डॉ. रंजन गर्गे
नामशेष होणे हा निसर्गाचा एक भाग आहे. सूक्ष्मजीव, प्राणी, वनस्पती या सातत्याने नष्ट होत असतात. परंतु परिसरात झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर परिसंस्था नष्ट होत आहेत, नाश पावत आहेत, त्यांचे विखंडन होत आहे, सजीव सामूहिकरीत्या लुप्त होत आहेत. पृथ्वीवरील गेल्या पाच विलोपनांत जवळजवळ पृथ्वीवरील ९८ टक्के जीव लुप्त झाले. सध्या पृथ्वीवर सहावे विलोपन सुरू आहे.
जेव्हा एखादा जीव लुप्त होतो तेव्हा परिसंस्थेतील त्याचा सहभाग हा कुठल्या तरी नवीन सजीवाने भरून काढला जातो. पृथ्वीवरील सजीव लुप्त होण्याचा सामान्य वेग १००० जिवांमागे ०.१ ते १.० सजीव प्रतिवर्षी इतका आहे. याला सजीव लुप्त होण्याचा ‘पार्श्वभौमिक वेग’ असे म्हणतात. नैसर्गिकरीत्या सजीवांत बदल होण्याऐवजी अत्यंत वेगाने म्हणजे २८ लाख वर्षांच्या आत जेव्हा विश्वातील ७५ टक्के प्रजाती नष्ट होतात, तेव्हा त्याला सामूहिक विलोपन (मास एक्स्टिंक्शन) असे म्हणतात.
२००७ साली केलेल्या डीएनए अनुक्रम तंत्रज्ञानाने असे सिद्ध केले आहे की जिवाणू, बुरशी आणि आदिजीव यांच्या प्रजाती लोप पावत आहेत आणि तशी नोंद सूक्ष्मजीवांच्या विलोपनाचा अभ्यास करणारे ग्राहम लॉटोन यांनी एप्रिल २०२३ च्या ‘न्यू सायंटिस्ट’ (आंतरराष्ट्रीय विज्ञान मासिक) मध्ये केली आहे. कमालीचे पर्यावरणबदल झाले की, सूक्ष्मजीवांच्या जीवनचक्रात अडथळे निर्माण होतात.
एखाद्या परिसंस्थेतील पर्यावरण बदलाला कमी सोशीक असलेल्या प्रजाती नष्ट झाल्या म्हणजे जास्त सोशीक प्रजातीदेखील विलोपनास बळी पडतात. परिसंस्थेत एखाद्या विशेष कार्य करणाऱ्या प्रजातीचे विलोपन झाले तर अन्नसाखळीत व्यत्यय येऊन त्यातून असंभवनीय परिणामांची साखळीच सुरू होते.
समुद्र आणि गोड्या पाण्याच्या सरोवरात वास करणारी प्लवके (प्लांकटॉन्स), सूक्ष्म वनस्पती, प्राणी हे पाण्यातील अन्नसाखळीचा पाया आहेत. वनस्पतीप्लवके (फायटोप्लांकटॉन्स) म्हणजे समुद्र आणि पृथ्वीची हृदय आणि फुप्फुसे आहेत. ते फार मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन बाहेर टाकतात. ते जणू ऑक्सिजनचे कारखाने आहेत. हवामान बदलामुळे समुद्राचे पृष्ठीय तापमान वाढले असून १९५० सालापासून फायटोप्लांकटॉन्सच्या संख्येत ४० टक्क्यांनी घट झाली आहे.
प्राणीप्लवके (झूप्लांकटॉन्स) देखील समुद्रातील ऑक्सिजनला संवेदनशील असतात. या फायटोप्लांकटॉन्सची संख्या आणि गुणवत्ता ही अन्नसाखळीतील वरच्या घटकांवर परिणाम करते. प्रोफेसर सान्या डायहर्मन (कोलंबिया विद्यापीठ, पृथ्वी आणि पर्यावरण विभाग) यांच्या मते पोषणद्रव्यांची कमतरता, वाढलेले पाण्याचे तापमान आणि प्रदूषण यामुळे प्लांकटॉन्सचे विलोपन वेगात होत आहे.
– डॉ. रंजन गर्गे, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org