नारायण वाडदेकर
सपुष्प वनस्पतींच्या फुलांत पुंकेसरात परागकण निर्माण होतात. परागकण त्याच जातीच्या वनस्पतींच्या फुलांतल्या स्त्री-भागांवर पडले तर फलन होऊ शकते. परागकण योग्य वनस्पतींच्या फुलांतल्या स्त्री-भागांपर्यंत वाहून नेणे हे वारा, कीटक, पाणी इत्यादी माध्यमांमुळे शक्य होते. हवेबरोबर परागकण वाहत जातात तेव्हा ते धुलिकणांप्रमाणे वारा वाहील तसे कोणत्याही दिशेला जातात. हवेच्या माध्यमातून परागीकरण करणाऱ्या वनस्पती नैसर्गिक निवडीत टिकून राहण्यासाठी महाप्रचंड संख्येने परागकण निर्माण करतात.

काही लोकांना हवेत तरंगणाऱ्या एकेका सुट्या परागकणाचे वा त्यांच्या पुंजक्यांचे वावडे (अॅलर्जी) असते. तीन प्रकारच्या परागकण अॅलर्जी असतात. झाडांपासून निघणाऱ्या परागकणांची अॅलर्जी, गवताच्या परागकणांची अॅलर्जी आणि तणांच्या परागकणांची अॅलर्जी.

अॅलर्जी झालेल्या माणसांना गंभीर लक्षणांत श्वास घेणे मुश्कील होते. घरघर, धाप लागणे, दमा उसळणे, रक्तदाब कमी होणे, अतिसार, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. सौम्य लक्षणांत जोरदार शिंका, नाक वाहणे, नाकाच्या आतील भागाला सूज येणे, डोकेदुखी, कान दुखणे, कानाला दडे बसणे, डोळे लाल होणे, त्वचेवर खाज येणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमा असलेल्या व्यक्तींमध्ये परागकणांमुळे अॅलर्जिक अस्थमासारखा गंभीर आजार होतो. गंभीर लक्षणे दिसत असल्यास झटका (अॅनाफेलॅक्टिक शॉक) हा जीवघेणा ठरू शकतो.

परागकण ओलसर श्वासमार्गाला, फुप्फुसांना, घशाला चिकटतात. प्रथम संपर्कात त्यांच्या पृष्ठभागावरची प्रथिने काही माणसांत परकीय पदार्थ म्हणून ओळखली जातात. त्यांच्याविरुद्ध प्रतिपिंडे (अँटीबॉडी) तयार होतात. यात इम्युनोग्लोब्युलीन ‘ई’ हे प्रमुख प्रतिपिंडे असते. पुन्हा संपर्क झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडे रक्तात सोडली जातात. ही प्रतिपिंडे शरीरातील मास्टपेशी आणि बेसोफिल्स या दोन पांढऱ्या पेशींना चिकटतात. परागकण आणि प्रतिपिंड हे मास्टपेशीवर जोडले (बाइंड) जातात. या बंधनामुळे मास्ट पेशीतून हिस्टॅमिन हे स्थानिक संप्रेरक स्रावते. हिस्टॅमिनमुळे तो भाग क्षोभित, लालबुंद होतो. सूज येते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे ‘अतिसंवेदनशील प्रतिक्रिया’ दिली जाते. यालाच ‘अॅलर्जिक रिअॅक्शन’ असे म्हणतात. अशी अॅलर्जिक रिअॅक्शन’ म्हणजे तो शरीराचा भाग लाल होणे, त्यावर सूज येणे आणि खाज सुटणे.

काँग्रेस गवत म्हणजे गाजर गवत या तणरूपी झुडुपाच्या परागकणांची अॅलर्जी बहुसंख्यांना असते. यावर हिस्टॅमिनविरोधी औषधे वा कॉर्टिकोस्टेरॉइड्स दिली जातात किंवा इम्युनोथेरपी दिली जाते. परंतु सर्वात उत्तम उपाय म्हणजे आपल्या जीवनपद्धतीत बदल घडवून आणणे महत्वपूर्ण ठरते.
नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org