मूळ रोमन साम्राज्याचा सम्राट कान्स्टन्टाइन याने पूर्वेकडे प्रतिरोम स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने कॉन्स्टन्टिनोपल या शहराची स्थापना केली. हे शहर प्रति रोम असावे यासाठी त्याने एवढी काळजी घेतली की जसे रोम सात टेकडय़ांवर वसलं आहे तसंच कॉन्स्टन्टिनोपलही सात टेकडय़ांवर वसवण्यात आलंय! वैभवाच्या बाबतीत तर या शहराने रोमवरही मात केली. रोमचा पाडाव झाल्यानंतरही जवळजवळ एक हजार वष्रे कॉन्स्टन्टिनोपल आपली सत्ता आणि वैभव टिकवून होते. पुढे ओटोमान सत्ता काळात या शहराचे नाव इस्तंबूल झाले. आधुनिक इस्तंबूल मात्र १९२४ साली जन्माला आले असे म्हणता येईल. तुर्कस्तानची राजकीय राजधानी सध्या अंकारा शहरात असली तरी औद्योगिक आणि आíथक राजधानी मात्र इस्तंबूलच आहे. २०१५ सालाच्या जनगणनेनुसार जवळपास दीड कोटी नागरी आणि उपनगरीय लोकसंख्या असलेल्या इस्तंबूल शहरातील प्रशासकीय सेवांसाठी बारा ‘काझा’ म्हणजे भागांमध्ये विभागले आहे. आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांत वसलेल्या इस्तंबूलची एकतृतीयांश लोकसंख्या आशियाई विभागात आहे. अधिक लोकसंख्येच्या बाबतीत जगात सातव्या क्रमांकावर असलेल्या इस्तंबूलची सर्वोच्च लोकसंख्येचे युरोपियन शहर म्हणून ओळख आहे. तुर्कस्तानचा राष्ट्रीय अध्यक्ष इस्तंबूल शहराच्या मेयरची नियुक्ती करतो. नगरवासीयांच्या मतदानातून त्याची निवड पाच वर्षांसाठी होते. इस्तंबूलमधील एकूण लोकसंख्येपकी ९८ टक्के इस्लामधर्मीय असून त्यापकी दोनतृतीयांश लोक सुन्नी पंथीय तर उर्वरित लोक अलेवी म्हणजे शिया पंथीय आहेत. गेल्या तीन हजार वर्षांमध्ये साठ वेळा सत्तांतरे झालेल्या इस्तंबूलमध्ये विविध संस्कृतींचे मिश्रण आढळते. केमाल पाशाने १९२४ साली प्रजासत्ताक सरकार आणून तत्पूर्वीची जुनाट, बुरसटलेली कर्मठ इस्लामी जीवनपद्धती बदलून इस्तंबूलमध्ये आधुनिक पाश्चिमात्य जीवनशैली आणली. इस्तंबूलच्या सांस्कृतिक महत्त्वामुळे २०१० साली युरोपच्या सांस्कृतिक राजधानीचा मान इस्तंबूलला मिळाला. तसेच या शहरातील अनेक मध्ययुगीन वास्तूंची नोंद युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

अग्रणी वनस्पती उद्यान

संपूर्ण सजीवसृष्टी ही वातावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलांना सामोरी जात आहे. वनस्पतींचे संवर्धन केल्यामुळे संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. वनस्पतींच्या संवर्धनाची आणि संगोपनाची गरज ओळखून म्हणजेच वनस्पतींची उत्तम वाढ ही त्यांच्या नसर्गिक अधिवासापासून वेगळीकडे करण्याचे प्रयत्न चालू झाले. दुर्मीळ, नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या वनस्पती व प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे संवर्धन मुख्यत: या ठिकाणी केले जाते. वनस्पतींचे संवर्धन, संगोपन आणि त्यांचा संशोधनात्मक अभ्यास तसेच समाजात झाडांबद्दलची माहिती पोहोचविण्यासाठी वनस्पतींची शास्त्रीयदृष्टय़ा उद्याने उभारण्यात आली आहेत. त्यांनाच ‘वनस्पती उद्यान’ म्हटले जाते

भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने सुरू झालेली ‘अग्रणी वनस्पती उद्याननिर्मितीची योजना’ ही एक प्रभावी संकल्पना आहे. अग्रणी वनस्पती उद्यानांत वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजातींचे संवर्धन करणे याशिवाय सभोवती आढळणाऱ्या उद्यानांना प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये वनस्पतींबद्दल जनजागृती करणे आणि लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक सूचना पुरवण्याचे कार्य पार पाडले जाते. अग्रणी उद्याने ही वनस्पतींच्या बाबतीत चालणाऱ्या विविध उपक्रमांचे तसेच वनस्पती संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र आहे.

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा मोठमोठय़ा वृक्षराजींनी समृद्ध आहे. येथे जवळजवळ ३५० हेक्टर जागेत वेगवेगळ्या प्रजातींची वृक्षसंपदा पाहायला मिळते. पश्चिम घाटात असणाऱ्या समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने वनस्पतिशास्त्र अधिविभागाने उद्याननिर्मितीला आरंभ केला. वनस्पती अधिविभागाची स्थापना सन १९६४ साली झाली. सुरुवातीच्या काळात २.५ हेक्टर जमिनीवर उद्यानाची रूपरेषा आखली गेली, मात्र त्याला मूर्त स्वरूप हे सन १९८५ या वर्षी आले कारण या वेळेस विद्यापीठाकडून वनस्पतिशास्त्र विभागास आणखी २.५ हेक्टर जागा मिळाली.

सन १९९६ मध्ये केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून वनस्पती उद्याननिर्मितीसाठी अनुदान देण्यात आले. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिमघाटातील नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या दुर्मीळ प्रजातींना उद्यानात फुलवले गेले. २००५ सालापर्यंत उद्यानात १५० प्रदेशनिष्ठ वनस्पतींची भर पडली. याच वर्षी उद्यान परीक्षणासाठी विशेष समिती नेमण्यात आली. त्यांनी पाहणी केल्यावर याच उद्यानास वनस्पती अग्रणी उद्यान म्हणून मान्यता देण्यात आली.

– प्रा. श्रीरंग यादव (कोल्हापूर)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Istanbul city in turkey
First published on: 26-09-2016 at 02:51 IST