आपला देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडहून कापड आयात केले जायचे. तेच कापड मोठय़ा प्रमाणात बाजारात असायचे. म्हणून त्या वेळी खादीचे कापड वापरणे ही देशाभिमानाची गोष्ट असायची. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि खादीबाबत संदर्भ बदलला. आपल्याकडे विपुल प्रमाणात सर्व प्रकारचे कापड तयार होते. आता खादी वापरणे ही फॅशन झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण खादी म्हणजे कोणते कापड हा प्रश्न उरतोच.

आपल्या देशात कापसापासून हाती सूत कातण्याची पद्धत पूर्वापार होती. महात्मा गांधींमुळे चरखा वापरून सूत कातणे सर्वाना माहीत होतेच. हे सूत कातणे जसे हाती केले जायचे तसेच कापड विणण्याची क्रिया ही हातमागावर म्हणजेच हातानेच केली जायची. कापूस स्वच्छ करणे, तो िपजणे, त्याचा पेळू बनवणे त्यापासून सूत कातणे. मग कापड विणण्याकरिता ताणा आणि बाणा सूताची पूर्वतयारी करणे, ताण्याच्या सुताचे गरजेनुरूप बीम बनवून आणि बाण्याचे सूत कांडय़ावर गुंडाळून हातमागावर कापड तयार करणे. त्यावर विरंजन क्रिया (ब्लीचिंग) करायची असेल तर तीही घरगुती पद्धतीने हातीच केली जायची. कधी कुर्ता शिवण्यासाठी कापड (रंगीत) हवे असेल किंवा साडीसाठी रंगीत सूत हवे असेल तर सूताची रंगाई पण हातीच केली जायची. त्या वेळी नसíगक रंगाचा वापर केला जायचा, त्या कापडाला इस्त्री करण्यासाठीसुद्धा लाकडी धोपटय़ाचा वापर केला जायचा. अशा पद्धतीने तयार केले जाणारे कापड खादी म्हणून ओळखले जाते. व्रतस्थ मंडळींपकी काही सूतकताई आणि कापडविणाई स्वत:च करायचे तर काही फक्तसूतकताई करून त्यापासून हातमागावर कापड तयार करून घ्यायचे.
मग आता यंत्रयुग आल्यावर अनेक बदल घडून आले. साध्या चरख्याऐवजी अंबर चरखा आला. त्यात गिरणीतील बांगडी साच्याप्रमाणे सूत कातण्याची व्यवस्था वापरली जाते. फक्त मानवी श्रमाचाच वापर होतो. त्यानंतर आलेल्या लोकयंत्रात मात्र विद्युत ऊर्जेचा वापर आहे. हे सूत खादी म्हणून वापरणे कितपत सयुक्तिक आहे? काळानुरूप लोकसंख्यावाढ, कापडाच्या दरडोई वापरात वाढ याचा मेळ बसवायला यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग वापरणे आवश्यक झाले आहे. म्हणून आता खादी फॅशनपुरतीच उरली आहे.

दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.