भानू काळे  bhanukale@gmail.com

शेती किंवा मजुरीऐवजी बैठे काम करून जे पोट भरतात त्यांना पांढरपेशा म्हटले जाते. या शब्दाची व्युत्पत्ती मजेदार आहे. शेतीच्या संदर्भात काळी जमीन आणि पांढरी जमीन असे दोन भाग केले जातात. काळी म्हणजे शेतीयोग्य जमीन. त्या जमिनीवर शेतकरी कष्टपूर्वक, घाम गाळून शेती करतो; सगळय़ांचे भरणपोषण करतो. ‘काळी माय’ असे शेतकरी जमिनीला म्हणतो ते त्यामुळेच. पांढरी जमीन म्हणजे गावठाणाची, म्हणजेच बिगरशेतीची. शब्दकोशात ‘शेतीव्यतिरिक्त इतर धंद्यांवर किंवा पांढरीवर उपजीविका करणारा वर्ग’ असा पांढरपेशा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. यात बारा बलुतेदारही आले. पांढरीवर व्यवसाय, म्हणजे पेशा, करणारे ते पांढरपेशा. पुढे कृषिसंस्कृती मागे पडत गेली. कारखानदारी आली. कामगारवर्ग व नोकरदारवर्ग आला. त्यानंतर ‘अंगमेहनतीचे काम न करणारे लोक’ असा पांढरपेशा शब्दाचा अर्थ रूढ झाला.

delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

कष्टकरी आणि पांढरपेशा याला समांतर असे इंग्रजीत ब्ल्यू कॉलर व व्हाइट कॉलर असे कर्मचाऱ्यांचे दोन भाग औद्योगिक क्रांतीनंतर मानले जाऊ लागले. कामगार सामान्यत: निळय़ा रंगाचे जीन्स किंवा ओव्हरऑल असे कपडे घालत. ग्रीझ किंवा तेलाचे डाग त्या मळखाऊ रंगामुळे दिसत नसत. त्यांना ब्ल्यू कॉलर कर्मचारी म्हणत. याउलट बैठे काम करणाऱ्यांचे कपडे मळायची फारशी शक्यता नसे व त्यामुळे ती मंडळी पांढऱ्या रंगाचे कपडे घालत. कारखाने सोडून इतरत्र काम करणाऱ्या शिक्षक, बँक कारकून, सरकारी नोकर वगैरे मंडळींचाही याच व्हाइट कॉलर वर्गात समावेश असे. या दोन्ही कर्मचारी वर्गाच्या संघटनादेखील वेगवेगळय़ा असत.

आज संगणकीय युगात अर्थातच परिस्थिती पार पालटली आहे. कष्टाची कामे बहुतांशी यंत्रे करतात; पूर्वीसारखा कामगारांना घाम वगैरे गाळावा लागत नाही, कपडे मळायचा फारसा प्रसंगच येत नाही. कारकून बसतात ती कार्यालयेही खूपदा वातानुकूलित असतात. दोघांच्या कपडय़ांमध्येदेखील काही फरक राहिलेला नाही. पण तरीही ब्ल्यू कॉलर व व्हाइट कॉलर हे शब्दप्रयोग वापरात आहेत. काळाच्या ओघात शेतीकाम करणाऱ्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे आणि पांढरपेशावर्गाची संख्या वाढत चालली आहे. वाचन-लेखन करणारे व बुद्धिजीवी मानले जाणारे लोक बहुतांशी याच पांढरपेशावर्गात मोडतात.