सूक्ष्मजीवशास्त्रात जीवांची ओळख ही अत्यंत निर्णायक प्रक्रिया असते. पारंपरिक पद्धतीने जीवाणू वा बुरशींची ओळख करण्यासाठी विविध जैवरासायनिक चाचण्या, रंगविलयन पद्धती, वसाहतींच स्वरूप, स्निग्धाम्ल संरचना विश्लेषण, तसेच प्रतिजैविक प्रतिकार नमुन्याचे तुलनात्मक परीक्षण, अशा वेळखाऊ प्रक्रियांवर अवलंबून राहावे लागे. मात्र, १९७९ साली फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. अॅलन राँबॅक यांनी ईशेरिशिया कोलाई या जीवाणूच्या शोधासाठी पहिले क्रोमोजेनिक (रंग) संवर्धन माध्यम विकसित केले व सूक्ष्मजीव निदानाच्या क्षेत्रात नवदिशा खुल्या झाल्या. यातून सूक्ष्मजीव ओळखण्यासाठी अनेक विविध प्रकारची रंगनिर्मितीक्षम माध्यमे विकसित झाली.
या माध्यमांमध्ये सूक्ष्मजीव विशिष्ट प्रकारचा विकर (एन्झाइम) तयार करतो. हा माध्यमातील विशिष्ट रंगहीन संयुगाचे विघटन करतो आणि त्यामुळे रंगीत घटक निर्माण होतो. हे रंगद्रव्यघटक वसाहतींवर विशिष्ट ठळक रंग निर्माण करतात. परिणामी, साध्या प्रकाशात ठळक रंगभेद तयार होतो, जो नुसत्या डोळ्यांनी सहजपणे ओळखता येतो. त्यामुळे वसाहतींचा रंग हा त्या विशिष्ट सूक्ष्मजीव प्रजातीची अचूक ओळख ठरतो.
विकर आणि संयुग यांच्या विशिष्ट परस्परक्रियेद्वारा विशिष्ट सूक्ष्मजीवच ते रंग तयार करू शकतात. उदाहरणार्थ, क्रोमोजेनिक क्लेबसिएला ओळख माध्यम हे क्लेबसिएला न्युमोनिए या जीवाणूच्या ओळखीसाठी वापरले जाते आणि यामध्ये ?-ग्लुकोसिडेज हा क्रोमोजेनिक आधारक निळसर रंग निर्माण करतो. यामुळे निदानाची प्रक्रिया ४८-७२ तासांवरून १८-२४ तासांवर आली आहे.
अन्नसुरक्षा, जलपरीक्षण, लसविकास, औषध उद्याोग आणि वैद्याकीय निदान या क्षेत्रांमध्ये क्रोमोजेनिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मूत्रमार्गातील संसर्ग ओळखण्यासाठी वापरले जाणारे यूटीआय क्रोमोजेनिक माध्यम हे विशिष्ट विकर-आधारक परस्पर संक्रियेद्वारे ईकोलाय, एंटरोकॉकाय, प्रोटिअस इत्यादींसारख्या संसर्गजन्य जीवाणूंना त्यांच्या वसाहतीभोवती स्पष्ट रंगनिर्मितीद्वारे वेगळे ओळखते. अशा प्रकारे केवळ २४ तासांत मूत्रद्रवात उपस्थित जीवाणूंची अचूक व सहज ओळख शक्य होते, तसेच कँडिडा माध्यमाच्या साह्याने मिश्रनमुन्यांमधून काही तासांतच विविध कँडिडा प्रजातींचं अचूक निदान शक्य होतं.
काहीवेळा विविध सूक्ष्मजीव प्रजाती समान विकर तयार करतात, त्यामुळे त्यांच्या आधारकाशी होणाऱ्या संक्रियेत समान रंग निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी रंगनिर्मितीत गोंधळ होऊ शकतो. काही सूक्ष्मजीव अत्यंत मंद वाढ दर्शवतात किंवा अपुरी विकरअभिव्यक्ती करतात, ज्यामुळे रंगनिर्मिती अपूर्ण राहते. परिणामी, निदानात अचूकतेचा अभाव संभवतो. सूक्ष्मजीव ओळख तंत्रज्ञानात जीनॉमिक्स, मास-स्पेक्ट्रोस्कोपी यांसारख्या अत्याधुनिक साधनांचा झपाट्याने विकास होत असतानाही, रंगनिर्मितीक्षम माध्यमांची गरज मात्र कमी झालेली नाही.
– डॉ. गिरीश महाजन
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org