सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लातविया हा उत्तर युरोपातल्या बाल्टिक देशांपैकी एक देश. पश्चिमेला बाल्टिक समुद्र, उत्तरेला एस्तोनिया, पूर्वेस रशिया, दक्षिणेस लिथुआनिया आणि अग्नेयेस बेलारूस अशा लातवियाच्या चतु:सीमा आहेत. २२ लाख लोकसंख्या असलेला लातविया हा युरोपियन युनियनमधील सर्वात कमी आणि सर्वात विरळ लोकवस्ती असलेला एक छोटा देश आहे. ६४ हजार चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या देशाची राजधानी रिवा या शहरात आहे. संस्कृती, जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती या बाबतीत लातवियाचे साम्य एस्तोनिया आणि लिथुआनिया या शेजारी बाल्टिक देशांशी आहे. लातवियाचे हवामान सौम्य आणि अतिथंड असून हिवाळ्यामध्ये तर ते -३० डिग्री सेंटिग्रेडपर्यंत खाली जाते! येथील ५६ टक्के जमीन जंगलांनी व्याप्त आणि २९ टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाते. सध्या लातवियन लोकांमध्ये ८० टक्के लोक ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा असणारे आणि उर्वरित लोक कोणताही धर्म न मानणारे आहेत. बाल्टिक लातवियन ही येथील प्रचलित भाषा आणि सर्वसामान्य लातवियन माणसाला त्यांच्या या भाषेबद्दल अभिमान आहे. अनेक विभिन्न वंशाच्या लातवियातील लोकवस्तीपैकी मूळचे लातवियन वंशाचे ६२ टक्के, रशियन वंशाचे २७ टक्के आणि उर्वरितांमध्ये पोलिश, ज्यू, बेलारूसी, युक्रेनी, जर्मन वांशिक लोक येथे स्थायिक आहेत. २१ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत युनियनमधून मुक्त झालेले लातविया, एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. सध्या येथे संसदीय प्रजासत्ताक पद्धतीची राज्यप्रणाली असून अध्यक्ष हा औपचारिक राष्ट्रप्रमुख असतो. पंतप्रधान हा सरकार प्रमुख असतो आणि लष्कर प्रमुख म्हणूनही काम पाहतो. प्रजासत्ताक लातविया सध्या युनो, नाटो, युरोझोन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, युरोपियन युनियन वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. लातविया सध्या एक प्रगत विकसित देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३ व्या उच्च स्थानावर आहे. स्वतंत्र झाल्यावर लातवियाने खुली बाजारपेठीय अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. २००८ ते २०१० या काळातील जागतिक मंदीदरम्यान अर्थव्यवस्थेत प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लातवियाची अर्थव्यवस्था युरोपियन युनियनमध्ये सर्वात वेगाने वाढली. पूर्वी येथे लॅट हे चलन होते, परंतु १ जानेवारी २०१४ पासून लातविया सरकारने येथे युरो हे चलन प्रचलित केले.