पृथ्वीला ‘जलग्रह’ असेही म्हणतात. कारण अवकाशात जाऊन आपण पृथ्वी कशी दिसते ते पाहू लागलो तर जे दृश्य दिसेल त्यात जमिनीचा भाग नगण्य असेल. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापलेला असल्याने प्रामुख्याने नजरेत भरेल ते महासागरांमधील पाणी. पण म्हणून पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच महासागर अस्तित्वात आले असे कुणाला वाटत असेल, तर ते मात्र चुकीचे आहे.

पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४५० कोटी वर्षांपूर्वी झाली. वायूंचा एखादा प्रचंड मोठा जळता गोळा असावा असे त्या वेळेस पृथ्वीचे स्वरूप होते. हा गोळा लाखो वर्षे जळत होता. त्या तापमानाला द्रवरूप पाण्याचे अस्तित्व असण्याची यित्कचितही शक्यता नव्हती. ज्वलनातून विविध ऑक्साइड निर्माण होत होती. पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात हायड्रोजन-डाय-ऑक्साइडही तयार होत होते. ही पाण्याची वाफ पृथ्वीच्या अतितप्त वातावरणात साठत होती. हा जळता गोळा अगदी हळूहळू थंड होत गेला. जसजसा तो थंड होत गेला, तसतसे त्याला घनरूप प्राप्त होऊ लागले. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर खडकांचे कवच दिसू लागले.

यानंतर कित्येक वर्षे पृथ्वीवर ठिकठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक होत होते. त्या उद्रेकांद्वारेही कार्बन-डाय-ऑक्साइड, सल्फर-डाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ आणि इतरही काही वायू पृथ्वीच्या वातावरणात मिसळत होते. त्या वेळच्या वातावरणातले विविध वायू आजच्या वातावरणापेक्षा खूपच वेगळे होते.

पृथ्वी थंड होता होता एक वेळ अशी आली की तापमान १०० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले. त्यामुळे वातावरणात साठलेल्या पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्याच्या टपोऱ्या थेंबांमध्ये झाले. गुरुत्वाकर्षणामुळे हे थेंब पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे झेपावू लागले. हा पृथ्वीवरचा पहिला पाऊस! तो अनेक वर्षे पृथ्वीवर कोसळत होता. त्या पावसाच्या पाण्यात कार्बन-डाय-ऑक्साइड, सल्फर-डाय-ऑक्साइड आणि इतर काही आम्लधर्मी वायू नक्कीच विरघळले असणार.

तो पाऊस झेलणारा पृथ्वीचा पृष्ठभाग एखाद्या रबरी चेंडूच्या पृष्ठभागासारखा गुळगुळीत नव्हता. त्याच्यावर आजच्यासारखेच उंचवटे आणि खळगे तेव्हाही होते. कित्येक वर्षे विजांच्या कडकडाटांसकट सुरू असणाऱ्या मुसळधार वृष्टीच्या पाण्याने त्यातले सारे खळगे तुडुंब भरले. पृथ्वीवर पहिलेवहिले महासागर तयार झाले.

कदाचित विश्वास बसणार नाही, पण या आदिम सागरांमध्ये काही आम्लधर्मी वायू विरघळलेले असले, तरी मिठाचा किंवा अन्य कोणत्याही क्षाराचा लवलेशही नव्हता. पण पाऊस पडू लागल्यानंतर खडकांचे रासायनिक विघटन होऊ लागले. त्यातून निर्माण झालेले क्षार नद्यांवाटे समुद्रात जाऊ लागले आणि महासागराचे पाणी मंदगतीने खारट होऊ लागले.                 

डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org