गणित ऑलिम्पियाड किंवा तत्सम इतर स्पर्धा परीक्षांचा मूळ हेतू विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल प्रेम आणि उत्साह वृद्धिंगत करणे हा आहे. स्पर्धात्मक परीक्षांमधून गणिताच्या अध्ययनाला चालना देणे आणि प्रश्न सोडवण्याची अनेक तंत्रे माहीत करून देणे हे साधले जाते. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारी बरीच मुले पुढे गणिताची निवड करतात आणि संशोधन क्षेत्रात चमकतात. पण अनेक मुले संगणक विज्ञान, तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतही जातात. ऑलिम्पियाडच्या परीक्षेमध्ये मर्यादित वेळेत अतिशय कठीण प्रश्न सोडवायचे असतात तर संशोधन क्षेत्रात वेळ भरपूर असतो आणि प्रश्नांचे स्वरूप वेगळे असते हा महत्त्वाचा फरक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही तर तर्काचा पाया असलेले एक उपयोगी शास्त्र आहे. गणित हा विषय ज्यांना मनापासून आवडतो त्यांना त्यातून वेगळाच आनंद मिळतो आणि गणिताखेरीज इतर काही करणे त्यांना नकोसे वाटते. याउलट ज्यांना गणित आवडत नाही त्यांना त्याबद्दल भीती, तिडीक वाटते. काही वेळा अशी भावना चुकीच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे निर्माण झालेली असते. कारण शिक्षकांनाही योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळालेले नसते.

भारताची आतापर्यंतची कामगिरी फार उत्तम नाही. सुमारे १०० देशांमध्ये आपला क्रमांक फक्त एकदा सातवा होता. दर वेळी संघातील सहापैकी पाच किंवा सहा विद्यार्थ्यांनाही रौप्य किंवा कांस्य पदक मिळते, पण सुवर्णपदके मात्र कमी मिळालेली आहेत. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे मुलांना असणारे आय.आय.टी.चे आकर्षण आणि उत्तम प्रशिक्षकांचा अभाव. गेल्या काही वर्षांत माजी ऑलिम्पियाडचे विद्यार्थी आणि पदकविजेते प्रशिक्षणात मदत करू लागले आहेत ही गोष्ट अपेक्षा उंचावणारी आहे.

रशियातील सेंट पीटसबर्ग येथे जुलै २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताच्या पाच स्पर्धकांना पदके मिळाली. प्रांजल श्रीवास्तव – सुवर्णपदक, अनीश कुलकर्णी – रौप्यपदक आणि अनन्या रानडे, रोहन गोयल, सुचिर कौस्तव – कांस्य पदक. विशेष अभिनंदनीय म्हणजे प्रांजल श्रीवास्तवने दोन वेळा सुवर्णपदके (२०१९, २०२१) व एकदा रौप्यपदक (२०१८) असे यश मिळवले आहे. करोना संकटामुळे ही स्पर्धा आभासी पद्धतीने झाली.

ज्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडमध्ये पैकीच्या पैकी म्हणजे ४२ गुण मिळतात त्यांना गणितातील असामान्य प्रतिभेचे धनी म्हटले पाहिजे. या विद्यार्थ्यांना अनेक पारितोषिके, शिष्यवृत्त्या मिळतात. विनोदाने असे म्हटले जाते की हे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी हार्वर्ड, बर्कले, स्टॅनफर्ड येथील विश्वविख्यात विद्यापीठांत अर्ज करत नाहीत तर अशी विद्यापीठे ‘तुम्ही आमच्याकडे या’ म्हणून त्यांच्याकडे अर्ज करतात!

– डॉ. रवींद्र बापट

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India performance in international maths olympiad zws
First published on: 14-10-2021 at 00:35 IST