्रकरणांची शीर्षके आहेत.
हा प्रवास म्हणजे जीवनाला कवेत घेण्यासाठी, जीवनापासून पळून जाण्यासाठी नव्हे. प्रवासात  इच्छा वाटल्यास रिव्हर्स घेण्याची सोय आणि परवानगी असते!
अखेर प्रवासात घाई करू नका, मादक द्रव्यांचे सेवन करू नका, वळणावर स्लो राहा, अशा रीतीचे ‘रोड साइन बोर्ड’ त्यांनी योग्य जागी लावलेले आहेत.
डॉ. गोल्डबर्ग अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील लॉस एंजेलिसच्या आसपास राहतात. १९६० च्या सुमारास या भूभागात नवा गोल्डरश सुरू झाला. महर्षी महेश योगीकृत ‘ट्रान्सडेंटल मेडिटेशन’नं पाय घट्ट रोवले. ध्यानधारणा, समाधी, पौर्वात्य (भारतीय) तत्त्वज्ञान, मग ‘हरे रामा हरे कृष्णा’चा पंथ इ. गोष्टींकडे ‘रश’ सुरू झाला. गोल्डबर्ग त्यात सामील झाले. ध्यानधारणा शिकवू लागले. परंतु मूळ पिंड मानसशास्त्रीय संशोधकाचा. अभ्यासक आणि चिंतनशीलतेचा. त्यामुळे अशा चळवळीतील थिल्लर गोष्टींपासून स्वत:ला मुक्त करून स्वतंत्रपणे अध्यात्म, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. मग वाटेत ‘विवेकानंदा’ची व्याख्यानं, विचार आणि भारतीय तत्त्वज्ञानातला उजळ सामाजिक संदर्भ गवसला. भारतीय विचारामधील गर्भित अर्थ सापडल्यावर हरखून गेलेल्या डॉ. फिलिपना त्या काळी अमेरिकास्थित भारतीय भेटले. ते व्यथित झाले. सरसकट सगळे नाही, पण सुधारणा म्हणजे पाश्चात्त्यीकरण अशी तथाकथित प्रगत, सुविद्य मंडळींची धारणा बघून काळजीत पडले. त्यानंतर, त्यांनी तिथल्या अमेरिकावासी भारतीय आणि इतर अमेरिकनांना भारतीय विचार परंपरेतील उज्ज्वल मूलगामी विचारांचा व्याख्यानाद्वारे परिचय करून द्यायला सुरुवात केली.
त्यांचं ‘रोड साइन्स..’ प्रत्येकानं वाचावं असं पुस्तक आहे.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: इतिहासाचे पुनर्लेखन आत्मघातकी
‘‘मराठी साहित्याची पुन्हा नव्याने मांडणी होत आहे किंवा लेखक आणि लिखाण ह्य़ांची नव्याने प्रतवारी ठरविली जात आहे की काय असे गेल्या एकदोन दशकांतले लेखन पाहता वाटू लागते. तसे नव्याने मूल्यमापन होते ह्य़ात आश्चर्यजनक काही नाही.. परंतु गेल्या दहा-वीस वर्षांत आपल्याकडे काहीसा आक्रस्ताळी प्रकार चालला आहे असे वाटते. ज्ञानेश्वर, केशवसुत आदींना मोडीत काढायची तयारी चालली आहे असे दिसते. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ हा चरणच बदलून टाकायची तयारी चाललेली आहे. तो चरण आता ‘नामदवे रचिला पाया’ असा बदलून घेतला पाहिजे अशी शिफारस काही मंडळी करताना दिसतात.. ते टळते तर गेली दोन दशके ही असल्या अनैतिहासिक आग्रहाचा कालखंड होऊन बसती ना. अजूनही ही प्रवृत्ती बळकट आहे. कदाचित मराठी साहित्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी लेखनाला अंतर्विरोधपूर्ण आणि (तरीही) एकात्म असा इतिहास आहे हे गृहीतकच नाकारण्यासाठी काही मंडळींनी कंबर कसली आहे की काय असा प्रश्न पडतो.’’
गो. पु. देशपांडे ‘जो जे वांच्छिल ते तो लिहो’ (प्रिय रसिक, जुलै २०११) या लेखात इतिहासाच्या आत्मघातकी पुनर्लेखनाविषयी लिहितात –
‘‘अर्थात हे होते ह्य़ाचे कारण ‘जात’ आहे हे काही मुद्दाम सांगायला हवे असे नाही. आपला सामाजिक आणि राजकीय अनुभव जातीनिहाय असतो, असणारच हे उघड आहे. पण त्यातली अंतर्विरोधपूर्ण एकात्मता नाकारली तर मराठी साहित्य असा काही प्रकारच राहायचा नाही. जे काही लिहिले जाईल त्याचे स्वरूप एकान्तातील आक्रोशासारखे होऊन बसेल.. शब्दांचे अर्थ लागणार नाहीत. आज विद्रोह कळतो ह्य़ाचे कारण मी म्हणतो ती अंतर्विरोधपूर्ण एकात्मता आहे. मुख्य प्रवाहाच्या साहित्याला ही एकात्मता नाकारून चालते.. पण विद्रोहाला सगळा समाजच कवेत घ्यावा लागतो. मराठी साहित्याचे एकात्म स्वरूप नाकारले तर विद्रोह हद्दपार होतो. संत साहित्याच्या बाबतीत जी मांडणी किंवा इतिहासाचे पुनर्लेखन चालले आहे ते आत्मघातकी आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2014 at 01:13 IST

संबंधित बातम्या