डॉ. सुहास कुलकर्णी
रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणी रंगवले तर ओळखणे खरेच कठीण असते, पण विविध रंगांनी जीवाणूंना रंगवून त्यांचे वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ म्हणजे ‘हान्स ख्रिाश्चन ग्राम’ हा होय. ग्राम हे डॅनिश जीवाणूशास्त्रज्ञ होते. जीवाणू हे मुळात पारदर्शक असतात. त्यांनी जीवाणूंना सूक्ष्मदर्शकाखाली अधिक दृश्यमान करण्यासाठी ‘ग्राम अभिरंजन’ पद्धत विकसित केली, जी आजही प्रमाणित पद्धत म्हणून वापरण्यात येते.
हान्स ख्रिाश्चन ग्राम यांचा जन्म १३ सप्टेंबर १८५३ कोपनहागेन, डेन्मार्क येथे झाला. त्यांनी १८८३ मध्ये कोपनहागेन विद्यापीठातून एम. डी. ही वैद्याकीय पदवी प्राप्त केली. १८८४ साली बर्लिन येथे, न्यूमोनियाने मरण पावलेल्या रुग्णाच्या फुप्फुसांच्या पेशीवर त्यांनी संशोधन केले. त्यांनी सुरुवातीच्या संशोधनासाठी स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी व क्लेब्सिएला न्यूमोनी या जंतूचा वापर केला. प्रयोगामध्ये त्यांनी एका काचपट्टीवर जीवाणूंचा पातळ थर तयार केला, हवेने तो थोडा कोरडा झाल्यावर पेटलेल्या दिव्याच्या उष्णतेवर आणखी कोरडा केला. त्यानंतर त्या थरावर क्रिस्टल व्हायोलेट हे रंगद्रव्य टाकले व ते पक्के करण्यासाठी आयोडीनचा वापर केला. नंतर सूक्ष्मदर्शकाखाली पाहणी केली तेव्हा सर्व जंतूंनी रंगद्रव्य शोषले गेल्याचे त्यांना आढळले. नंतर इथेनॉल हे विरंजक वापरून त्यांनी ती काचपट्टी पाण्याने धुतली व परत पाहणी केली असता काही जंतूंनी रंगद्रव्य सोडून दिल्याचे त्यांना दिसले. जे जंतू रंगद्रव्य जतन करतात त्यांना ग्राम पॉझिटिव्ह तर रंगद्रव्य सोडून देणाऱ्या जंतूंना ग्राम निगेटिव्ह असे त्यांनी संबोधिले. ग्रामने कधीही प्रति-रंगद्रव्य वापरले नाही. त्यानंतर काही वर्षांनी जर्मन शास्त्रज्ञ कार्ल वेइगर्ट याने सॅफ्रानीन वापरण्याची शेवटची पायरी सांगितली. ग्रामने स्वत: कधीच सॅफ्रानीन हे लाल रंगाचे द्रव ग्राम निगेटिव्ह जीवाणू बघण्यासाठी वापरले नव्हते. सध्या सॅफ्रानीनच्या जागी बेसिक फयूस्चिन वापरतात कारण ते अधिक तीव्रतेने अभिरंजन क्रिया करते.
ग्राम पॉझिटिव्ह सूक्ष्मजीवांच्या पेशीभित्तिकेत पेप्टाइडोग्लायकनचे प्रमाण जास्त असते, तर ग्राम निगेटिव्ह जीवाणूंच्या पेशीभित्तिकेत लिपिडचे प्रमाण जास्त असते. पेशीभित्तिकेशी झालेल्या जैवरासायनिक क्रियेनुसार ग्राम पॉझिटिव्ह जंतू जांभळ्या रंगाचे तर ग्राम निगेटिव्ह जंतू गुलाबी रंगाचे दिसतात व त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. जीवाणूंचे अभिरंजन हे ग्राम यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख व सन्मान देणारे ठरले. डेन्मार्कच्या राजाने १९१२ साली ‘गोल्ड मेडल ऑफ मेरिट’ हा सन्मान देऊन ग्राम यांचा गौरव केला. त्यांचा मृत्यू १४ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला.
डॉ. सुहास कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org