लेण्यांमध्ये, गुहांमध्ये, पडीक वास्तूंमध्ये, क्वचित मोठय़ा फळवृक्षावर उलटी टांगलेली वटवाघळे आपण पाहतो. सस्तन प्राण्यांपैकी पंख असलेला हा एकमेव प्राणी. फळे, फुले, कीटक, छोटे प्राणी आणि रक्त हे वटवाघळाचे अन्न.. रक्त शोषणारी वटवाघळे भारतात आढळत नाहीत. आपल्याकडे आढळणाऱ्या वटवाघळांना ‘फॉल्स व्हॅम्पायर’ असे म्हणतात. खरे ‘व्हॅम्पायर’ – वटवाघूळ – पश्चिम गोलार्धातील विषुववृत्तीय, मेक्सिको, ब्राझील येथील जंगलांत आढळते. त्यांचे अन्न म्हणजे रक्त. या रक्तजीवी प्राण्यांना इंग्रजीत ‘हेमॅटोफॅजी’ असे म्हणतात. हे प्राणी संपूर्ण अंधार झाल्यावर अन्नासाठी बाहेर पडतात. एखादा झोपलेला प्राणी (गाय, म्हैस, डुक्कर, घोडा, पक्षी वगैरे) दिसला की ती खाली उतरतात. क्वचित माणसाचे रक्तही शोषतात. प्राण्याला नुकसान होईल इतके रक्त ते कधीच शोषत नाहीत. परंतु जखमांचा त्रास त्या प्राण्यांना होऊ शकतो. स्वतच्या वजनाच्या निम्म्या वजनाएवढेच रक्त घेतात. दोन दिवस त्यांना जर रक्त मिळाले नाही, तर ते मरणासन्न होतात. त्यांच्याकडील अतिरिक्त अन्न (रक्त) ते उपाशी सभासदांना देतात आणि बदल्यात त्यांच्याकडून अंगसफाई करून घेतात. वटवाघळे रक्त पीत नाहीत, तर दातांनी जखम करून जिभेने रक्त चाटतात. प्राण्याच्या अंगावर केस असतील, तर दातांच्या मदतीने ब्लेडप्रमाणे कातडी कापतात. त्यांचे पुढचे दात खास प्राण्याची कातडी फाडण्यासाठी असतात. त्यांच्या वरच्या- पुढील दातांवर इनॅमल नसते, त्यामुळे ते दात कायमच चाकूप्रमाणे धारदार राहू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही वटवाघळे वजनाने हलकी असल्यामुळे झोपलेल्या प्राण्याला जाग येत नाही. त्यांच्या थुंकीतील ‘ड्रॅक्युलीन’ या पदार्थामुळे वाहणारे रक्त गोठत नाही. त्यांच्या नाकातील अवरक्त (इन्फ्रारेड) संवेदना उष्णतेचा संवेदक (सेन्सर) म्हणून काम करते. यामुळे त्यांना प्राण्याच्या कातडीजवळील रक्तवाहिन्या शोधण्यात मदत होते. ते एक प्रकारच्या ध्वनिलहरी पाठवतात आणि त्याच्या प्रतिध्वनीवरून ते अंधारातील जग बघतात. एकूण ९०० प्रजातींपैकी अर्ध्याहून जास्त जाती अडथळे, अन्न, तसेच त्यांचा निवारा शोधण्यासाठी प्रतिध्वनीचा उपयोग करतात. वटवाघळे हा आवाज त्यांच्या स्वरयंत्रातून अथवा जिभेने काढतात. हा आवाज विशिष्ट पुनरावृत्तीचा वेग आणि विशिष्ट तीव्रता असलेला असतो. या वटवाघळांची संवर्धन स्थिती कमीतकमी चिंताजनक अशी आहे.

–  डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hematophagy animals bats zws
First published on: 09-01-2020 at 01:35 IST