समुद्र बाष्प उणे दोन अंश सेल्सिअस किंवा त्याखालील तापमानाला गोठून तयार झालेला बर्फ म्हणजेच ‘सागरी बर्फ’. हा बर्फ पूर्णत: समुद्राच्या म्हणजे खाऱ्या पाण्यापासून तयार झालेला असतो. तो आक्र्टिक महासागरात, तसेच प्रशांत आणि अटलांटिक महासागराच्या उत्तरेकडे आढळतो. दरवर्षी ठरावीक काळात सागरी बर्फ वितळत जातो आणि पुन्हा पाणी थिजत जाऊन तयार होतो. पाण्याचे तापमान, समुद्राच्या पृष्ठभागाजवळच्या हवेचे तापमान, समुद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण, सागरी बर्फ किती जुना आहे अशा अनेक घटकांचा सागरी बर्फ तयार होण्यावर, वितळण्यावर परिणाम होतो. सागरी बर्फ एक वर्ष जुना असेल तर त्याचा थर पातळ असून तो जास्त घट्ट नसतो. असा सागरी बर्फ सहज वितळतो.

वर्षांनुवर्षे टिकलेला सागरी बर्फ चांगलाच घट्ट असतो. त्याचे थर साचून भरपूर जाड झालेले असतात. साहजिकच ते सावकाश वितळतात. जागतिक तापमानवाढीमुळे अगदी जुना घट्ट बर्फ वितळणे, पातळ होणे सतत वाढत्या प्रमाणात घडत आहे. असे होणे अत्यंत धोकादायक आहे, कारण पर्यावरणाच्या दृष्टीने सागरी बर्फ फार महत्त्वाचा आहे. रंग पांढरा असल्याने या बर्फावर पडलेला नव्वद टक्के प्रकाश परावर्तित होतो. सागरी बर्फ घटला तर आकाशातून येणारा प्रकाश अडवणारे छत्रच कमी झाल्याने सागरी बर्फाखालचा समुद्रतळ उघडा पडतो. त्याचा रंग सागरी बर्फापेक्षा गडद असतो. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त प्रकाशकिरण व उष्णता पोहोचते, शोषली जाते आणि परिणामी पाणी तापल्याने सागरी बर्फाचे प्रमाण घटते.

उपग्रहांच्या मदतीने गेल्या चाळीस वर्षांत आक्र्टिक महासागरातील बर्फाचे निरीक्षण केले गेले. तेथील समुद्री बर्फाचा विस्तार आणि जाडी कमी होत चालली आहे. हा मानवी जीवन व्यवहारांचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम आहे. आक्र्टिक महासागरातील बर्फाचे आच्छादन कमी झाल्यामुळे अनेक दुष्परिणामांची मालिका सुरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागरी बर्फाच्या जाड घट्ट थरांमध्ये लहान-मोठय़ा पोकळ नळय़ांचे कालवे तयार झालेले असतात. त्यांत घर करून हजारो जातींचे जिवाणू, विषाणू, शैवाल, खेकडे, झिंगे यासारखे प्राणी राहात असतात. उन्हाळय़ात ते या नळय़ांमधून बाहेर पडतात आणि अन्य जीवांचे खाद्य ठरतात. सागरी बर्फाचा आक्र्टिकमधली ध्रुवीय अस्वले, सील अंटाक्र्टिका महासागरातली पेंग्विन यांसारख्या सागरी प्राण्यांना तराफ्यांसारखा उपयोग होतो. सागरी बर्फ वितळला तर या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येईल.-नारायण वाडदेकर, मराठी विज्ञान परिषद