ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते. फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती. पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली. १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते.  फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते. फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

(‘फ्लोरीन निर्मिती२७ फेब्रु.या लेखात फ्लोरीनचा अणुक्रमांक ८ असल्याचा उल्लेख चुकीचा असूनफ्लोरीनचा अणुक्रमांक ९ आहे)

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Functional fluorine
First published on: 28-02-2018 at 02:14 IST