पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे जंगल कोणते? हा प्रश्न कोणी विचारला तर पटकन उत्तर सुचते अ‍ॅमेझॉन. पृथ्वी अ‍ॅमेझॉन-बरोबरच कांगो, डेनद्री, बोरनीया या प्रचंड मोठमोठय़ा जंगलांनी समृद्ध आहे. तैगा हे जंगल तर एवढे मोठे आहे, की त्याचा विस्तार रशिया ते कॅनडापर्यंत पसरला आहे. पृथ्वीच्या पृष्ठावर ७१ टक्के पाणी आणि त्यामध्ये महासागरांचा हिस्सा ९६.५ टक्के. प्रश्न असा आहे की महासागरांच्या पोटात पाणी आणि प्राणी याशिवाय अजून काही आहे का? समुद्री अभ्यासक म्हणतात- महासागरांची ओळख केवळ शार्क, व्हेल यांसारखे मोठे सजीव नसून अनेक लहान-मोठय़ा जलजीवांच्या अन्नासाठी आणि मुक्त संचारासाठी वसलेली अनेक महाकाय वनश्रीमंतीसुद्धा आहे. ही वने चक्क अ‍ॅमेझॉनपेक्षाही मोठी आहेत.

काही जंगले आपल्या भारताच्या दुपटीपेक्षाही मोठय़ा आकाराची आहेत. ही सर्व वने समुद्री शैवालांपासून तयार झालेली आहेत आणि यात केल्प, समुद्री बांबू यांचा फार मोठा वाटा आहे. यातील काही शैवाल १० ते १५ मीटर उंचीपर्यंत वाढतात आणि सूर्यप्रकाश तसेच कार्बन डायऑक्साइड वायूच्या साहाय्याने स्वत:चे अन्न स्वत:च तयार करतात आणि जेथपर्यंत सूर्यकिरण पोहोचतात तेथपर्यंत ही जंगले आढळतात. पृथ्वीवरील जंगले वाऱ्याबरोबर त्यांच्या पर्णसंभारास प्रतिसाद देतात त्याचप्रमाणे समुद्री जंगलेसुद्धा पाण्याबरोबर हेलकावे खात असतात. समुद्राच्या पोटात तरंगत असलेल्या या वनांपासून अनेक लहानमोठय़ा जलजीवांना अन्न, आसरा आणि संरक्षणसुद्धा मिळते. ही वने मोठय़ा प्रमाणावर हवेमधील कार्बन डायऑक्साइड पाण्यामधून शोषून त्याचे स्थिरीकरण करतात. सध्याच्या वातावरण बदल संकटाच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या पोटातील तरंगणारा हा आपला वनमित्र आणि त्याचे तेथे असणे आपणासाठी फार महत्त्वाचे आहे.

हरितगृह वायूमुळे वातावरणात वाढलेली उष्णता समुद्रातही जाते. तेथे उष्ण लाटांची निर्मिती होते. या उष्ण लाटा समुद्री शैवालांच्या विस्तीर्ण जंगलांची मोठय़ा प्रमाणात हानी करतात. त्यामुळे समुद्री वने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वातावरणातील वाढता कार्बन डायऑक्साइड वायू कमी केला, म्हणजेच जीवाश्म इंधनाच्या वापरावर नियंत्रण ठेवले तरच ही जंगले वाचून पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. नागेश टेकाळे,मराठी विज्ञान परिषद