सूक्ष्मजंतूंची वाढ पोषण माध्यमांशिवाय अशक्य आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी शास्त्रज्ञ द्रवसूप (ब्रॉथ), बटाट्याचे काप, अंड्याचा गोळा अशा नैसर्गिक घन आधारकांचा वापर करत असत. मात्र ही माध्यमे अपारदर्शक, तापमान-संवेदनशील आणि जीवाणूंच्या विघटनास सहज बळी पडणारी होती. ‘अगर’ या घटकाच्या समावेशामुळे तापमानाने न वितळणारे, पारदर्शक आणि जीवाणूंच्या विघटनास प्रतिरोधक असे घनमाध्यम उपलब्ध झाले. या क्रांतिकारक शोधामुळे सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रगतीला अभूतपूर्व गती मिळाली.

आज विविध भौतिकस्वरूपात तयार पोषण माध्यमे उपलब्ध असून, त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार व उद्दिष्टांनुसार त्यांचा वापर केला जातो.

निर्जल पावडरयुक्त माध्यमे – ही सर्वाधिक वापरली जाणारी पारंपरिक माध्यमे आहेत. आवश्यक घटक सूक्ष्म पावडर स्वरूपात संमिश्रित केलेले असतात. वापरताना पाण्यात विरघळवून निर्जंतुकीकरण करावे लागते. ही माध्यमे किफायतशीर व सर्वत्र उपलब्ध असली तरी त्यातून निर्माण होणाऱ्या बारीक धुळीमुळे अॅलर्जी होऊ शकते किंवा शिंका येण्याचाही धोका असतो. दीर्घ साठवणुकीत गुठळ्या तयार होणे आणि तळाचा भाग घट्ट होणे ही समस्या आढळते.

दाणेदार (ग्रॅन्युल) माध्यमे- पावडरयुक्त कणांना दाणेदार स्वरूप दिल्याने धूळ निर्मिती लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे माध्यम हाताळणाऱ्याच्या आरोग्यास धोका निर्माण होत नाही. उत्कृष्ट प्रवाही प्रवृत्तीमुळे मापन करताना गुठळ्या होत नाहीत आणि घटकांचे समान मिश्रण प्रत्येक दाण्यात सुनिश्चित होते. त्यामुळे वाहतूक व साठवणुकीदरम्यान घटकविभेदन होत नाही आणि प्रत्येक बॅचमध्ये परिणाम पुनरावर्तनीय राहतात. साठवणकालदेखील तुलनेने अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे.

कॅप्स्युल माध्यमे- अचूक मोजमापातील पूड जलविद्रधी कॅप्स्युल स्वरूपात उपलब्ध असते. आवश्यक तेवढ्या कॅप्स्युल पाण्यात टाकून निर्जंतुकीकरण केल्याने क्षणार्धात माध्यम तयार होते. यामुळे मापनातील त्रुटी, नासधूस टाळते आणि प्रक्रिया स्वच्छ व अचूक राहते. उदाहरणार्थ, एलबीब्रॉथ आता कॅप्स्युलरूपात उपलब्ध असून पारंपरिक पावडरमाध्यमाप्रमाणेच वाढीचे गुणधर्म दर्शवते.

तयार-उपयोगी माध्यमे – यात निर्जंतुकीकरण केलेला द्रव पिशव्या, बाटल्या किंवा आधीच ओतून तयार केलेल्या घनमाध्यम पेट्रीडिशेसमधून विक्रीस येतो. औषध-नियंत्रण चाचण्या, क्लिनिकल तपासण्या यांसारख्या कामांसाठी यामुळे वेळ व श्रमाची बचत होते. मात्र ही माध्यमे महागडी असतात आणि त्यांचा साठवणकाळ तुलनेने कमी असतो. त्यामुळे पूड किंवा ग्रॅन्युल माध्यमांचीच मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, फार्मा, बायोफार्मा, अन्नप्रक्रिया व जैवतंत्रज्ञान या नियमनाधीन उद्याोगांमध्ये तयार-उपयोगी माध्यमांचा वापर अधिक प्रमाणात होतो. औद्याोगिक स्तरावर आजही निर्जल पावडर माध्यमांचा वापर होतो, तर उच्च-प्रतीच्या विशिष्ट प्रक्रियांसाठी तयार निर्जंतूक द्रवमाध्यम व संहत पोषण माध्यम यांचा वापर हळूहळू वाढत आहे.

डॉ. गिरीश महाजन

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org