आज झटकन इंटरनेटवर जाऊन तिथे पटकन माहिती मिळवणे आवश्यक व्हायला लागलं आहे. आर्थिक व्यवहारांसाठी, मोठमोठय़ा फाइल्स डाऊनलोड करताना, किंवा माहितीच्या शोधाशोधीसाठी झपाटय़ाने काम होणे गरजेचं असतं. म्हणूनच आजच्या इंटरनेट युगात आणखी एक राशी महत्त्वाची होऊ लागली आहे, ती म्हणजे माहितीचा वेग -डेटा स्पीड!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिती निरनिराळ्या माध्यमांद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येते -तारा, फायबर ऑप्टिक्स, वाय-फाय, ब्ल्यूटूथ. माहितीसाठी सर्वात छोटं एकक बिट असल्याने माहितीचा वेग बिट्स पर सेकंड (बीपीएस – bps) मध्ये मोजला जातो.

माहिती तारांमधून एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवणे, हा प्रकार नवीन होता तेव्हा वेग खरोखरच काही बीपीएस एवढाच असायचा. मग तो किलोबिट्स पर सेकंड (केबीपीएस) झाला. अर्थात आजच्या सुसाट जमान्यात मेगाबिट्स पर सेकंड (एमबीपीएस) हे एकक जास्त प्रमाणात वापरलं जातं. जवळच्या अंतरासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्ल्यूटूथचा वेग सुमारे ३ एमबीपीएस असतो, तर फोर-जी तंत्रज्ञान वापरून मोबाइल डेटा २०-५० एमबीपीएसपर्यंत वेग देऊ शकतो. आता तो दरवेळी मिळेलच की नाही, हे मात्र बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं!

आज जगात सर्वाधिक वेगाने माहिती डाऊनलोड करण्याचा मान जातो दक्षिण कोरियाकडे – सरासरी २८.६ एमबीपीएस! भारतात सरासरी वेग पडतो २.८ एमबीपीएस, म्हणजे दक्षिण कोरियाच्या एक दशांश. अर्थात ही सरासरी आहे, आणि मोठय़ा शहरांमध्ये याहून चांगला वेग मिळतो.

इंटरनेट वापरून फोन कॉल करायचा असेल तर ३०-५० केबीपीएस वेग पुरेसा होतो. व्हिडीओ कॉल करायचा असेल तर ४०० केबीपीएस जरूरी असतो. आज आपण अ‍ॅप्स वापरून दोन्ही सहज करू शकतो. इंटरनेटवरून गाणी स्ट्रीम करून ऐकायची असतील तर साधारण १००-२००  केबीपीएस वेग लागेल. हेच जर व्हिडीओ पहायचे असतील तर निदान २ एमबीपीएस, आणि एचडी दर्जाच्या व्हिडीओसाठी ५ एमबीपीएस वेग लागेल.

माहिती डाऊनलोडपेक्षा अपलोड करण्याचा वेग नेहमी कमी असतो. याचं कारण म्हणजे डाऊनलोड करण्याचं प्रमाण हे अपलोडच्या तुलनेत खूप जास्त असल्याने या यंत्रणेचा आराखडा मुख्यत्वे डाऊनलोडसाठी म्हणून तयार केलेला असतो.

– मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अमरकान्त यांचे कथासाहित्य

अमरकान्त यांचे कथालेखन हे स्वातंत्र्योत्तर काळातील आहे. या काळात आपल्या विकसनशील देशात औद्योगिक संस्कृतीचा विकास पुरेसा झालेला नव्हता आणि सामाजिक, कौटुंबिक संबंधातही थोडे बदल होऊ घातले होते. अशा वातावरणाचं चित्रण अमरकान्त यांच्या कथांतून अधिकतर दिसतं. त्यांच्या एकूणच लेखनावर गांधीवादी विचारसरणीचा, अहिंसक मार्गाचा प्रभाव दिसून येतो. मध्यमवर्गीय जीवनाचे उपहासपूर्ण चित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ आहे. तसंच त्यांच्या कथांतील अनेक व्यक्तिरेखा सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त असल्या तरी धूर्त, बेईमान अशा आहेत. असे नेता, ऑफिसर यांच्या भ्रष्टाचाराचे उपहासात्मक चित्रण त्यांनी केले आहे. ‘जिन्दगी और जोक’ या कथासंग्रहासह त्यांचे एकूण बारा कथासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यापैकी प्रमुख आहेत- ‘मौत का नगर’, ‘कुहासा’, ‘तूफान’, ‘औरत का क्रोध’, ‘एक धनी व्यक्ती का बयान’ आणि ‘सुख और दु:ख का साथ’ त्यांच्या लेखनाला गावच्या मातीचा स्पर्श आणि गंध असल्याने वाचक भारावून जातात.

अमरकान्त यांच्या लेखनाचं वैशिष्टय़ हे  की, समाजात भ्रष्टाचार माजवणाऱ्या व्यक्तिरेखांचं आपल्या भ्रष्ट कारभराविषयी- कुकर्माविषयी ढोंगीपणाने पोकळ तर्क-वितर्क करतात आणि मग त्यांच्या बोलण्यामुळेच त्यांचा भ्रष्टाचार उघडकीला येतो. समाजातील या गोंधळलेल्या भ्रष्टाचारी सन्माननीय सदस्याचे वर्णन करताना ‘अंतरात्मा’ कथेत ते लिहितात, ‘जुलैतील त्या रात्री शहरातील एक प्रसिद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक नेता, नारी कल्याण समितीचे संस्थापक, ललितकला संस्थेचे संरक्षक, राष्ट्रीय विद्यालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आपल्या शांतदान विजयाचे सुख उपभोगित खोलीतील पलंगावर पहुडले होते. सफेद चुनीदार पायजमा, रेशमी शेरवानी, गांधी टोपी परिधान केलेले त्यांचे भुलभुलीत शरीर पाहून फुटबॉलचीच आठवण येत होती.’

मध्यमवर्गीय जीवनाचं व्यंगात्मक चित्रण करताना ‘आत्मकथा’ कथेमध्ये उपहासाने ते लिहितात- ‘आपल्या बहिणीच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेवर त्याने पत्ता लिहिला होता’, ‘मच्छर भवन’, ‘मच्छर रोड’ हे लिहिण्याचे कारण काय असावे? म्युनिसिपालिटीच्या कारभारावर टीका की नातेवाइकांनी लग्नाला येताना मच्छरदाणी घेऊन येण्याची सूचना?’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internet information speed
First published on: 23-11-2017 at 02:45 IST