कुतूहल: असा असावा गणितशिक्षक

चालायला शिकणारे लहान मूल जसे अनेकदा अडखळते, तसे गणितात विद्यार्थी खूप ठिकाणी अडखळतात.

‘‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?’’ या गाण्यातील गणिताची भीती शाळेतच अनेक मुलांचा ताबा घेते. गणित विषय अवघड वाटतो याचे कारण या विषयाचे स्वरूप, ज्यात अनेक अमूर्त संकल्पना, सूत्रे, चिन्हे, आकडेमोड, आकृती रेखाटन, गणिती परिभाषा, तर्कशुद्ध विचार, काटेकोरपणा व अचूकता अशा गोष्टी आहेत. शिवाय गणित हा क्रमबद्ध विषय असल्याने मागील इयत्तेत शिकलेला घटक नीट समजला नसेल तर पुढील वर्गात त्या घटकावर आधारित भाग समजत नाही. उदाहरणार्थ, शेकडेवारी नीट समजली नाही तर नफा-तोटा, सरळव्याज, गुणोत्तर-प्रमाण यातील प्रश्न सोडवताना कठीण जाते. त्यामुळे शालेय स्तरावर गणिताची गोडी लावून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे आव्हानात्मक काम गणिताच्या शिक्षकांना विशेष प्रयत्नांनी करावे लागते. यासाठी अध्यापनात खेळ, गोष्टी, कोडी, प्रतिकृती, कागदकाम, जादूचे चौरस, गणिताचा इतिहास यांचा समावेश हवा.

चालायला शिकणारे लहान मूल जसे अनेकदा अडखळते, तसे गणितात विद्यार्थी खूप ठिकाणी अडखळतात. जसे की, शाब्दिक उदाहरणांचे गणिती रूपांतर, दिलेल्या मापांनुसार आकृती रेखाटन, समीकरण सोडवणे, किचकट आकडेमोड इत्यादी. कोनमापकाचा उपयोग करून योग्य मापाचा कोन आखणे अशा काही बाबतींत वैयक्तिक लक्ष पुरवावे लागते. अपूर्णाक व त्यावरील क्रिया हा तर आकलनाचा कठीण भाग. २/५ + ३/८ = ५/१३ असे चुकीचे उत्तर अनेक मुले देतात. हे टाळण्यासाठी विविध कृतींतून अपूर्णाक समजावून देऊन त्याचे दृढीकरण होण्यासाठी सराव घेणे गरजेचे असते. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पाठय़पुस्तकाला महत्त्व आहे. गणिताचे पुस्तकही वाचून नमुना उदाहरणे समजून घेऊन विद्यार्थी स्व-अध्ययन करू शकतात यावर शिक्षकांचा भर हवा. मुलांच्या दैनंदिन व्यवहारांतील उदाहरणे शिक्षकांनी दिली तर मुलांना रस वाटतो. स्वत: उदाहरणे तयार करण्यास प्रोत्साहन दिले तर मुलांना आवडते. वॉक, चॉक, टॉक (डब्ल्यूसीटी) या पद्धतीला नव्या डब्ल्यूसीटीची म्हणजे वेब, कम्युनिकेशन, टीमवर्क यांची जोड, तसेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हिडीओ निर्मिती यांसारखे तंत्रस्नेही उपक्रम प्रभावी होऊ शकतात.

गणिताचा विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र यांच्याशी असलेला सहसंबंध, दैनंदिन जीवनातील गणिताचे स्थान, गणिताच्या स्पर्धापरीक्षांचे महत्त्व या गोष्टी शाळेतच पटल्या तर मुले अवधानपूर्वक गणित शिकतील. हा विषय तर्कशुद्ध विचार करायला शिकवतो, एखादी समस्या सोडविण्याची प्रक्रिया शिकवतो आणि मेंदूसाठी उत्तम व्यायामाचे काम करतो हे अधोरेखित करण्यात जर शिक्षक यशस्वी झाले तर उत्तमच!

शालेय पातळीवरच गणिताचा पाया भक्कम करून घेणे, हे शिवधनुष्य पेलण्याचे काम शिक्षकाचे!

– शोभना नेने

 मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Inspiring mathematics teacher good qualities of math teacher zws

ताज्या बातम्या