कार्बनच्या विविध स्राोतांपासून कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जातो. यात वायू, कोळसा आणि खनिज तेल यांसारख्या जीवाश्म इंधनांचे ज्वलन आणि जंगलतोड आणि ज्वालामुखीचा उद्रेक ही प्रमुख कारणे आहेत. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे कार्य समुद्र, माती आणि जंगले करतात म्हणून त्यांना जगातील मोठे कार्बन शोषक म्हणतात. यापैकी महासागर हा एक प्रमुख कार्बन शोषक आहे. जंगलांपेक्षा खूप जास्त कार्बन शोषून घेणाऱ्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या कार्बन साठवणाऱ्या परिसंस्था समुद्रगवत कुरणे, मिठागरे आणि खारफुटीची जंगले महत्त्वाची असतात. यामुळे हवामान बदलरोधक कार्य होते. जर्मनीतील कील येथील जागतिक आर्थिक संस्थेच्या (इन्स्टिट्यूट फॉर द वर्ल्ड इकॉनॉमी) अहवालानुसार एकट्या ऑस्ट्रेलियाच्या किनारी परिसंस्था वातावरणातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि त्यामुळे उर्वरित जगाच्या हवामानाशी संबंधित सुमारे २३ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च दरवर्षी वाचतो. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त इंडोनेशिया आणि अमेरिका यांच्या किनारी परिसंस्थाही सर्वांत जास्त कार्बन संचयन करतात.

हेही वाचा >>> कुतूहल : दुधाळ समुद्र

नासाच्या संशोधन विभागाच्या निरीक्षणानुसार अंटार्क्टिक (दक्षिण) महासागर मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतो. औद्याोगिक क्रांतीदरम्यान ऊर्जेसाठी जीवाश्म इंधने जाळण्यास सुरुवात झाल्यापासून वातावरणात सोडलेल्या कार्बन डायऑक्साइडपैकी सुमारे एकचतुर्थांश कार्बन महासागराने शोषून घेतला आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते तसतसा महासागर पृष्ठभाग तो शोषून घेतो. हे पाणी नंतर खोल समुद्रात मिसळू शकते किंवा ते थंड झाल्यावर खोलवर जाते. जेथे शोषलेला कार्बन डायऑक्साइड शेकडो वर्षे बंदिस्त राहून खोल अंतर्भागातील समुद्रातून हळूहळू प्रवाहित होत राहतो. वनस्पतीप्लवक समुद्रातील सर्वांत मोठ्या कार्बन शोषकांपैकी एक आहेत. हे सूक्ष्म सागरी शैवाल आणि जिवाणू जगाच्या कार्बन चक्रात मोठी भूमिका बजावतात आणि जमिनीवरील सर्व वनस्पती एकत्रितपणे जेवढा कार्बन शोषून घेतात, तेवढेच हे प्लवकदेखील शोषतात.

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्री साप

पण काही काळानंतर कार्बन शोषून घेण्याची महासागराची क्षमता कमी होऊ लागेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वाढू शकते. पण समुद्र पुढील ५० वर्षे कार्बनशोषणाचे कार्य करत राहतील असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org