समुद्र विज्ञानात अनेक प्रकारच्या शास्त्र शाखांचा समावेश होतो. त्यापैकी बहुतेक सागरी भौतिकशास्त्रीय अभ्यास म्हणजे समुद्रात वाहणारे प्रवाह, लाटा, तेथील तापमानाच्या विदेची माहिती, निरनिराळय़ा प्रकारच्या हवामानविषयक घडामोडी, जसे ‘ला निना’ व ‘अल् निनो’, त्याचप्रमाणे भारतात नेमेचि येणारा मान्सून, जगभरात येणाऱ्या पावसाची प्रवृत्ती, इत्यादी.

सागरी रसायनशास्त्रात समुद्रातील पाण्याची क्षारता, त्या पाण्यात कोणत्या खनिजांची सरमिसळ झाली आहे त्याचा अभ्यास, त्याचप्रमाणे नायट्रेट, सिलिकेट इत्यादी संयुगांच्या माहितीबाबतचा अभ्यास, या गोष्टी येतात. अनेक खनिजे आणि जीवाश्म इंधनांचे साठेदेखील सागरातच दडले आहेत. भारतीय किनाऱ्यावर ओएनजीसी खनिज तेलाच्या शोधासाठी कार्यरत आहेच.

हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र या समुद्रविज्ञानाशी जोडलेल्याच शास्त्रशाखा आहेत. समुद्राच्या साहाय्याने सर्वेक्षण करणे, ताऱ्यांचे नकाशे काढणे हे फार वर्षांपासून ज्ञात असलेले शास्त्र आहे. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञानाचा अभाव असतानादेखील समुद्राच्या साहाय्याने या विषयांची सांगड घातली जात असे.

समुद्रातील वनस्पतीप्लवक आणि शैवाल, सी वीड्स यांसारख्या विविध वनस्पती, चिमुकल्या प्राणीप्लवकापासून ते महाकाय ब्ल्यू व्हेलपर्यंतची रेलचेल असलेली प्राणिसृष्टी, विघटनाचे विधायक कार्य करणारे अनेकविध सागरी जिवाणू, काही विषाणूदेखील एकत्रितपणे सागरी जीवसृष्टी समृद्ध करतात. या शास्त्राला अलीकडच्या काळात जीवशास्त्रीय ‘समुद्र विज्ञान’ असेही म्हटले जाते. मत्स्य व्यवसायदेखील याची उपशाखा होते.

भारताला तीन बाजूंनी समुद्रकिनारा आहे अशा ठिकाणी खूप मोठय़ा प्रमाणात मत्स्योत्पादन होते. विशेषत: कोळंबी, शेवंड यांसारखे अपृष्ठवंशीय प्राणी आणि काही मासे यांची मोठय़ा प्रमाणात निर्यात होऊन भारताला कोटय़वधी रुपयांचे परकीय चलन मिळते. किनारपट्टीने राहणारे भारतीय मत्स्याहार करतात. मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यशेती यामुळे भारत मत्स्योद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान टिकवून आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताला इतकी मोठी किनारपट्टी लाभली असूनही समुद्रविज्ञानाचे विद्यार्थी खूप कमी प्रमाणात आढळतात. सीआयएफई (केंद्रीय मात्स्यकीय शिक्षण संस्था) हे मुंबईस्थित, अभिमत विद्यापीठ, एनआयओ (राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था) आणि ‘पृथ्वी विज्ञान मंत्रालय’ यांसारख्या भरीव संशोधन, प्रशिक्षण करणाऱ्या संस्था आज आपल्याकडे आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी समुद्रविज्ञानाचा विचार जरूर करावा.