– नारायण वाडदेकर
हे विश्व पोलिओमुक्त झाले आहे का? तर, नक्कीच नाही. भारत मात्र २७ मार्च २०२४ रोजी पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. ‘पोलिओमायलायटिस’ किंवा पोलिओ हा ‘चेतारज्जूदाह’ घडवणारा, लहान मुलांना जन्मभरासाठी पांगळे करणारा रोग गेली चार हजार वर्षे लोकांना माहीत आहे. अजूनही पोलिओचे रुग्ण पाकिस्तान, अफगाणिस्तानात सापडतात. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन झाले आहे, असे म्हणता येत नाही. पोलिओला अद्याप औषध नाही. पोलिओचे विषाणू रोग्याच्या विष्ठेतून, अन्न-पाण्याद्वारे निरोगी माणसात येतात. बहुसंख्य लोकांना पोलिओची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काहींना जुलाब, थोडा ताप, डोकेदुखी, उलट्या अशी किरकोळ लक्षणे दिसतात. केंद्रीय चेतासंस्थेत पोलिओ विषाणूप्रवेश झाल्यावर स्नायूंवरील चेतासंस्थेचे नियंत्रण जाते. लकवा होतो. शेवटी श्वसनासाठीचे, गिळण्यासाठीचे स्नायू काम करेनासे होऊन मृत्यू ओढवतो. दुर्दैवाने पाच वर्षांपर्यंतच्या मुलांत पोलिओ रोगप्रमाण जास्त असते.
आपली रोगप्रतिक्षमसंस्था पोलिओ विषाणूंचा यशस्वीपणे नाश करते. आपल्याला संसर्ग झाला होता, हेच बहुसंख्यांना कळत नाही. १९०८ मध्ये डॉ. कार्ल लँडस्टायनर, या रक्तगटशोधकाने पोलिओ विषाणू शोधला. पोलिओमुळे मेलेल्या मुलाच्या चेतारज्जूतला रस, वानरांना टोचला तेव्हा ती वानरे पोलिओग्रस्त झाली.
१९५५ साली डॉ. जोनास साल्क यांनी शरीरात टोचून घालण्याची पोलिओ प्रतिबंधक लस निर्मिली. परंतु त्यापासून मिळणारी प्रतिकारकशक्ती दीर्घकाळ टिकणारी नव्हती. ती ‘मृतलस’ या प्रकारची होती.
१९३९ सालापासून डॉ. अल्बर्ट साबिन यांनी लंडनच्या लिस्टर संस्थेत एक वर्ष आणि न्यूयॉर्कच्या रॉकफेलर संस्थेत पाच वर्षे संशोधन केले. १९६० मध्ये डॉ. अल्बर्ट साबिन निर्मित आणखी प्रभावी, वापरण्यास सोपी, स्वस्त, तोंडाने देण्याची, पोलिओ-लस मिळू लागली. ही लस ‘जिवंत लस’ प्रकारची होती. १९५४ साली या लशीचे प्रयोग करण्यासाठी कोणी तयार होईना. अशा वेळी त्यांनी स्वत:च्या दोन मुलींवरच या लशीचे प्रयोग करण्याचे धाडस केले. पोलिओप्रतिबंधक लशींचा सर्वदूर उपयोग सुरू झाला. १९९४ मध्ये पाश्चात्त्य देशात पोलिओ आटोक्यात आला. पीव्ही१, पीव्ही२, पीव्ही३ असे तीन पोलिओ विषाणूप्रकार आहेत. पीव्ही१ मुख्यत: पाकिस्तान, अफगाणिस्तानात आढळतो. पीव्ही२ भारतातील उत्तर प्रदेशात १९९९ पर्यंत होता; आता नाही. पाकिस्तान आणि नायजेरियात पीव्ही३ आढळत असे. सध्याच्या पोलिओ-लशी पीव्ही१, पीव्ही३ प्रतिबंधक आहेत. पोलिओ संक्रमण शक्यता थोडी जास्त असल्यास तोंडावाटे ‘दो बूंद जिंदगी के’ पोलिओ लस देतात. अमेरिकेसारख्या देशांत पोलिओची शक्यता शून्यवत असल्यामुळे तोंडावाटे दिली जाणारी प्रभावी लस देण्याची गरज नसते. तेथे टोचून देण्याची कमी प्रभावी लस दिली जाते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org