उत्तर इंग्लंडमधील कोळशाच्या खाणींमध्ये खाणमजूर पूर्वी उजेडासाठी तेलावर चालणारे उघडय़ा ज्योतीचे दिवे वापरत. त्यामुळे कोळशाच्या खाणीत निर्माण होणारा ज्वालाग्राही वायू पेटून जबरदस्त स्फोट होत असत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्लिश वैज्ञानिक हम्फ्री डेव्ही (सन १७७८ – १८२९) याला यातून मार्ग काढण्याची विनंती केली गेली. डेव्हीने केलेल्या पद्धतशीर संशोधनातून त्याच्या नावे ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध रक्षकदीपाची निर्मिती झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संशोधनात डेव्हीने प्रथम न्यूकॅसल येथील खाणींतील स्फोटक वायूचे नमुने गोळा केले. हा वायू म्हणजे मिथेन आणि हवेचे मिश्रण असल्याची त्याने खात्री केली. त्यानंतर मिथेनची आणि हवेची विविध प्रमाणातील मिश्रणे तयार करून, ती स्फोटक होण्यासाठी त्यात किती हवा असण्याची गरज असते ते शोधून काढले. या मिश्रणाचा स्फोट होताना त्यातून निर्माण होणारे वायू किती प्रसरण पावतात, हेसुद्धा डेव्हीने अभ्यासले. या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या ज्वालेला नळीच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला असलेल्या वायूच्या मिश्रणाकडे पोचायला किती वेळ लागतो, याचे त्याने मापन केले. नळीचा व्यास साडेतीन मिलिमीटर इतका लहान असला, तर ही ज्वाला नळीच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या वायूत स्फोट घडवू शकत नसल्याचे त्याने नोंदले. जर ही नळी काचेऐवजी धातूची असली, तर धातूच्या उष्णता वाहून नेण्याच्या अधिक क्षमतेमुळे धातू थंड राहून स्फोटाची शक्यता कमी होत होती. वायूच्या अभिसरणासाठी नळ्यांऐवजी अतिशय बारीक छिद्रे असलेली धातूची जाळी वापरली तरीही स्फोट टाळता येत असल्याचे त्याला दिसून आले.

या सर्व निरीक्षणांवर आधारलेले तेलाचे विविध दिवे डेव्हीने तयार केले. बाहेरची हवा आत येण्यासाठी दिव्याच्या खालच्या बाजूला आणि आतली हवा बाहेर जाण्यासाठी दिव्याच्या वरच्या बाजूला त्याने धातूच्या नळ्या वापरल्या होत्या. दिव्यांच्या सुरुवातीच्या प्रारूपांत त्याने दिव्याच्या ज्योतीला काचेने वेढले होते. या दिव्याच्या अंतिम स्वरूपात मात्र त्याने हा दिवा सर्व बाजूंनी काचेऐवजी धातूच्या जाळीने वेढला. ही जाळी तापून लालभडक झाली, तरी त्यामुळे स्फोट घडून येत नव्हता. न्यूकॅसलजवळच्या दोन धोकादायक खाणींमध्ये हम्फ्री डेव्हीने या दिव्याची चाचणी घेतली आणि त्यानंतर त्याने आपले हे संशोधन १८ जानेवारी १८१६ रोजी रॉयल ‘सोसायटी’ला सादर केले.

– डॉ. सुनंदा करंदीकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English scientist humphry davy invention of safe lantern for mining coal zws
First published on: 12-09-2019 at 02:15 IST