लंडन ब्रिजनंतर टेम्सवर २३ पूल बांधले गेले तरी मूळ लंडनकरांचा लंडन ब्रिज विशेष जिव्हाळ्याचा. या पुलाचे वैशिष्टय़ असलेली पुलावरच बांधलेली लाकडी घरे राजाने बांधून लोकांना विकली. घरांमधून आलेल्या पशांमध्येच पुलाच्या बांधकामाचा खर्च परस्पर फिटला! कठडय़ांऐवजी बांधलेल्या या घरांमुळे पुलाची मूळ रुंदी निम्मीच झाली! या घरांना लागलेल्या आगीत ३००० माणसांचा मृत्यू झाला. लंडन ब्रिजचा आणखी एक आगळा उपयोग तत्कालीन राजे आणि राजकारणी लोकांनी करून घेतला. गुन्हेगार, राजद्रोही, राजाचे विरोधक, धर्माधांचे विरोधक यांना जवळच्याच टॉवर ऑफ लंडनमध्ये शिरच्छेदाची शिक्षा दिली जाई. त्यानंतर त्यांची मुंडकी या पुलावर लटकवली जात. लंडनचा केंद्रिबदू झालेला लंडन ब्रिज हा रहदारीचा आणि वर्दळीचा भाग बनला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ती मुंडकी पाहून वचक बसावा, कुणीही राजसत्तेविरुद्ध आणि धर्मगुरूंविरुद्ध ब्र काढू नये, गुन्हेगारी कारवाया कमी व्हाव्या म्हणून केलेली ही उपाययोजना! कावळ्यांनी, गिधाडांनी ही डोकी खाल्ल्यावर आतल्या कवटय़ा वादळे, पावसामुळे खाली नदीत पडत. विल्यम वॉलेस, थॉमस मूरसारख्या स्वातंत्र्याच्या अनेक पुरस्कर्त्यांनाही इतर गुन्हेगारांसमवेत या अवहेलनेला सामोरी जावे लागले. १६७८ सालापर्यंत हा प्रकार येथे चालला. सध्या उभा असलेला लंडन ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १९७३ मध्ये बांधला गेला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
सपुष्प वनस्पती


वृक्षांची गणना सपुष्प वनस्पतीमध्ये केली जाते. सर्व सपुष्प वनस्पती ‘संवहनी’ असतात आणि त्यांना फुलं आणि बिया येतात.
या समूहातील वनस्पतींचे दोन गट आहेत. एक ‘अनावृतबीजी’ आणि दुसरा ‘आवृत्तबीजी’ या दोन्ही उपगटात वृक्षांची संख्या मोठी आहे.
अनावृतबीजी : ‘अनावृत्तबीजी’ वनस्पती जरी सपुष्प वनस्पतीमध्ये गणली जात असली तरी या वनस्पतींना लौकिक अर्थाने ज्याला फूल म्हणतात तसे फूल येत नाही. फूल एकिलगी असते. विशेष प्रकारच्या रूपांतरित पानांवर त्यांचे परागकोष आणि बीजांडे स्थिरावतात. बीजांडे अंडाशयात सामाविष्ट नसतात. म्हणून या वनस्पतींना ‘अनावृतबीजी’ म्हणतात.
अनावृतबीजी वनस्पतींची चार कुळांत विभागणी केली जाते.
सायकॅडसी : ताडसदृश वृक्ष
गिक्गोएसी : पंखापर्णी
कोनीफेरी : सूचिपर्णी
निटेसी : कुंबळवेल वृक्ष
सायकॅडसी : या कुळातील वृक्ष साधारण ताडाप्रमाणे दिसतात. वाढ अतिशय मंद असते. या कुळातील वनस्पती अनेक बागांमधून बघायला मिळतात. उदा. सायकस, झ्ॉमीया, इंसेफॅलारटस.
कोनीफेरी : या वृक्षांच्या प्रजाती समुद्रसपाटीपासून पावणेदोन हजार मीटर उंचीवर आढळतात. त्यांची पाने सुईप्रमाणे दिसतात. म्हणून त्यांना सूचिपर्णी म्हणतात. खूप उंचीवर वाढणाऱ्या या वृक्षांना हिमवृष्टीशी सामना करावा लागतो. वृक्षाच्या पानांवर बर्फ साठून राहू नये म्हणून या वृक्षांनी स्वत:मध्ये बदल घडवून आणला आणि वृक्षसंभार साधारण शंकूप्रमाणे झाला. या वृक्षांच्या फुलांना कोन म्हणून संबोधले जाते. मेल कोन आणि फिमेल कोन अशा दोन प्रकारची फुले या वृक्षांवर दिसून येतात. या गटातील वनस्पतींचा उपयोग इमारती लाकूड, कागद करण्यासाठी, रेझीन मिळवण्यासाठी होतो. उदा. पायनस, स्रिडस क्यूफ्रेसस, टॅक्ससस. चिलगोझा या वृक्षाच्या बियांचा उपयोग सुकामेवा म्हणून करतात.
पंखापर्णी वृक्ष – पाने पंख्यासारखी असतात. चीन आणि जपानमध्ये हे वृक्ष मोठय़ा प्रमाणात आढळतात. भारतात हे वृक्ष फार कमी प्रमाणात आढळतात.
कुंबळवेल वर्ग : या वर्गात ‘एफ्रिडा’ नावाची वनस्पती खोड, रोपटे आणि वेलीच्या आकारात आढळते. ही एक औषधी वनस्पती आहे. कुंबळ ही वनस्पती काष्ठवेल आहे. पश्चिम घाटात अनेक मोठय़ा वनस्पतींच्या आधारे वाढताना दिसते.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about new london bridge
First published on: 18-01-2016 at 03:10 IST