‘स्कव्‍‌र्ही’ किंवा ‘पेलॅग्रा’ यासारख्या व्याधींचा आहाराशी असलेला संबंध कित्येक शतकांपूर्वीपासून मानवाला माहीत होता. परंतु याबाबतचे निश्चित स्वरूपाचे संशोधन एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले. सन १८९० च्या दशकात क्रिस्तियान आइज्कमान हा डच वैद्यकतज्ज्ञ सनिकांत आढळणाऱ्या ‘बेरीबेरी’ या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध घेत होता. या व्याधीत हृदयाचे तसेच इतर स्नायू दुर्बल होतात, थोडय़ाशा श्रमानेही धाप लागते. आइज्कमानने केलेल्या प्रयोगांतून हे दिसून आले की, पूर्णसडीच्या तांदळावर वाढवलेल्या कोंबडय़ांना ‘पॉलिन्यूरिटिस’ हा आजार होऊन त्यांचे स्नायू क्षीण होतात. परंतु जर त्यांना त्यानंतर बिनसडीच्या तांदळावर ठेवले, तर त्या या व्याधीतून बऱ्या होतात. आइज्कमानच्या मते, पिष्टमय पदार्थाचा अतिरेक हा विषासमान असावा; परंतु तांदळाच्या कोंडय़ातील एखादा पदार्थ त्यावर उतारा ठरत असावा. त्यानंतर १८९५ साली आइज्कमानच्या सूचनेवरून जावा बेटावरील तुरुंगांतील कैद्यांची तपासणी करण्यात आली. यात पूर्णसडीच्या तांदळाचा भात खाणाऱ्या कैद्यांत बेरीबेरीची लागण खूपच मोठय़ा प्रमाणात आढळून आली. आइज्कमानच्या या संशोधनातून माणसांना होणारा बेरीबेरी आणि कोंबडय़ांना होणारा पॉलिन्यूरिटिस, यांतील साम्य स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आइज्कमान याचे संशोधन गेरिट ग्रिज्नस या डच वैद्यकतज्ज्ञाने पुढे चालू ठेवले. अतिशिजवलेल्या मांसावर पोसलेल्या कोंबडय़ांनाही पॉलिन्यूरिटिस होत असल्याचे त्याला दिसून आले. या कोंबडय़ांना तांदळाचा कोंडा खायला घातल्यास ही व्याधी दूर होत असल्याचेही त्याने नोंदवले. यावरून पॉलिन्यूरिटिस होण्यास पिष्टमय पदार्थाचा अतिरेक होण्याची गरज नव्हती. या अनुभवावरून ग्रिज्नस याने, नैसर्गिक अन्नात शरीराला आवश्यक असणारे काही पदार्थ असल्याचे विधान केले. या पदार्थाच्या अभावामुळे गंभीर व्याधी होत असल्याचे प्रतिपादन त्याने केले. चटकन विघटित होणाऱ्या या पदार्थाचे रेणू गुंतागुंतीचे असल्याचा निष्कर्षही त्याने काढला.

सन १९१२ साली पोलिश संशोधक कॅसिमिर फंक याने हे पदार्थ अमाइन प्रकारचे असल्याचा निष्कर्ष काढून या पदार्थाना ‘व्हिटॅमिन’ (व्हायटल अमाइन) हे नाव दिले. कालांतराने आणखी डझनभर जीवनसत्त्वे सापडली. या विविध जीवनसत्त्वांतील काही जीवनसत्त्वे ही अमाइन प्रकारातली नव्हती; तरी फंक याने अभ्यासलेले, भाताच्या कोंडय़ात आढळणारे जीवनसत्त्व (म्हणजेच आजचे ‘बी’ जीवनसत्त्व) हे

मात्र अमाइन प्रकारचेच असल्याचे १९२६ साली सिद्ध झाले.

डॉ. रमेश महाजन

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discovery of vitamins zws
First published on: 29-08-2019 at 03:50 IST