इ.स. १८९५च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये विल्हेल्म रोंटजेनला क्ष-किरणांचा शोध लागला. पॅरिस येथील फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये १८९६ सालच्या जानेवारीत झालेल्या एका चर्चासत्रात हेन्री पॉईनकेरे या वैज्ञानिकाने क्ष-किरणांविषयी माहिती दिली आणि तिथे हजर असलेल्या फ्रेंच वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेलच्या विचारांना चालना मिळाली. हेन्री बेक्वेरेल त्या वेळी स्फुरदीप्तीचे (फॉस्फोरेसन्स) गुणधर्म असणाऱ्या युरेनियमच्या क्षारांवर संशोधन करत होता. स्फुरदीप्त संयुगांवर सूर्यप्रकाश पडला, की ती ऊर्जा त्या संयुगांत साठवली जाते आणि काही काळ गेल्यानंतर प्रकाशकिरणांच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. युरेनियमचे क्षारसुद्धा कदाचित सूर्यप्रकाश शोषून ती ऊर्जा क्ष-किरणांच्या स्वरूपात बाहेर टाकत असण्याची शक्यता बेक्वेरेलला वाटली. या क्ष-किरणांमुळेच निर्माण होणाऱ्या स्फुरदीप्तीद्वारे ही संयुगे अंधारात चमकत असावीत.

बेक्वेरेलने याची पडताळणी करण्याचे ठरवले. त्याने युरेनियमचा क्षार सूर्यप्रकाशात ठेवला. त्याच्या सान्निध्यात, सूर्यप्रकाशाचा परिणाम होऊ नये म्हणून काळ्या कागदात गुंडाळलेली फोटोग्राफीची प्लेट ठेवली. थोडय़ा वेळानंतर जेव्हा त्याने या प्लेटवर प्रक्रिया केली, तेव्हा त्याला त्या प्लेटवर युरेनियमच्या क्षाराने उत्सर्जति केलेल्या प्रकाशामुळे निर्माण झालेले पुसटसे ठसे पाहायला मिळाले. सूर्यप्रकाशामुळे क्ष-किरणांसारखेच काळ्या कागदातून आत शिरणारे, कोणते तरी किरण युरेनियमच्या स्फुरदीप्त क्षारांतून निर्माण होत होते.

त्यानंतर बेक्वेरेलने या किरणांचा तपशीलवार अभ्यास सुरू केला; परंतु त्यानंतरच्या दिवसांत आकाश नेमके अभ्राच्छादित होते. त्यामुळे त्याने प्रयोगासाठी वापरायची फोटोग्राफीची प्लेट काळ्या कागदात गुंडाळून टेबलाच्या खणात ठेवून दिली. त्यावर त्याने एक तांब्याचा क्रॉस ठेवला. या क्रॉसवर त्याने युरेनियमचा क्षार ठेवला. आणखी काही दिवस गेले, सूर्यदर्शन काही होईना. अखेर सुमारे सहा दिवसांनी, उत्सुकतेपोटी त्याने ही प्लेट खणातून काढली आणि प्रक्रिया करून त्यावरील ठशांचे निरीक्षण केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्यप्रकाश नसतानाही या वस्तूंचे ठसे या प्लेटवर स्पष्टपणे दिसत होते. म्हणजे युरेनियमचे क्षार अंधारातसुद्धा कोणती तरी प्रारणे उत्सर्जति करत होते. या किरणांना त्याने ‘यू-किरण’ असे संबोधले. ‘नैसर्गिक किरणोत्सारा’चा हा पहिला पुरावा ठरला. दुसऱ्याच दिवशी (२ मार्च १८९६) बेक्वेरेलने आपला हा शोध फ्रेंच अ‍ॅकॅडेमीला सादर केला. १९०३ साली हेन्री बेक्वेरेल नैसर्गिक किरणोत्साराच्या या शोधाबद्दल नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org