निसर्गात सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस. त्यामुळे माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेचा सखोल अभ्यास केलेला आहे. हॉवर्ड गार्डनर नावाच्या अमेरिकन मानसतज्ज्ञाच्या मते मानवी बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट नाही. तिचे नऊ वेगवेगळे प्रकार किंवा पैलू आहेत. या नऊ पैलूंचा थोडक्यात वेध घेऊ या.
गणिते सोडवणे आणि कुठच्याही विषयाचा तार्किक दृष्टिकोनातून विचार करणे हा ‘गणिती-तार्किक बुद्धिमत्ते’चा भाग आहे. अमूर्त संकल्पना हाताळणे, एखाद्या घटनेचा, विषयाचा सर्वांगांनी विचार करणे, कार्यकारणभाव ओळखणे, इत्यादी गोष्टी या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या कक्षेत येतात. ‘भाषिक बुद्धिमत्ता’ म्हणजे भाषा, शब्द वापरण्याची क्षमता. वाचनाची आवड, शब्दांच्या वेगवेगळ्या छटांची जाण, व्याकरणाची मूलभूत जाण. लेखन, निवेदन इत्यादी गोष्टींत प्रावीण्य मिळवण्यासाठी ही बुद्धिमत्ता आवश्यक असते.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : भगवानराव देशपांडे
त्रिमितीय विश्वात नक्की कुठला बिंदू कुठे आहे आणि कालानुरूप ते कसे हलतात याची मनातल्या मनात ज्यांना उत्तम कल्पना करता येते त्यांच्याकडे ‘अवकाश-कालात्म बुद्धिमत्ता’ आहे असे म्हणता येते. भूमिती, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला यांसाठी बुद्धिमत्तेचे हे अंग अत्यावश्यक असतं.
संगीताच्या सर्व पैलूंचे ज्ञान आणि त्यांबद्दलचे आकर्षण ही सांगीतिक बुद्धिमत्तेची देणगी आहे. स्वर ओळखणे, सुरात गाता येणे, एखाद्या वाद्यावर सहज हुकुमत मिळविणे इत्यादी या बुद्धिमत्तेची लक्षणे असतात. स्वत:च्या शरीरावर, हालचालींवर उत्तम ताबा असणे म्हणजे ‘शारीरिक बुद्धिमत्ता’ असणे. खेळाडू, नर्तक, अभिनेते आणि अॅथलिट होण्यासाठी ही आवश्यक असते. नृत्याची किंवा खेळांची आवड आणि त्यात प्रावीण्य या शारीरिक बुद्धिमत्तेच्या खुणा म्हणता येतील.
झाडे-पाने-फुले, आकाश-पाणी-माती, पक्षी-प्राणी-कीटक यांसारख्यांची आकर्षणे, त्यांच्याशी नाते जोडण्याची क्षमता ही ‘नैसर्गिक बुद्धिमत्ते’तून येते. जीवशास्त्रज्ञ, पक्षीनिरीक्षक, निसर्गप्रेमी यांना ही आवश्यक ठरते.
समाजात वावरताना इतर व्यक्तींशी जुळवून घेणे, त्यांच्याशी मैत्री करणे, त्यांच्या भावनांबाबत सहानुभूती बाळगणे ही कला ‘भावनिक-बाह्य बुद्धिमत्ते’मुळे येते. कोणत्याही क्षेत्रातील नेत्याला ही बुद्धिमत्ता आवश्यक असते.
स्वत:च्या भावना, विचारप्रक्रिया, क्षमता आणि मर्यादांची योग्य जाण असणे आणि त्याहीपलीकडे आयुष्याचा मार्ग आखण्यासाठी त्यांचा वापर करता येणे हे ‘भावनिक-अंतर्गत बुद्धिमत्ते’मुळे जमते. या बुद्धिमत्तेमुळे माणसे आनंदी राहू शकतात. आपल्या मानवी अस्तित्वाबद्दल खोलात जाऊन विचार करण्याची क्षमता म्हणजे ‘अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता’. ही बुद्धिमत्ता प्रगल्भ असणाऱ्या व्यक्ती तत्त्वज्ञानी होतात. मानवानेच बनविलेल्या संगणकात यातील किती प्रकारच्या बुद्धिमत्तांचे रोपण मानव करू शकला हे आपण पुढच्या दोन भागात बघणार आहोत.