scorecardresearch

कुतूहल : प्लास्टिकचा शोध आणि वापर

वनस्पती कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या मूळ घटकांचा वापर करून स्टार्च आणि सेल्युलोज यांसारखे लांब रेणू असलेले पदार्थ तयार करतात.

कुतूहल : प्लास्टिकचा शोध आणि वापर

डॉ. संजय पुजारी

वनस्पती कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या मूळ घटकांचा वापर करून स्टार्च आणि सेल्युलोज यांसारखे लांब रेणू असलेले पदार्थ तयार करतात. यात एक लहान रेणू पुन्हा पुन्हा येत असतो. निसर्गाच्या याच तत्त्वाचा उपयोग करून मानवाने प्लास्टिक तयार केले. आपल्या दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू प्लास्टिक वापरून तयार केल्या जातात. १८६२ साली अलेक्झांडर पार्क यांनी प्लास्टिक पॉलिमरचा प्रथम शोध लावला. तिथून अनेक रेणूंची साखळी असलेले प्लास्टिक जन्माला आले. आधी ते हस्तिदंती रंगात होते, पण लवकरच विविधरंगी प्लास्टिक तयार करण्यात येऊ लागले. रेणूच्या साखळीत थोडेफार बदल करत किंवा सुरुवातीचे पदार्थ बदलून किंवा त्यांचे स्वरूप बदलून विविध प्रकारचे प्लास्टिक तयार करणे शक्य झाले.

प्लास्टिकविषयीच्या संशोधनाला खरी सुरुवात १९३०च्या सुमारास झाली. मंदीचा काळ होता. लाकूड, पोलाद यांची निर्मिती कमी झाली होती. त्यांना पर्याय म्हणून प्लास्टिकचा वापर सुरू झाला. कुजत नाही, लोखंडाप्रमाणे गंजतही नाही, म्हणून प्लास्टिक जगभर वापरले जाऊ लागले. रबराचे कोटिंग कालांतराने कडक होते. रबरी पादत्राणे चिकटत असतात म्हणून त्यांची जागा प्लास्टिकने घेतली. हीच गोष्ट तारांच्या आवरणासाठी (इन्शुलेशनसाठी) प्लास्टिक वापरायला कारणीभूत ठरली. १९६०च्या दशकात प्लास्टिकचे धागे म्हणजे नायलॉन, पॉलिस्टर, अ‍ॅक्रिलिक यांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती आणि वापर सुरू झाला. तसेच पॉलिस्टिरिन आणि पीव्हीसीचा वापर सुरू झाला. पॅकिंगसाठी पॉलिस्टिरिन फोम आणि पीव्हीसी पादत्राणे आज प्रत्येक जण मागतो.

प्लास्टिक हे कच्च्या तेलातील काही घटक वापरून तयार होते. यामुळे खनिज तेल जसे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन करून काढले जात होते, तसे प्लास्टिकचे उत्पादनही वाढत गेले. सुरुवातीचे प्लास्टिक अतिकडक असे. आज मात्र असंख्य प्रकारांत आणि पाहिजे त्या आकारांत लवचीक प्लास्टिक उपलब्ध आहे. प्लास्टिकचे दोन मुख्य प्रकार पडतात. एका प्रकारात दरवेळी उष्णता देऊन प्लास्टिक वितळवून त्याला नवीन आकार देणे शक्य होते. याला थर्मोप्लास्टिक म्हणतात. दुसऱ्या प्रकारात एकदाच दिलेला आकार कायम राहतो. याला थर्मोसेटप्लास्टिक म्हणतात. लहान-मोठय़ा बादल्या या पहिल्या प्रकारात असतात तर सुरीचे, दाराचे हॅण्डल दुसऱ्या प्रकारात मोडते. आपण रोज प्लास्टिकच्या कितीतरी वस्तू वापरतो, पण हे प्लास्टिक पर्यावरणाला हानीकारक ठरते. ते अनेक वर्षे कुजत नाही, सडत नाही, याचे विघटन होत नाही. त्यामुळे त्याचा कचरा वाढत जातो, म्हणूनच प्लास्टिकचा वापर जपून केलेलाच बरा.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या