scorecardresearch

कुतूहल : चतुर आणि हेलिकॉप्टर

विमानासारखे हेलिकॉप्टरही आकाशात उडणारे यंत्र आहे, पण दोघांत एक मूलभूत फरक आहे. विमानाला धावपट्टी आवश्यक असते.

विमानासारखे हेलिकॉप्टरही आकाशात उडणारे यंत्र आहे, पण दोघांत एक मूलभूत फरक आहे. विमानाला धावपट्टी आवश्यक असते. हेलिकॉप्टर धावपट्टीच्या मदतीशिवाय आकाशात सरळ वर झेप घेते किंवा खाली उतरते. पक्ष्यांमध्ये मोर हा एक पक्षी असा आहे की ज्याला उडण्याआधी विमानाप्रमाणे धावून पुरेशी गती प्राप्त करावी लागते व मगच उडता येते. अन्य पक्ष्यांना धावपट्टी आवश्यक नसली तरी हेलिकॉप्टर जसे ऊर्ध्व रेषेत सरळ वर उडते, तसे पक्षी उडत नाहीत. ते पुढच्या व वरच्या दिशेने हवेत ‘झेपावतात’. फक्त ‘चतुर’ हा कीटक हेलिकॉप्टरप्रमाणे ऊर्ध्व रेषेत वर उडू शकतो.

हेलिकॉप्टर सरळ वर जाऊ शकते, खाली येऊ शकते किंवा हवेत एका जागी स्थिर राहू शकते याचे कारण त्याच्या डोक्यावर असलेला फिरणारा पंखा. तो वरच्या भागात विरळ हवेचे क्षेत्र तयार करतो व अन्य हवेच्या दाबामुळे हेलिकॉप्टर त्या दिशेने उचलले जाते.

सर्व प्रकारच्या हेलिकॉप्टर्समध्ये इंजिन, चक्राकार फिरणारी पंख्यांची पाती, हा पंखा फिरवणारा रोटर, पायलट-प्रवासी बसतात ती केबिन, हेलिकॉप्टरची शेपटी, शेपटीवरचा छोटा पंखा व जमिनीवर उतरण्याकरता सोयीचे असे सरळ दांडे किंवा चाके हे समान घटक असतात. उडणाऱ्या हेलिकॉप्टरवर चार तऱ्हेची बले एकाच वेळी कार्य करत असतात. पुढे ढकलणारे, मागे ओढणारे, वर उचलणारे आणि खाली खेचणारे बल! पुढे ढकलणारे बल इंजिनाच्या रेटय़ाने पंख्यांची पाती फिरल्यामुळे तयार होते. तर मागे ओढणारे बल हेलिकॉप्टरला लागून उलट दिशेने वाहणारा हवेचा प्रवाह जी खेचण्याची क्षमता तयार करतो (ड्रॅग) त्यातून येते. तसेच चक्राकार फिरणाऱ्या पंख्यांमुळे तयार होणाऱ्या विरळ हवेच्या क्षेत्रातून वर उचलण्याच्या बलांची निर्मिती होते. गुरुत्वाकर्षण हेलिकॉप्टरला खाली खेचत असते. यात भरीस भर म्हणून या सर्व बलांच्यामुळे तयार होणारे ‘चक्रीय बल’ (टॉर्क) हेलिकॉप्टरला उभ्या-आडव्या अक्षाभोवती गोलाकार फिरवायच्या प्रयत्नात असते.

हेलिकॉप्टरच्या छतावर बसवलेल्या पंख्यांची पाती एका मुख्य रोटरला जोडलेली असतात. ही पाती वरच्या बाजूने फुगीर तर खालच्या बाजूने सपाट असतात. फिरत्या पात्यांच्या वरून-खालून वेगाने जाणाऱ्या हवेमुळे तसेच पात्यांच्या वर आणि खाली असणाऱ्या दाबाच्या फरकामुळे हेलिकॉप्टर वर उचलले जाते. ही पाती मुख्य रोटरला अशा तऱ्हेने जोडलेली असतात की ती वर- खाली- मागे- पुढे अशी उभ्या व आडव्या अक्षाभोवती फिरवता येतात. यामुळेच हेलिकॉप्टर पुढे- मागे- डाव्या- उजव्या बाजूला नेता येते.

– डॉ. माधव राजवाडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org 

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal airplane helicopters sky flying machine basic ysh

ताज्या बातम्या